"राष्ट्रवादी'च्या दादागिरीवर कारखाने चालू होतील, पण त्यांच्या विरोधात ठाण मांडू : आमदार पडळकर 

MLA Padalkar Press
MLA Padalkar Press

मंगळवेढा (सोलापूर) : राज्यात ऊस तोडणी मजूर व वाहतूकदारांच्या प्रश्नासाठीचे कोयता बंद आंदोलन मोडून साखर कारखानदार राष्ट्रवादीच्या दादागिरीच्या जिवावर मजूर व वाहतूकदारांवर दबाव टाकून कारखाने चालू करतील. त्यांच्या विरोधात ठाण मांडू, असा इशारा भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी दिला. 

मंगळवेढा तालुक्‍यातील नंदेश्वर येथे ऊसतोडणी मजूर, मुकादम यांच्या विविध मागण्यांच्या संदर्भात बैठक घेण्यात आली. या बैठकीनंतर आमदार पडळकर पत्रकारांशी बोलत होते. या वेळी माऊली हळदणकर, बापू मेटकरी, धनाजी गडदे, सुभाष मस्के, बंडू करे, तानाजी गरंडे, धोंडाप्पा करे, दादासाहेब मदने आदी उपस्थित होते. 

आमदार पडळकर पुढे म्हणाले, वाहतूक कंत्राटदारांकडून कोरे चेक घेत त्याच्या बळावर कारखानदारांकडून पिळवणूक केली जाते. कायद्याने त्यांना संरक्षण मिळावे. त्यांचा मागील 20 टक्के फरक मिळावा. ऊसतोड मजूर व बैलाचा विमा उतरवला पाहिजे. बैलाच्या वैद्यकीय खर्चाची व्यवस्था कारखानदारांनी केली पाहिजे. कष्टाने ऊसतोड करून मजूर बैलगाडीने व इतर वाहनांनी वाहतूक करून ऊस कारखान्यावर आणतो. मात्र उसाची कारखानदारांकडून काटामारी केल्यामुळे त्यांच्या कष्टाला, घामाला योग्य दर मिळत नाही. सध्या राज्यामध्ये उसाचे क्षेत्र वाढल्याने कारखानदार तुमच्या मागे लागले आहेत; परंतु ज्या वेळी ऊस कमी असतो त्या वेळी करारासाठी त्यांच्यामागे जाऊनही विचार करत नाहीत. त्यामुळे सध्या मजूर कारखान्याच्या कार्यक्षेत्रात आल्याने जोपर्यंत निर्णय होत नाही तोपर्यंत मजुरांनी हातात कोयता घेऊ नये व या भागातील जनतेने ऊस तोडणी मजुरांच्या सोबत राहावे. 

वंचित घटक व राजकीय वजन नसलेल्या शेतकऱ्यांच्या जमिनी लाटून औद्योगिक वसाहती, कारखाने, सूतगिरणी, शिक्षण संस्था उभ्या केल्या; परंतु ज्यांच्या जमिनी गेल्या त्यांना साधं मजूर म्हणून देखील घेतले नाही. 29 कायदे मोडित काढून चार कायदे केले पण ते मान्य करत नाहीत. ऊस तोडणी मजुरास कामगार म्हणून मान्यता नाही. आता रस्त्यावरची लढाई लढल्याशिवाय थांबणार नाही. राज्यातील ऊस तोडणी मजुरांची सरकार दप्तरी नोंद करून त्यांच्या बाजूचा कायदा व दरवाढीचा विषय जोपर्यंत घेतला जात नाही, तोपर्यंत मजूर कोयता हातात घेणार नाही. सरकार राष्ट्रवादीचे आहे म्हणून दादागिरी चालणार. बहुसंख्य कारखानदार राष्ट्रवादीचे असल्याने दादागिरीच्या जोरावर गोरगरिबांच्या अन्नात माती कालवणार असाल तर हे महाराष्ट्रात खपवून घेणार नाही, असा इशारा देत, स्व. गोपीनाथ मुंडे ऊसतोड मजूर व वाहतूक संघटनेच्या वतीने राज्यभरात केलेल्या कोयता बंद आंदोलनाला सहकार्य करावे, असे आवाहन आमदार पडळकर यांनी केले. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com