आपल्या प्रेमामुळे परिचारक कुटुंब संकटातून बाहेर पडेल : आमदार प्रशांत परिचारक 

अभय जोशी 
Monday, 31 August 2020

आमदार प्रशांत परिचारक यांनी व्हिडिओद्वारे कार्यकर्त्यांसोबत संवाद साधला. ते म्हणाले, परिचारक कुटुंबावर गेल्या पंधरा दिवसांपासून फार मोठे संकट घोंगावत होते. सुधाकरपंत परिचारक यांच्या निधनामुळे एखादा वटवृक्ष ज्याप्रमाणे उन्मळून पडतो त्याप्रमाणे आपल्या सर्व परिवारावर आघात झाला. मोठ्या मालकांना आपण वाचवू शकलो नाही. मृत्यू हा अटळ आहे. अंतिम सत्य आहे ते आपण स्वीकारले पाहिजे. 

पंढरपूर (सोलापूर) : पांडुरंग परिवाराचे कुटुंबप्रमुख, माजी आमदार सुधाकरपंत परिचारक यांच्या निधनामुळे आपल्या सर्वांचे कधीही भरून न येणारे नुकसान झाले आहे. गेल्या पन्नास वर्षांत सुधाकरपंत आणि आमच्या कुटुंबावर जनतेने प्रेम केले आणि आशीर्वाद दिला. तोच आशीर्वाद आणि प्रेम भविष्यकाळात आमच्या पाठीशी ठेवावे. त्या आशीर्वादाच्या जोरावर आमचे कुटुंब या संकटातून बाहेर पडेल, असा विश्वास आमदार प्रशांत परिचारक यांनी व्यक्त केला. 

हेही वाचा : अवघड आहे! तिजोरीत पैसा नसतानाही उभारतेय आयुक्तांची 42 लाखांची केबिन 

माजी आमदार सुधाकरपंत परिचारक यांचे काही दिवसांपूर्वी निधन झाले. त्याच दरम्यान परिचारक कुटुंबातील आमदार प्रशांत परिचारक, त्यांचे बंधू युटोपियन शुगरचे अध्यक्ष उमेश परिचारक, वडील ऍड. प्रभाकर परिचारक यांच्यासह कुटुंबातील काही जणांना पुण्यातील खासगी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. त्यामुळे पांडुरंग परिवारातील कार्यकर्त्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते. कार्यकर्ते सातत्याने परिचारक कुटुंबातील सदस्यांसाठी प्रार्थना करत होते. 

हेही वाचा : वांगरवाडीतील चिमुकल्याचे खून प्रकरण : अनैतिक संबंधातून आईनेच गळा आवळला; प्रियकराला अटक 

दरम्यान, आमदार प्रशांत परिचारक यांनी व्हिडिओद्वारे आपल्या कार्यकर्त्यांसोबत संवाद साधून आपल्या भावना व्यक्त केल्या. ते म्हणाले, की परिचारक कुटुंबावर गेल्या पंधरा दिवसांपासून फार मोठे संकट घोंगावत होते. सुधाकरपंत परिचारक यांच्या निधनामुळे एखादा वटवृक्ष ज्याप्रमाणे उन्मळून पडतो त्याप्रमाणे आपल्या सर्व परिवारावर आघात झाला. मोठ्या मालकांना आपण वाचवू शकलो नाही. डॉक्‍टरांनी खूप प्रयत्न केले परंतु वय आणि त्यांचे जुने आजार यामुळे त्यांच्या शरीराने उपचारांना साथ दिली नाही. मृत्यू हा अटळ आहे. अंतिम सत्य आहे ते आपण स्वीकारले पाहिजे. मोठ्या मालकांची पोकळी कधीच भरून निघणार नाही. त्यांनी आयुष्यभर तत्त्वाने समाजकारण केले. त्याच वाटेने पुढे जाणे आणि त्यांनी उभा केलेला परिवार आपण सर्वांनी मिळून अधिक मोठा आणि अधिक सक्षम केला पाहिजे. 

आमदार परिचारक पुढे म्हणाले, तीन-तीन पिढ्यांपासूनचे आपले सर्वांचे ऋणानुबंध आहेत. रक्ताच्या नात्यापेक्षाही ते अधिक घट्ट करणे ही मोठ्या मालकांना श्रद्धांजली ठरणार आहे. त्यांची जागा कोणीही घेऊ शकत नाही. आपल्याला पुण्यातील दवाखान्यातून शनिवारी डिस्चार्ज देण्यात आला आहे. तथापि पुढील सात दिवस डॉक्‍टरांनी पुण्यातच विलगीकरणात राहण्याचा सल्ला दिला आहे. त्यानंतर डॉक्‍टरांच्या सल्ल्याने आपण पंढरपूरला येणार आहोत. 

ज्येष्ठ मंडळींकडे लक्ष द्या 
गेल्या पंधरा-वीस दिवसांपासून आपण सर्व कार्यकर्ते अस्वस्थ आहात. त्याचप्रमाणे सर्व लोकांच्या भेटीची आपल्याला देखील ओढ आहे. परंतु या संकटात स्वतः सुरक्षित राहणे आणि दुसऱ्यांना सुरक्षित ठेवणे महत्त्वाचे आहे. त्यामुळे सर्वांनी काळजी घ्यावी आणि विशेषतः कुटुंबातील ज्येष्ठ मंडळींकडे अधिक लक्ष द्यावे, असे आवाहन आमदार प्रशांत परिचारक यांनी केले. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: MLA Paricharak said that because of public love Paricharaks family will come out of the crisis