
आमदार प्रणिती शिंदे म्हणाल्या...
सोलापूर : ग्रामदैवत श्री सिध्देश्वर यात्रेनिमित्त सकारात्मक निर्णय व्हावा, यासाठी आम्ही दरवर्षी प्रयत्न करतो. त्यात राजकारण करण्याचा आणि श्रेय्य घेण्याचा प्रयत्न केला नाही. यात्रेसाठी आमदार संजय शिंदे का पुढाकार घेत आहेत, हे माहिती नसल्याचे स्पष्टीकरण आमदार प्रणिती शिंदे यांनी आज (बुधवारी) दिले. कोणाच्या खांद्यावर बंदूक ठेवून कोणासाठी हा प्रकार सुरु आहे, हे माहिती नसल्याचेही त्यांनी सांगितले.
आमदार प्रणिती शिंदे म्हणाल्या...
पंच कमिटीच्या प्रस्तावानुसार यात्रा साजरी करण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी मानकऱ्यांनी केली. त्यानंतर आमदार संजय शिंदे यांनी शहरात एन्ट्री केली आणि माजी पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांच्या माध्यमातून मानकऱ्यांची बैठक घेतली. त्यानंतर जिल्हा प्रशासनाकडे पंच कमिटीच्या प्रस्तावानुसार यात्रेस परवानगी देण्याची मागणी केली. त्यानंतर त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली. तत्पूर्वी, मदत व पुनर्वसन विभागाचे सचिव ओमराजे निंबाळकर यांची भेट घेऊन चर्चा केली. त्यानंतर त्या भेटीचे फोटो सोशल मिडियातून व्हायरल झाले. काहीवेळातच आमदार प्रणिती शिंदे यांनी यात्रेसाठी मदत व पुनर्वसन विभागाच्या सचिवांकडे पाठपुरावा करुन यात्रेचा निर्णय मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडे निर्णयासाठी फाईल गेल्याचे स्पष्ट करण्यात आले. त्यानंतर गुरुवारी (ता. 24) पोलिस आयुक्त अंकुश शिंदे यांच्यासोबत बैठक पार पडली. त्यावेळी पत्रकारांशी बोलताना प्रणिती शिंदे म्हणाल्या, यात्रेबाबतीत आम्ही कधीही राजकारण केले नाही. त्याचे श्रेय्य घेण्याचा प्रयत्नही केला नाही. मात्र, आता कोण कोणासाठी काय करतेय, श्रेय्य घेत आहे, याकडे मी लक्ष देत नाही. परंतु, मी यात्रेचा निर्णय सकारात्मक व्हावा म्हणून दिवसभर मुख्यमंत्री कार्यालयात थांबले. आम्हाला हवा तसा निर्णय झाला आणि त्यासाठी मी प्रयत्न केल्याचेही प्रणिती शिंदे यांनी पत्रकारांना सांगितले.