आमदार संजयमामा शिंदे म्हणाले, इथेनॉलच्या वाढीव दराचा साखर कारखानदारीला फायदा, सिध्देश्‍वर साखर कारखान्याच्या गळित हंगामाचा शुभारंभ 

प्रमोद बोडके
Saturday, 7 November 2020

राज्य सरकारने 2013 मध्ये को-जन. प्रकल्प उभारणाऱ्या राज्यातील 16 ते 17 साखर कारखान्यांना मान्यता दिली. त्यावेळी विजेचा प्रतियुनिट दर साडेसहा रुपये होता. आता प्रतियुनिट पाच रुपये दर केल्याने दीड रुपयांचे नुकसान होत आहे. साडेसहा रुपयांचा दर मिळाला तर या आर्थिक अडचणीतून बाहेर पडणे शक्‍य होणार असल्याने संजय शिंदे आणि प्रणिती शिंदे या आमदारद्वयांनी राज्य सरकारकडे पाठपुरावा करून हा प्रश्न मार्गी लावावा. 
- धर्मराज काडादी, अध्यक्ष, सिध्देश्‍वर साखर कारखाना 

सोलापूर : साखर उद्योगासमोरील अडचणी, जिल्ह्यातील पर्जन्यमान, उजनीचे पाणी, साखरेचे दर याचा ऊहापोह केला. राष्ट्रवादीचे नेते शरद पवार आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे साखर कारखानदारीकडे चांगल्या पध्दतीने लक्ष आहे. साखर उद्योग सर्वच बाजूने अडचणीत आला आहे. शरद पवार हे नेहमीच यात लक्ष घालतात. गडकरी हेही या बाबतीत सकारात्मक आहेत. आता इथेनॉलची पॉलिसी तयार झाली आहे. त्यामुळे भविष्यात नक्कीच चांगले दिवस येतील असा विश्‍वास करमाळ्याचे आमदार संजयमामा शिंदे यांनी व्यक्त केला. 

कुमठे येथील श्री सिध्देश्वर सहकारी साखर कारखान्याच्या 48 व्या गळीत हंगामाचा शुभारंभ आमदार प्रणिती शिंदे, संजयमामा शिंदे आणि कारखान्याचे अध्यक्ष धर्मराज काडादी यांच्या हस्ते उसाची मोळी गव्हाणीत टाकून झाला. त्यावेळी ते बोलत होते. प्रारंभी उसाच्या गाडीचे पूजन, काटा पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर ग्रामदैवत श्री सिध्देश्वर आणि कारखान्याचे संस्थापक कर्मयोगी अप्पासाहेब काडादी यांच्या प्रतिमेचे पूजन झाले. आमदार शिंदे म्हणाले, यंदा इथेनॉलचे दर वाढवून दिले आहेत. पूर्वी असलेल्या कायदेशीर प्रक्रियेमध्ये आता बऱ्यापैकी सुसूत्रता आली आहे. त्यामुळे सहजासहजी परवाने मिळण्यास सुरुवात झाली आहे. आपण इथेनॉल निर्मितीकडे जेवढे लक्ष देऊ तेवढा फायदा आपल्याला होणार आहे. काळाची गरज ओळखून कारखान्यांनी आता या गोष्टी करणे गरजेचे आहे. तरच सगळ्या अडचणींवर मात करणे शक्‍य होणार आहे. 

ज्येष्ठ समाजवादी विचारवंत पन्नालाल सुराणा म्हणाले, श्री सिध्देश्वर सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक कर्मयोगी अप्पासाहेब काडादी यांच्या कामाची सचोटी आणि चिकाटी ही वैशिष्ट्ये होती. त्यांच्या गुणांचा अवलंब शेतकरी, कर्मचारी व कामगारांनी केल्यास कारखान्याप्रमाणेच त्यांचे भविष्य आणखी उज्ज्वल होईल. दरवर्षी आपल्याला दुष्काळाचा सामना करावा लागतो. यंदा अतिवृष्टीचा तडाखा बसला आहे. डोळ्यादेखत उभी पिके गेली आहेत. या संकटापेक्षा मोठे संकट केंद्र सरकारच्या शेतकरीविरोधी धोरणांचे आहे. शेतकऱ्यांच्याबाबतीत जे तीन कायदे केले आहेत. ते फार चुकीचे आहेत. लॉकडाउनमुळे 12 कोटी लोकांचा रोजगार हरवला आहे. रोजगार निर्माण करणे हे मोठे आव्हान आहे. मात्र याबाबतीत सरकार काहीच करीत नाही. याबाबत चांगले धोरण राबवविण्यास सरकारला भाग पाडले पाहिजे, असेही ते म्हणाले. पंजाबमध्ये दीड महिना झाले शेतकरी रुळावर बसले आहेत. यातून मार्ग काढण्याऐवजी सरकारने रेल्वेगाड्या बंद केल्या आहेत. रेल्वे चालल्या पाहिजेत. कोळसा, धान्य पोहोचले पाहिजे, अशी भूमिका घेण्याऐवजी केंद्र सरकार तो पंजाब सरकारचा प्रश्न आहे, असे सांगून अडेलतट्टूपणाने वागत आहे. भारत देश संघराज्य आहे. वेगवेगळ्या घटकराज्यांनी मिळून बनला आहे. प्रत्येकाचे वैशिष्ट्य वेगळे आहे. या सगळ्यांना सोबत घेऊन केंद्र सरकारने चालले पाहिजे. मात्र ते अत्यंत पक्षपातीपणाने वागत आहेत. अशी टीका सुराणा यांनी केली. ऊस तोडणी कामगारांना 14 टक्के वाढ मिळाल्याबद्दल त्यांनी समाधानही व्यक्त केले. 

आमदार प्रणिती शिंदे म्हणाल्या, यंदा ओल्या दुष्काळामुळे शेतकऱ्यांची परिस्थिती फारशी चांगली राहिली नाही. पुरामुळे नुकसान झालेल्या नदीकाठच्या शेतकऱ्यांचा ऊस सर्वच साखर कारखान्यांनी गाळपास लवकर आणावा असे सांगून त्या म्हणाल्या सुशीलकुमार शिंदे यांच्यामुळे बोरामणी विमानतळाचा प्रश्न मार्गी लागला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही या विमानतळास तत्काळ 50 कोटी रुपये मंजूर केल्याचे त्यांनी सांगितले. काडादी घराण्याशी आमचे कौटुंबिक संबंध आहेत. शिंदे साहेबांचे आशीर्वाद नेहमीच काडादी यांच्या पाठीशी आहेत. कर्मयोगी अप्पासाहेब काडादी यांची पुण्याई त्यांना लाभली आहे. काडादी यांचे राहणीमान अत्यंत साधे असून त्यांचे कार्य मोठे असल्याचा गौरवपूर्ण उल्लेख केला. 

कारखान्याचे अध्यक्ष धर्मराज काडादी म्हणाले, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांचे या कारखान्याकडे गृहराज्यमंत्री असल्यापासून बारीक लक्ष आहे. कर्मयोगी अप्पासाहेब असताना आणि कागद प्रकल्प सुरू केल्यानंतर ते कारखान्यावर अनेकवेळा आले होते. त्यांची जेव्हा भेट होते तेव्हा पहिल्यांदा कारखान्याच्या प्रगतीबद्दल चौकशी करतात. अडचणी सांगितल्या की, त्या सोडवितात. माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे हे या कारखान्याचे सभासद आहेत. त्यांचेही या कारखान्याकडे लक्ष आहे. केंद्रीयमंत्री असतानाच त्यांनी या शहराच्या विकासाच्यादृष्टीने बोरामणी विमानतळाचा निर्णय घेतला. होटगी रस्त्यावरील विमानतळावर 60 ते 70 प्रवासी क्षमतेची विमाने उतरू शकतील एवढाच रनवे या असल्याने बोरामणी येथे आंतरराष्ट्रीय विमानतळ होण्यासाठी 2013 मध्ये त्यांनी परिपत्रक काढून 500 हेक्‍टर जमिनीची तरतूद केली. मधल्या सरकारच्या काळात या विमानतळाचे थांबलेले काम त्यांनी पुनश्‍च मार्गी लावले. 

याप्रसंगी कारखान्याचे उपाध्यक्ष ऍड. दीपक आलुरे, संचालक प्रकाश वानकर, गुरुराज माळगे, अण्णाराज काडादी, माजी शिक्षण संचालक गंगाधर म्हमाणे, बॅंक ऑफ बडोदा चाटीगल्ली शाखेचे व्यवस्थापक धनंजय पडवळ, रणदिवे, जिल्हा मध्यवर्ती बॅंक कुमठे शाखेचे अधिकारी एन. बी. दुर्गी, जनता बॅंक सदर बझार शाखेच्या व्यवस्थापिका पूजा कामत, मकरंद जोशी, शिवण्णा बिराजदार, शेतकरी संघटनेचे शिवानंद दरेकर, महामूद पटेल, शिवशरण दिंडुरे, नीलकंठप्पा कोनापुरे, भीमाशंकर पटणे, चिदानंद वनारोटे, विश्वनाथ लब्बा, अप्पासाहेब कळके यांच्यासह कारखान्याचे आजीमाजी संचालक, सिध्देश्वर परिवारातील सदस्य, कारखान्याचे सभासद, बिगर सभासद, शेतकरी, अधिकारी, कर्मचारी व कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन सचिव सिध्देश्वर शीलवंत यांनी केले. आभार संचालक सिध्दाराम चाकोते यांनी केले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: MLA Sanjay Mama Shinde said, "Rising ethanol rates benefit sugar industry, Siddheshwar launches sugar mill crushing season"