राष्ट्रवादीच्या व्यासपीठावरून बोलण्यास शिंदेंचा नकार ! संवाद यात्रेतील प्रसंगावरून राजकीय चर्चेला जोर 

Shinde_Paricharak_Bhalke
Shinde_Paricharak_Bhalke

पंढरपूर (सोलापूर) : राष्ट्रवादीच्या संभाव्य उमेदवारांच्या यादीत सर्वात पहिल्या क्रमांकावर असलेल्या भगीरथ भालके यांनी शनिवारी (ता. 13) सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांच्यासह जिल्ह्यातील राष्ट्रवादी नेत्यांच्या प्रमुख उपस्थितीत संवाद यात्रेचा प्रारंभ केला. दरम्यान, राष्ट्रवादीच्या या व्यासपीठावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे समर्थक असलेले अपक्ष आमदार संजय शिंदे यांनी भाषण करण्यास सपशेल नकार दिला. त्यांच्या या नकाराची पंढरपूर- मंगळवेढा विधानसभा मतदार संघातील राष्ट्रवादी व कॉंग्रेस कार्यकर्त्यांमध्ये आता जोरदार चर्चा सुरू झाली आहे. 

पंढरपूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार भारत भालके यांच्या निधनानंतर प्रशासनाने पोटनिवडणुकीची तयारी सुरू केली आहे. त्यातच आता विविध पक्षांमध्ये राजकीय हालचालींना वेग आला आहे. स्व. भारत भालके यांच्या जयंतीचे औचित्य साधून त्यांचे पुत्र, विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष भगीरथ भालके यांनी विधानसभा मतदार संघात जनसंवाद यात्रेचे आयोजन केले आहे. शनिवारी (ता. 13) सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांच्या उपस्थितीत मंगळवेढा येथे जनसंवाद यात्रेचा प्रारंभ केला. या कार्यक्रमाला राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बळिराम साठे, राष्ट्रवादीचे प्रवक्ते उमेश पाटील, माजी आमदार राजन पाटील, कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रकाश पाटील, आमदार प्रणिती शिंदे, अपक्ष आमदार संजय शिंदे यांच्यासह राष्ट्रवादीचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. 

या वेळी सर्वच नेत्यांनी राष्ट्रवादीचे संभाव्य उमेदवार व भावी आमदार म्हणून भगीरथ भालकेंचा उल्लेख करत, राष्ट्रवादी व कॉंग्रेस भालके कुटुंबीयांच्या मागे ठाम असल्याचे सांगितले. याच वेळी निवेदकाने आमदार संजय शिंदे यांचे नाव बोलण्यास घेतले असता, शिंदे यांनी चक्क मला बोलता येत नाही, असे म्हणत व्यासपीठावरून बोलण्यास नकार दिला. जनसंवाद यात्रेला शुभेच्छा तरी द्या, असे व्यासपीठावरील मंत्र्यांसह उपस्थित नेत्यांनी आग्रह करून देखील आमदार शिंदे यांनी नको, असे म्हणत जागेवरच बसून राहणे पसंत केले. एवढेच नाही तर संपूर्ण कार्यक्रम संपेपर्यंत आमदार शिंदे यांनी कानात हेडफोन घालून मोबाईलमध्ये डोके घातले होते. व्यासपीठावरील त्यांची देहबोली उपस्थितांना बरेच काही सांगून गेली. त्यामुळे आमदार संजय शिंदे यांच्या मनात वेगळंच काही तरी चाललंय काय? अशी चर्चा देखील कार्यक्रमस्थळी सुरू होती. 

परिचारकांसाठी आमदार शिंदेंची मध्यस्थी ! 
भाजप आमदार प्रशांत परिचारकांना पुन्हा राष्ट्रवादीत आणण्यासाठी आमदार संजय शिंदे यांचे प्रयत्न सुरू असल्याची चर्चा आहे. आमदार परिचारक आणि आमदार संजय शिंदे यांचे राजकीय सख्ख्य जगजाहीर आहे. जिल्ह्याच्या राजकारणात परिचारक-शिंदेंचा दोस्ताना आजही कायम आहे. राष्ट्रवादीपासून दूर गेलेल्या परिचारकांना पुन्हा राष्ट्रवादीत आणण्यासाठी आमदार संजय शिंदे प्रयत्नशील आहेत. आगामी पोटनिवडणुकीच्या निमित्ताने शिंदेंच्या या प्रयत्नांना गती आली आहे. अलीकडेच आमदार शिंदे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि आमदार प्रशांत परिचारक यांच्यात एक बैठक देखील घडवून आणली आहे. अशातच शनिवारी (ता. 13) सोलापुरात शरद पवार यांच्या कार्यक्रमात आमदार प्रशांत परिचारकांचे बंधू, युटोपियन शुगरचे अध्यक्ष उमेश परिचारकांच्या उपस्थितीमुळे आणखीच पुष्टी मिळाली आहे. 

पक्षात घेण्यासाठी राष्ट्रवादीचे नेते अनुकूल 
राष्ट्रवादीने उमेदवारी दिली तर परिचारक निवडणूक लढण्यास इच्छुक आहेत. मात्र आमदार प्रशांत परिचारक की उमेश परिचारक लढणार? याविषयी चर्चा सुरू आहे. सोलापुरात पुन्हा राष्ट्रवादीला गतवैभव मिळवून देण्यासाठी आमदार परिचारकांना राष्ट्रवादीत घेण्यास अजित पवारांसह राष्ट्रवादीचे नेतेही अनुकूल असल्याची चर्चा सुरू आहे. अशात भालकेंच्या जनसंवाद यात्रेनंतर पंढपुरात राजकीय वातावरण तापण्याची शक्‍यता आहे. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com