अकलूजमध्ये मोहिते-पाटील विरुद्ध मोहिते-पाटील ! माळशिरस तालुक्‍यातील चार ग्रामपंचायती बिनविरोध, उर्वरित ठिकाणी चुरस

Akluj_GP
Akluj_GP

नातेपुते (सोलापूर) : माळशिरस तालुक्‍यातील 49 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया चालू असून, त्यापैकी गोरडवाडी, मिरे, गिरझणी, बाभूळगाव या चार ग्रामपंचायतींच्या निवडणुका बिनविरोध झाल्या आहेत. 44 ग्रामपंचायतींच्या निवडणुका लागल्या आहेत. त्यामुळे प्रत्येक गावातील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. अकलूज ग्रामपंचायतीची एक जागा बिनविरोध झाली असून उर्वरित 16 जागांसाठी मोहिते-पाटील विरुद्ध मोहिते-पाटील असा दुरंगी सामना होत असल्याने या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. 

महाळुंग ग्रामपंचायतीसाठी एकाही उमेदवाराचा अर्ज न आल्याने तेथील 17 जागा रिक्त राहिल्या आहेत. तालुक्‍यातील 32 ग्रामपंचायतींसाठी दुरंगी, चार ग्रामपंचायतींसाठी तिरंगी लढती होत आहेत. तालुक्‍यातील एकूण 90 सदस्य बिनविरोध निवडून आले आहेत. उर्वरित 44 ग्रामपंचायतींच्या 424 सदस्यांसाठी निवडणूक होत आहे. निवडणूक लागलेल्या ग्रामपंचायतींसाठी 76 हजार 227 पुरुष व 69 हजार 703 स्त्रिया असे मिळून एकूण एक लाख 45 हजार 930 मतदार आहेत. निवडणुकीसाठी 237 मतदान केंद्रे आहेत. 

तालुक्‍यातील अकलूज, नातेपुते व श्रीपूर-महाळुंग या ग्रामपंचायतींचे रूपांतर नगरपरिषद व नगरपालिकेत करण्यासाठीचे प्रस्ताव असल्याने येथील निवडणुका न घेण्याबाबत शासनाने निवडणूक आयोगाला लिहिलेल्या पत्राचा काही विचार होईल व निवडणुका थांबतील अशी अशा होती. त्यातच महाळुंग ग्रामपंचायतीच्या ग्रामस्थांनी निवडणुकीत उमेदवारी अर्ज न भरण्याचा निर्णय घेतला. त्याचप्रमाणे नातेपुते व अकलूज ग्रामस्थांनीही निवडणूक अर्ज कोणीही भरू नये, असा निर्णय घेण्यासाठी प्रयत्न केला. परंतु, काही जणांनी निवडणूक अर्ज भरल्याने या दोन्ही गावांतील निवडणुका लागल्या आहेत. 

अकलूज ग्रामपंचायतीच्या 17 जागांपैकी एका जागेवर लोकनेते प्रतापसिंह मोहिते- पाटील पॅनेलच्या उमेदवार व डॉ. धवलसिंह मोहिते- पाटील यांच्या पत्नी उर्वशीराजे मोहिते- पाटील या बिनविरोध निवडून आल्या आहेत. उर्वरित 16 जागांसाठी 47 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. अकलूजमध्ये सहकार महर्षी कै. शंकरराव मोहिते-पाटील व विजयसिंह मोहिते-पाटील यांचा विकास पॅनेल व लोकनेते प्रतापसिंह मोहिते- पाटील परिवर्तन पॅनेल यांच्यात सामना होत असून सत्तेत असलेल्या सहकार महर्षी शंकरराव मोहिते- पाटील, विजयसिंह मोहिते- पाटील विकास पॅनेलला उर्वरित सर्वच्या सर्व जागी आपलेच उमेदवार निवडून आणण्यासाठी आमदार रणजितसिंह, धैर्यशील आणि इतर सर्व नेते व कार्यकर्ते झटत आहेत. 

लोकनेते प्रतापसिंह मोहिते- पाटील परिवर्तन पॅनेलला एक जागा बिनविरोध मिळाल्याने उर्वरित 16 जागांसाठी निकराची लढत होत आहे. अकलूजच्या प्रभाग क्रमांक दोनमध्ये माने- पाटील विरुद्ध माने- पाटील, तीनमध्ये मोहिते- पाटील विरुद्ध माने- पाटील या लढती लक्षवेधी होत आहेत. 

तालुक्‍यातील ग्रामपंचायत निहाय उमेदवार पुढीलप्रमाणे 
विजयवाडी 19, येळीव 16, रेडे 22, मांडकी 19, चाकोरे 22, विझोरी 24, बचेरी 12, बांगडें 18, पिरळे 23, जळभावी 17, मांडवे 40, गारवाड 20, तांदूळवाडी 38, तांडले 16, बिजवडी 14, माळखांबी 26, शिंगोर्णी 23, नातेपुते 21, मळोली/साळमुखवाडी 31, संग्रामनगर 31, बोंडले 18, गिरवी 22, कुसमोड 12, कोंडबावी 23, तांबबे 23, विठ्ठलवाडी 16, फडतरी/ निटवेवाडी/ शिवारवस्ती 16, एकशिव 22, अकलूज 47, बोरगाव 34, दसूर 18, फोंडशिरस/ मोटेवाडी 31, शेंडेचिंच 12, गणेशगाव 14, लोणंद 14 (2), कोथळे 12, शिंदेवाडी 15, कुरबावी 2, भांब 8, उंबरे वेळापूर 20, खळवे 16, कळंबोली 14, मोरोची 26, पिंपरी 22 . 

तालुक्‍यातील नातेपुते 7, कुरभावी 8, शिंदेवाडी 4, भांब 5, बचेरी, कुसमोड, निटवेवाडी, कोथळे व मोटेवाडी येथील प्रत्येकी 3, पिंपरी व लोणंद 2, अकलूज, येळीव, गारवाड, तोंडले, एकशिव, शेंडेचिंच, खळवे येथील प्रत्येकी एक उमेदवार बिनविरोध झाले आहेत. 

तालुक्‍यातील काही लक्षवेधी निवडणुका 
अकलूज : माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते- पाटील, ज्येष्ठ नेते जयसिंह मोहिते- पाटील, आमदार रणजितसिंह मोहिते- पाटील व धैर्यशील मोहिते- पाटील यांच्या पॅनेलविरुद्ध लोकनेते प्रतापसिंह मोहिते- पाटील यांचे पुत्र डॉ. धवलसिंह मोहिते- पाटील व त्यांना सहकार्य करणारे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष फत्तेसिंह माने- पाटील, हिंदुराव माने- पाटील, माजी आमदार बाबूराव देशमुख यांचे पुत्र पांडुरंग देशमुख यांचा पॅनेल आहे. या ग्रामपंचायत निवडणुकीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. 

मोरोची : माळशिरस पंचायत समितीचे माजी उपसभापती किशोर शिवाजीराव सूळ यांच्याविरोधात मोरोची गावातील परंपरागत विरोधक साळुंखे आणि हनुमंतराव सूळ यांनी बाजूला होऊन तरुणांचा परिवर्तन पॅनेल उभा केला आहे. त्यामुळे किशोर सूळ यांच्या सत्तेचे काय होणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 

नातेपुते : सोलापूर जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष बाबाराजे देशमुख यांच्या नेतृत्वाखाली राजेंद्र पाटील, रघुनाथ कवितके, मामासाहेब पांढरे, आप्पासाहेब भांड, चंद्रकांत ठोंबरे यांच्या जनशक्ती पॅनेलला 17 पैकी 7 जागा बिनविरोध मिळालेल्या आहेत. त्यांच्या विरोधात माजी सरपंच ऍड. भानुदास राऊत आणि दोन्ही काळे मळ्यातील तरुणांनी एकत्र येऊन नागरी संघटनेची स्थापना केली आहे. नागरी संघटनेस 10 पैकी किती जागा मिळणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 

मळोली : पंचायत समिती सदस्य रणजितसिंह जाधव यांची 62 वर्षांपासून एकहाती सत्ता आहे. त्यांच्याविरोधात मोहिते-पाटील यांना मानणाऱ्या गटाने पॅनेल उभा केला आहे. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com