भीमा नदीकाठचा वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी महावितरणचे शर्थीचे प्रयत्न

DP Damage
DP Damage

मंगळवेढा (सोलापूर) : तालुक्‍यात गत आठवड्यातील अतिवृष्टी व महापुराने विस्कळित झालेला वीजपुरवठा पूर्ववत करण्यासाठी जीव धोक्‍यात घालून 42 वीज कर्मचारी विद्युत पुरवठा सुरळीत करण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करीत आहेत. 

शहरासह ग्रामीण भागात मुसळधार व संततधार पाऊस झाल्याने वीज यंत्रणेला मोठा फटका बसला. भीमा व माण नदीकाठ वगळता इतर भागातील वीजपुरवठा एका दिवसात पूर्ववत करण्याचे काम झाल्याने जीवन पूर्वपदावर आले. तर नदीकाठच्या उद्‌ध्वस्त झालेल्या वीज यंत्रणेला पूर्वपदावर आणण्यासाठी वीज कर्मचाऱ्यांनी कंबर कसली आहे. सुमारे 2 हजार 600 ग्राहकांचा विद्युत पुरवठा खंडित झाला आहे. तालुक्‍यात किती नुकसान झाले याचे सर्वेक्षण करण्यात येत आहे. अद्यापही नदीकाठी कित्येक विद्युत डीपी पाण्यात आहेत तर पोल उन्मळून पडले आहेत. 

नदीकाठचे अद्याप 52 डीपी पाण्यात असल्याने 650 वीज ग्राहकांचा विद्युत पुरवठा सुरू करता आला नाही. पाण्याच्या मोठ्या प्रवाहामुळे नदीकाठच्या शेतातील माती मोठ्या प्रमाणावर वाहून गेली आहे. परिणामी नदीकाठी मोठी दलदल निर्माण झाली आहे. विद्युत पोलची वाहतूक करणे मुश्‍किलीचे होत आहे. नुकतेच नदीकाठी विद्युत पोल घेऊन जाणारा टेम्पो चिखलात फसला होता. अद्यापही तब्बल 52 रोहित्रांच्या आजूबाजूने पाणी असल्याने विद्युत पुरवठा सुरू करणे धोक्‍याचे ठरणार आहे. दलदल कमी होताच बाधित कृषी पंपांचा विद्युत पुरवठा लवकरच सुरू केला जाणार आहे. 

नदीकाठच्या बठाण, उचेठाण, ब्रह्मपुरी, माचणूर, रहाटेवाडी, तामदर्डी, तांडोर, सिद्धापूर, अरळी या गावांतील वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी पाटील विद्युत कंपनीचे तब्बल 42 कामगार 16 ऑक्‍टोबरपासून महावितरणच्या कर्मचाऱ्यांसोबत काम करत आहेत, अशी माहिती उपकार्यकारी अभियंता संजयकुमार शिंदे यांनी दिली. 

नदीकाठचे सर्व सबस्टेशन, बठाण, ब्रह्मपुरी येथील पाणीपुरवठा, गावठाण फिडर, शेतीपंप फिडर सुरू करण्यात यश आले. नदीकाठचा वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी अधीक्षक अभियंता ज्ञानदेव पडळकर, कार्यकारी अभियंता संजय गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली उपकार्यकारी अभियंता संजयकुमार शिंदे, उपअभियंता नेताजी उघडे, तानाजी दुधाळ, सचिन वठारे, समीर मुलाणी आदी परिश्रम घेत आहेत. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com