
सहाय्यक अनुदानाची रक्कम नगरपालिकांना तातडीने न मिळाल्यास 5 जानेवारीपासून राज्यातील नगरपालिका कर्मचारी काम बंद आंदोलन सुरू करतील, असा इशारा राज्य नगरपरिषद कर्मचारी संघटनेचे सरचिटणीस सुनील वाळूजकर यांनी दिला होता. त्यानुसार आज (ता. 5) पासून येथील नगरपालिका कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन सुरू केले आहे.
पंढरपूर (सोलापूर) : गेल्या दोन वर्षांपासून राज्यातील नगरपालिकांमधील कर्मचाऱ्यांचे पगार वेळेवर होत नाहीत. 20 तारखेनंतर सहाय्यक अनुदानाची रक्कम नगरपालिकांना दिली जाते, त्यामुळे 1 तारखेऐवजी 22 अथवा 23 तारखेला पगार होतात. अनेक नगरपालिकांच्या कर्मचाऱ्यांचे नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्याचे पगार अद्याप झालेले नाहीत.
सहाय्यक अनुदानाची रक्कम नगरपालिकांना तातडीने न मिळाल्यास 5 जानेवारीपासून राज्यातील नगरपालिका कर्मचारी काम बंद आंदोलन सुरू करतील, असा इशारा राज्य नगरपरिषद कर्मचारी संघटनेचे सरचिटणीस सुनील वाळूजकर यांनी दिला होता. त्यानुसार आज (ता. 5) पासून येथील नगरपालिका कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन सुरू केले आहे.
श्री. वाळूजकर यांनी याविषयी माहिती दिली. ते म्हणाले, राज्यातील नगरपरिषदेच्या सर्व कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी देण्यात येणारी सहाय्यक अनुदानाची रक्कम राज्यातील सर्व नगरपरिषदांना 1 तारखेला देणे आवश्यक असते. परंतु आता 31 डिसेंबरअखेर अद्यापपर्यंत सहाय्यक अनुदानाची रक्कम नगरपरिषदांना मिळालेली नाही. त्यामुळे राज्यातील अनेक नगरपरिषदांना कर्मचाऱ्यांचे वेतन करता आलेले नाही. वास्तविक पाहता इतर शासकीय कर्मचाऱ्यांचे वेतन प्रत्येक महिन्याच्या 1 तारखेला दिले जाते. मात्र नगरपरिषदांना प्रत्येक महिन्याच्या 20 तारखेनंतर सहाय्यक वेतन अनुदानाची रक्कम दिली जाते. त्यामुळे गेल्या दोन वर्षांपासून नगरपरिषद कर्मचाऱ्यांचे वेतन प्रत्येक महिन्याच्या 22 ते 23 तारखेला होते. ही बाब शासकीय कर्मचाऱ्यांमध्ये दुजाभाव करणारी आहे.
राज्यातील नगरपरिषद कर्मचाऱ्यांनी नोव्हेंबर महिन्याचे वेतन न झाल्याने शासनाचे लक्ष वेधण्यासाठी 29 डिसेंबर रोजी नगरपरिषदांच्या समोर बोंबाबोंब आंदोलन केले होते. हे आंदोलन होऊनसुद्धा शासनाने नगरपरिषद कर्मचाऱ्यांच्या वेतनाची रक्कम अदा केलेली नाही. त्यामुळे नोव्हेंबर आणि डिसेंबरचे वेतन न झाल्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे. राज्यातील नगरपरिषदांची कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आर्थिक परिस्थिती चांगली नसल्याने बहुतांश नगरपरिषदा फंडातून वेतन अदा करू शकत नाहीत. त्यामुळे शासनाने तातडीने दोन महिन्यांचे सहाय्यक वेतन अनुदान देणे गरजेचे आहे.
सहाय्यक वेतन अनुदानाची रक्कम राज्यातील नगरपालिकांना त्वरित न मिळाल्यास 5 जानेवारीपासून सफाई कर्मचाऱ्यांच्या सह सर्व कर्मचारी काम बंद आंदोलन सुरु करतील असा इशारा देण्यात आला होता. काल सोमवारी पंढरपूर नगरपालिका कर्मचाऱ्यांच्या वतीने मुख्याधिकारी अनिकेत मानोरकर यांना आंदोलनाच्या विषयी कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष महादेव आदापुरे, कार्याध्यक्ष नाना वाघमारे, सहकार्याध्यक्ष शरद वाघमारे यांनी लेखी निवेदन दिले होते. शासनाकडून कार्यवाही न झाल्यामुळे आजपासून पंढरपूरसह राज्यातील अनेक नगरपालिकांमधील कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन सुरू केले आहे.
संपादन : श्रीनिवास दुध्याल