सिग्नल यंत्रणा असूनही बंद ! परिणामी बकरी पाहायला निघालेला मटन विक्रेता "येथे' अपघातात ठार

तात्या लांडगे 
Tuesday, 15 September 2020

सग्गमनगर परिसरात इस्माईल यांच्या इम्रान नावाच्या मुलाचा मटन विक्रीचा व्यवसाय आहे. ते मुलाला दररोज मदत करीत होते. सोमवारी त्यांना बकरी खरेदी करायची होती. दुपारी चारच्या सुमारास ते बाजार समितीसमोरील चौकातून सायकलवरून निघाले होते. त्याचवेळी बोरामणी नाक्‍याकडून सिमेंटने भरलेला ट्रक जात होता. त्यांना ट्रक दिसल्यानंतर सायकल मागे घेण्याच्या प्रयत्नात त्यांचा तोल गेला आणि ते ट्रकच्या मागील चाकाखाली आले. 

सोलापूर : हैदराबाद रोडवरील जुने विडी घरकुल परिसरातील सग्गम नगरात राहणारे इस्माईल बाबूमियॉं तांबले (वय 65) हे मुलाच्या मटन दुकानात त्याला मदतीचे काम करतात. सोमवारी (ता. 14) ते काम आटोपून सायकलवरून बकरी पाहायला निघाले होते. मात्र, कृषी उत्पन्न बाजार समितीसमोर त्यांचा अपघात झाला आणि जागीच त्यांचा मृत्यू झाला. 

हेही वाचा : "धडधड' अजून मंदच ! साडेचार कोटींची उलाढाल आली अडीच कोटींवर; अनेक "टेक्‍स्टाईल' बंदच 

सग्गमनगर परिसरात इस्माईल यांच्या इम्रान नावाच्या मुलाचा मटन विक्रीचा व्यवसाय आहे. ते मुलाला दररोज मदत करीत होते. त्यांना दोन मुले व तीन मुली असून दुसरा मुलगा कोल्हापुरात असतो. सोमवारी ते मुलाच्या मटन दुकानातील काम संपवून विडी घरकुल परिसरातील बकरी पाहायला निघाले होते. दुसऱ्या दिवशी मंगळवार (ता. 15) असल्याने ग्राहकांची मोठी गर्दी असते, त्यामुळे त्यांना बकरी खरेदी करायची होती. दुपारी चारच्या सुमारास ते बाजार समितीसमोरील चौकातून सायकलवरून निघाले होते. त्याचवेळी बोरामणी नाक्‍याकडून सिमेंटने भरलेला ट्रक जात होता. त्यांना ट्रक दिसल्यानंतर सायकल मागे घेण्याच्या प्रयत्नात त्यांचा तोल गेला आणि ते ट्रकच्या मागील चाकाखाली आल्याचा अंदाज असल्याचे जोडभावी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक शिवशंकर बोंदर यांनी सांगितले. अपघातानंतर सिमेंटचा ट्रक (केए- 32 डी 0810) व ट्रकचालक लहू सुभाष राठोड (रा. औसा तांडा, लातूर) याला पोलिसांनी ताब्यात घेतले असून, त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

सिग्नल यंत्रणा असूनही वापर नाही 
कृषी उत्पन्न बाजार समितीत जाणारी वाहनांची वर्दळ, विजयपूर आणि हैदराबाद रोडवरून ये-जा करणारी वाहने आणि रस्त्यालगत थांबलेली वाहने, हातगाड्यांच्या गर्दीमुळे रस्त्याचा श्‍वास कोंडला आहे. पादचाऱ्यांना जीव मुठीत धरून रस्ता ओलांडावा लागत आहे. बाजार समितीसमोर मागील दोन वर्षांत आठ ते दहा जणांचा अपघाती मृत्यू झाला आहे. वारंवार त्या ठिकाणी लहान-मोठे अपघात होतात. तरीही त्या ठिकाणी सिग्नल यंत्रणा कार्यान्वित करण्यात आलेली नाही. दुसरीकडे, हेरिटेजजवळील छोट्या चौकात मात्र, आवर्जून सिग्नल यंत्रणा सुरू असते, अशी विचित्र स्थिती पाहायला मिळते. तर जड वाहतुकीस बंदी असतानाही तो ट्रक तिथंपर्यंत आलाच कसा, असाही प्रश्‍न उपस्थित होऊ लागला आहे. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: A mutton seller who went to see a goat was killed in an accident