थॅलेसिमिया, ल्युकेमिया व हिमोफिलिया रुग्णांसाठी हवे डे केअर सेंटर; जागा आणि निधीचा लागेना मेळ !

Thalassemia
Thalassemia

सोलापूर : सोलापूर जिल्हा व सीमावर्ती भागातील थॅलेसिमिया, ल्युकेमिया व हिमोफिलिया रुग्णांना नियमित उपचार मिळावेत यासाठी शासनाने डे केअर सेंटरला मंजुरी दिली. मात्र अद्याप या सेंटरची उभारणी झालेली नाही. या सेंटरच्या अभावी या आजाराचे रुग्ण उपचारापासून वंचित राहात आहेत. सोलापूर जिल्ह्यातील रुग्णांसाठी एकाच छताखाली रक्त व रक्त घटकांचा पुरवठा, औषधी, नियमित तपासणी या सर्व सेवा एकाच ठिकाणी मिळाव्यात यासाठी अशा प्रकारच्या सेंटरची गरज आहे. 

विशेष म्हणजे या तीनही आजारांचे बहुतांश रुग्ण हे बालवयातील आहेत. या बालकांना पुणे, मुंबई, कोल्हापूर येथे उपचारासाठी नेणे आर्थिकदृष्ट्या देखील हे पालकांना परवडत नाही. म्हणून या ठिकाणी डे केअर सेंटरची मागणी केली गेली होती. या सेंटरमध्ये एकाच छताखाली रक्त व रक्तघटक पुरवठा, औषधी, तपासणी व उपचाराची सोय करता येऊ शकते. तसेच शरीरातील लोह तपासणीसाठी विविध तपासण्या, रक्त तपासण्या करण्याची सोय होऊ शकते. एमआरआय यंत्रणेची सेवा मिळू शकते. या रुग्णांच्या हाडातील ठिसूळपणा तपासण्यासाठी टू टी स्टार यंत्रणा देखील आवश्‍यक आहे. त्यासाठी वर्ष 2017 मध्ये डे केअर सेंटर उभारणीसाटी निधी उपलब्ध झाला होता. मात्र नंतर हा निधी परत गेला. त्यानंतर बालरोगचिकित्सा विभागाने डे केअर सेंटरसाठी जागा नूतनीकरण करून द्यावे, असे पत्र जिल्हा शल्य चिकित्सकांना 29 ऑगस्ट 2019 ला दिले होते. मात्र आता या कामासाठी निधी उपलब्ध नाही. त्यामुळे डे केअर सेंटरचे काम अडकले आहे. निधी उपलब्ध होता त्या वेळी जागा उपलब्ध झाली असती तर डे केअर सेंटर उपलब्ध झाले असते. 

कोरोनामुळे कोल्हापूर व सातारा जिल्हा रुग्णालयात ही औषधी जादा प्रमाणात उपलब्ध होती. समवेदना फाउंडेशनच्या पदाधिकाऱ्यांनी सोलापूर येथील गरजूंपर्यंत ही औषधी पुरवली. मुळात या रुग्णांची योग्य काळजी, वेळेवर उपचार केले गेले नाही तर त्यांच्या आयुष्याच्या कालावधीवर त्याचा विपरीत परिणाम होतो. त्यामुळे सोलापूरमध्येच उपचाराची सोय असावी. 

हिमोफिलिया रुग्णाचे पालक पोपट कादे म्हणाले, सोलापूरमध्ये रक्तपेढीत फॅक्‍टर 8 हा रक्तघटक मिळत नाही. त्यामुळे दरवेळी आम्हाला पूणे येथे जावून आणावा लागतो.त्या साठी मोठा खर्च येतो. आर्थिक स्थिती कमजोर असल्याने शासनाने सोलापूरमध्ये रक्त घटक व औषधी मोफत उपलब्ध करणे गरजेचे आहे. 

ठळक... 

  • सोलापूरमध्ये थॅलेसिमियाचे नोंदणीकृत 460 रुग्ण 
  • अनोंदणीकृत व निदान न झालेल्यांची संख्या मोठी 
  • हिमोफिलिया आजाराचे 50 ते 60 रुग्ण 
  • सिकलसेल ऍनिमियाचे रुग्ण 25 
  • ल्युकेमिया आजाराचे रुग्ण 25 

संपादन : श्रीनिवास दुध्याल

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com