लेकीच्या लग्नमंडवळ्या घेऊन निघालेल्या पित्यावर काळाचा घाला

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 6 फेब्रुवारी 2020

  • बार्शी-सोलापूर रोडवर काळेगाव पाटीजवळ अपघात 
  • दोन दुचाकी वाहनांची समोरासमोर धडक 
  • अपघातानंतर दोन्ही दुचाकी जळून खाक 
  • अपघाता तीन जण गंभीर जखमी

वैराग (जि. सोलापूर) : लेकीच्या लग्नमुंडवळ्या घेऊन घराकडे जाणाऱ्या वडिलांचा अपघातात मृत्यू झाला. बार्शी ते सोलापूर रस्त्यावर काळेगाव (ता. बार्शी) येथील पाटीजवळ हा अपघात झाला. रामचंद्र अश्‍वमेद मोटे (रा. वाळूज, ता. मोहोळ) असे अपघातात मृत्यू झालेल्या पित्याचे नाव असून या घटनेने वाळूज गावावर शोककळा पसरली आहे. 

हेही वाचा - गप्प जा... नाही तर डोक्‍यात दगड घालीन... 

दरम्यान, दोन्ही दुचाकींची समोरासमोर जोरदार धडक झाल्याने दोन्ही दुचाकींनी पेट घेतला. यात तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. गुरुवारी (ता. 6 फेब्रुवारी) दुपारी पावणेतीनच्या दरम्यान ही घटना घडली. हा अपघात एवढा भीषण होता की, दोन्ही दुचाकी पेटून आगीचा मोठा भडका उडला. यात रामचंद्र अश्‍वमेद मोटे (वय 45, रा. वाळूज, ता. मोहोळ) यांचा जागीच मृत्यू झाला. तर त्यांचा भाऊ सुरतिशेन अश्‍वमेद मोटे (वय 47) हे गंभीर जखमी झाले. 
दारी मंडप सजला, घरी थोरल्या लेकीच्या लग्नाची लगीनघाई, हळदीची तयारी झाली, पाहुण्या-रावळ्यांना निमंत्रणे गेली. वाळूज येथे मोटे कुंटुंबात असा आनंदाचा माहोल असताना नवरीच्या वडील व चुलत्यांचा अपघात झाल्याची वार्ता येऊन धडकली. अन्‌ लगीन घरात दुःखाचा डोंगर कोसळला. त्यातच दुसरी बातमी धडकली वधू पित्याचा मृत्यू झाल्याची, अन्‌ नवरीची आई, नवरी मुलगी व नातेवाइकांनी हंबरडा फोडला. आनंदाचे वातावरण एकदम दुःखी झाले. गावात ही वार्ता पसरताच पाहुणे-रावळे, आप्तेष्ठ, नातेवाईक हे शोकसागरात बुडाले. 

हेही वाचा - भारीच की... शिक्षकांनी नेली माता पालकांची सहल 

रामचंद्र मोटे यांच्या मुलीचा विवाह दोन दिवसांवर म्हणजे 9 फेब्रुवारीला आहे. सुरतिशेन मोटे व रामचंद्र मोटे हे दोघे भाऊ दुचाकीवर बार्शीला गेले होते. मुलीचा विवाह असल्याने पाहुण्यांना लग्नपत्रिका देण्यासाठी व अन्य साहित्य खरेदी करून बार्शी येथून गावाकडे निघाले होते. तेव्हा वैरागकडून येणाऱ्या दुचाकीची समोरासमोर जोराची धडक झाल्याने दुचाकीचा भडका उडाला. त्यात दुचाकी जळून खाक झाल्या. दुसरी दुचाकी उस्मानाबाद येथील असल्याचे समजते. त्यामुळे त्या जखमीची नावे कळू शकली नाहीत. 
घटनास्थळी पत्रावळी, द्रोण, लग्न मुंडवळी, मेंदी, नेलपॉलिश असे नवरी मुलीचे साज साहित्य रक्ताने माखून पडलेले दिसत होते. जखमींवर बार्शी येथे उपचार सुरू असून या अपघाताची नोंद करण्याचे काम वैराग पोलिस ठाण्यात सुरू आहे. मृत रामचंद्र मोटे यांच्या पश्‍चात आई, पत्नी, दोन भाऊ, भावजया, एक मुलगा, मुलगी असा परिवार आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: One killed in accident near Kalegaon Pati on Barshi Solapur road