रोजगार हिरावला ! बचत गटांच्या दहा लाख महिला बेरोजगार 

तात्या लांडगे
Tuesday, 24 March 2020

  • कोरोनामुळे देशातील ठप्प बाजारपेठांचा फटका 
  • गावगाड्यातील ठप्प झाली कोट्यवधींची उलाढाल 
  • वस्तूंची मागणी घटली : हातावर पोट असलेल्या महिलांची अडचण 
  • परजिल्ह्यातील व परराज्यात वस्तूंना मागणीच नाही : बॅंकांचे कर्ज फेडण्याची चिंता 

सोलापूर : महिला आर्थिक विकास महामंडळ व बॅंकांच्या मदतीने गावगाड्यातील महिलांनी उद्योग क्षेत्रात आघाडी घेतली. 'चूल अन्‌ मूल' ही मर्यादा ओलांडून बचत गटांच्या माध्यमातून ग्रामीण महिला आता अमेरिकेसारख्या प्रगत राष्ट्रात पोहचल्या आहेत. मात्र, कोरोना या वैश्‍विक संकटाला हद्दपार करण्याच्या हेतूने बचत गटांनी हातावर पोट असलेल्या तब्बल दहा लाखांहून अधिक महिलांना घरी बसण्याचा सल्ला दिला आहे. 

हेही नक्‍की वाचा : सोलापुरात येणाऱ्या सीमा केल्या सिल 

 

राज्यभरात एक लाख 52 हजार 827 बचत गटांची नोंदणी असून त्यामध्ये तब्बल 27 लाख 39 हजार महिला सभासद आहेत. दरमहा सरासरी साडेसहा कोटींची उलाढाल असलेल्या बचत गटांच्या वस्तू महाराष्ट्रासह कर्नाटक, राजस्थान, दिल्ली, आंध्र प्रदेश, उत्तर प्रदेश या राज्यांमध्ये पोहचल्या आहेत. तसेच अमेरिका, ऑस्ट्रोलिया, ब्रिटनमध्येही बचत गटांच्या विविध वस्तूंना मागणी असते. मात्र, मागील काही दिवसांपासून देशभर कोरोनाच्या संकटामुळे बचत गटांचा गावगाडा बंद पडला आहे. 55 टक्‍के बचत गटांच्या महिला कोरोनाच्या भितीने व सरकारच्या आवाहनानुसार घरीच बसल्या असून गावातच विक्री होईल, अशा वस्तूंचे उत्पन्न कमी प्रमाणात सुरु ठेवले आहे. सोलापूर जिल्ह्यातील बचत गटांना आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून तब्बल 100 कोटी रुपयांचे कर्जवाटप केले आहे. मार्चएण्डमुळे अधिक व्याजदर अथवा दंड लागू नये म्हणून बॅंकांमध्ये कर्जाची रक्‍कम भरण्यास जाणाऱ्या महिलांना सवलत देण्याची मागणी महामंडळाचे जिल्हा समन्वयक सोमनाथ लामगुंडे यांनी केली आहे. 

हेही नक्‍की वाचा : कोरोना ! जिल्ह्यात नो व्हेईकल, नो सायकल 

कोरोना हद्दपार व्हावा : बचत गटांचा व्यवसाय ठप्प 
बचत गटाच्या माध्यमातून मसाले निर्मितीचा व्यवसाय सुरु केला. त्यासाठी आठ- दहा महिलांना रोजगार मिळाला, मात्र कोरोनामुळे व्यापार ठप्प झाल्याने त्यांना घरीच बसायला सांगितले. पुणे, मुंबई, बारामती, नंदूरबार येथे मसाले विक्री होत होती, परंतु आता बंद आहे. 
- सरिता माने, पिरळे (ता. माळशिरस), सोलापूर 

हेही नक्‍की वाचा : घाबरु नका ! कलम 144 मधून 'हे' वगळले 

महिला कामगार केले कमी 
बचत गटाच्या माध्यमातून तयार केलेल्या स्कूल बॅग्ज्‌ पंढरपूर, बार्शी, टेंभूर्णी, अकलूज, इंदापूर, कुर्डूवाडीसह अन्य ठिकाणी घाऊक विक्री होते. त्यासाठी पाच-सहा महिला कामाला होत्या. मात्र, आता कोरोनामुळे सर्वत्र बंदी असल्याने त्यांना घरी बसायला सांगितले असून उलाढाल सध्या ठप्पच आहे. 
- सुष्मा अहिरे, वेळापूर (ता. माळशिरस), सोलापूर 

हेही नक्‍की वाचा : मेगाभरती लांबणीवर ! मुदतवाढीनंतर नियुक्‍त होणार पाच कंपन्या 

राज्यातील बचत गटांचा पसारा 
एकूण बचत गट 
1.52 लाख 
महिला सभासद 
27.39 लाख 
दरमहा उलाढाल 
सरासरी 6.40 कोटी 
रोजगाराअभावी घरी बसलेल्या महिला 
10.32 लाख  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: One million women unemployed from savings group