कोरोनाचा प्रसार थांबवायचाय? पीक कर्जासाठी करा ऑनलाइन अर्ज 

सकाळ वृत्तसेवा 
शुक्रवार, 26 जून 2020

ऑनलाइन अर्ज परिपूर्ण माहितीनिशी भरावा. त्यानंतर तो अर्ज जिल्हा अग्रणी बॅंकेमार्फत संबंधित बॅंकेच्या जिल्हा समन्वयक यांच्याकडे पाठवण्यात येईल. जिल्हा समन्वयक ती माहिती संबंधित शाखेकडे पाठवतील. यादी प्राप्त झाल्यानंतर संबंधित बॅंक शाखेकडून पीक कर्ज घेण्यास पात्र असणाऱ्या शेतकऱ्यांना कळविण्यात येईल.

सोलापूर : कोरोना विषाणूचा प्रसार होऊ नये, यासाठी सोलापूर जिल्ह्यातील पीक कर्जासाठी इच्छुक शेतकऱ्यांनी प्रत्यक्ष बॅंकेत येणे टाळून https://solapur.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाइन अर्ज भरून पीक कर्ज मागणी नोंदणी करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी केले आहे. या लिंकद्वारे नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांची यादी जिल्हा अग्रणी बॅंकेमार्फत संबंधित बॅंकेकडे पाठविण्यात येणार आहे. एका आधार कार्डधारकास एका बॅंकेतच पीक कर्ज मागणी करता येणार आहे. त्यामुळे आपले गाव ज्या बॅंकेला दत्तक आहे, त्या बॅंकेचे नाव ऑनलाइन अर्ज भरताना टाकणे आवश्‍यक आहे, असेही श्री. शंभरकर यांनी सांगितले. 

हेही वाचा : "पंतप्रधान मोदींनी जनतेची व भारतीय जवानांची माफी मागावी' 

अग्रणी बॅंक ऑफ इंडियाचे विभागीय व्यवस्थापक अजय कडू म्हणाले, हा अर्ज परिपूर्ण माहितीनिशी भरावा. त्यानंतर तो अर्ज जिल्हा अग्रणी बॅंकेमार्फत संबंधित बॅंकेच्या जिल्हा समन्वयक यांच्याकडे पाठवण्यात येईल. जिल्हा समन्वयक ती माहिती संबंधित शाखेकडे पाठवतील. यादी प्राप्त झाल्यानंतर संबंधित बॅंक शाखेकडून पीक कर्ज घेण्यास पात्र असणाऱ्या शेतकऱ्यांना कळविण्यात येईल. अर्जदार शेतकऱ्याने अर्ज केल्यापासून तीन दिवसांनंतर संबंधित शाखेत पुढील कागदपत्रांसह संपर्क साधावा (आधार कार्ड, सातबारा, आठ अ, फेरफार नक्कल, पॅनकार्ड, टोचन नकाशा, पासपोर्ट साइज फोटो, पासबुक). अंतिम पीक कर्ज मंजुरी बॅंकेच्या नियमाप्रमाणे करण्यात येईल. सर्व राष्ट्रीयीकृत, ग्रामीण व जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या सर्व जिल्हा समन्वयकांनी व शाखाधिकारी यांनी नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांची यादी जिल्हा अग्रणी बॅंक व्यवस्थापक यांच्याकडून प्राप्त करून घ्यावी, अशा सूचना देण्यात आल्या असल्याचे श्री. कडू यांनी सांगितले. 

हेही वाचा : सोलापूरच्या ग्रामीण भागात उद्यापासून सलूनची दुकाने सुरू 

बॅंक ऑफ इंडियाचा पुढाकार 
सोलापूर जिल्ह्यासाठी बॅंक ऑफ इंडिया अग्रणी बॅंक आहे. बॅंकेच्या जिल्ह्यात 56 शाखा आहेत. या पोर्टलद्वारे प्राप्त झालेल्या तीन हजार 534 अर्जांपैकी दोन हजार 403 अर्ज मंजूर करण्यात आले आहेत. उर्वरित अर्जांवर प्रक्रिया सुरू आहे. महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत लाभ मिळालेल्या शेतकरी खातेदारांना नवीन कर्ज देण्यासाठी सर्व शाखांना सूचना देण्यात आल्या असल्याचे त्यांनी सांगितले. पीक कर्जाबरोबरच खेळते भांडवल, शेती विकास कर्ज, पशुसंवर्धन आदींसाठी लागणारे कर्जही दिले जाईल, असे श्री. कडू यांनी सांगितले. पीक कर्जाचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी प्रयत्नशील असल्याचेही त्यांनी सांगितले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Online application for crop loan now to stop the spread of corona virus