"या' विद्यार्थ्यांना पडली सोलापूरच्या संस्कृतीची भुरळ

प्रशांत देशपांडे
गुरुवार, 23 जानेवारी 2020

जगन्नाथपुरी संस्कृत विद्यापीठ, पुरी (ओरिसा) येथील विद्यार्थी व प्राध्यापकांच्या अभ्यास मंडळाने मकर संक्रांतीनिमित्त शेंगापोळी, बाजरीची भाकरीचा आस्वाद घेतला. आपल्या सहा दिवसांच्या कार्य प्रक्रियेत त्यांनी विद्यापीठाच्या परिसराला भेट देत विविध संकुलांत चालणाऱ्या निरनिराळ्या अभ्यासक्रमांबाबत तसेच अभिनव उपक्रमांबाबत माहिती घेतली. ग्रामदैवत श्री सिद्धेश्‍वर महाराजांच्या उत्सवानिमित्त होणाऱ्या गड्डा यात्रेत या संघाने सहभाग घेऊन उत्साहाने सोलापूरचे सांस्कृतिक व आध्यात्मिक वैभव अनुभवले.
 

सोलापूर : पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या "एक भारत श्रेष्ठ भारत' अभियानांतर्गत सोलापूर विद्यापीठाला भेट देण्यासाठी आलेल्या जगन्नाथपुरी संस्कृत विद्यापीठ, पुरी (ओरिसा) येथील विद्यार्थी व प्राध्यापकांच्या अभ्यास मंडळाला सोलापूरच्या संस्कृतीची भुरळ पडली. सांस्कृतिक देवाण-घेवाणीसाठी विद्यापीठात आलेल्या या अभ्यास मंडळाने सोलापूरच्या इतिहास, संस्कृती आणि परंपरांचा गौरव केला.

 

हेही वाचा - मेंढीची किंमत ऐकून तुम्हीही व्हाल चकित

 

कृषी, पर्यटन, पुरातत्त्वशास्त्र, पत्रकारिता विभागांची घेतली माहिती
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या "एक भारत श्रेष्ठ भारत' या योजनेतून जगन्नाथपुरी विद्यापीठाच्या चमूने 12 ते 18 जानेवारीदरम्यान सोलापूर विद्यापीठाला भेट दिली. या वेळी प्रा. यशपाल खेडकर व डॉ. राऊत यांनी त्यांचे स्वागत केले. पहिल्या दिवशी मकर संक्रांतीनिमित्त शेंगापोळी, बाजरीची भाकरी असा पारंपरिक बेत या मंडळाने जेवणात अनुभवला. त्यांनी याची अधिकची माहिती मोठ्या उत्सुकतेने जाणून घेतली. आपल्या सहा दिवसांच्या कार्य प्रक्रियेत त्यांनी विद्यापीठाच्या परिसराला भेट देत विविध संकुलांत चालणाऱ्या निरनिराळ्या अभ्यासक्रमांबाबत तसेच अभिनव उपक्रमांबाबत माहिती घेतली. ग्रामदैवत श्री सिद्धेश्‍वर महाराजांच्या उत्सवानिमित्त होणाऱ्या गड्डा यात्रेत या संघाने सहभाग घेऊन उत्साहाने सोलापूरचे सांस्कृतिक व आध्यात्मिक वैभव अनुभवले. सोलापूरचे औद्योगिक क्षेत्रातले योगदान अभ्यासण्यासाठी या मंडळाने सोलापुरातील वस्त्रोद्योगाला भेट देत येथील वस्त्रनिर्मितीच्या प्रक्रियेचा अभ्यास केला. या चमूने पंढरपुरातील चंद्रभागा परिसर, संगीत साहित्य बनवण्याचा कारखाना, गजानन महाराज मठ आदी ठिकाणी भेट दिली. पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठातील कृषी, पर्यटन विभाग, पुरातत्त्वशास्त्र विभाग व पत्रकारिता विभागातील शैक्षणिक घडामोडींची माहितीही घेतली.

हेही वाचा - पुतण्याकडे "ओबीसी' तर खासदारांकडे "एससी'चे प्रमाणपत्र

यांनी केले सहकार्य
हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी विद्यापीठाच्या कुलगुरू प्रा. डॉ. मृणालिनी फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यापीठाच्या विद्यार्थी विकास मंडळाचे संचालक प्रा. डॉ.. वसंत कोरे, सामाजिक शास्त्र संकुलाचे संचालक प्रा. डॉ.. प्रभाकर कोळेकर, "एक भारत श्रेष्ठ भारत' अभियानाचे समन्वयक तथा विद्यार्थी विकास विभागाचे जिल्हा समन्वयक प्रा. यशपाल खेडकर, प्रा. रवींद्र चिंचोळकर, प्रा. डॉ.. माया पाटील, प्रा. ममता बोल्ली, प्रा. तेजस्विनी कांबळे, प्रा. अंबादास भास्के, नानक लटके, प्रा. डॉ.. शृंगारे आदींचे सहकार्य लाभले.

अनेक बाबींचा केला अभ्यास
या उपक्रमांमध्ये जगन्नाथपुरी संस्कृत विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांनी भाषाशास्त्र विभागामध्ये विशेषत्वाने संस्कृतमध्ये सर्वांशी संवाद साधला. त्याचबरोबर सोलापूरच्या सांस्कृतिक चळवळीचा इतिहास, स्वातंत्र्याच्या संघर्षाचा इतिहास, सोलापूरची उद्योग संस्कृती, खाद्यसंस्कृती, सोलापूरमध्ये बोलल्या जाणाऱ्या विविध भाषा, त्यांचे ओडिसी भाषेशी असणारे साधर्म्य, मराठी साहित्य, सोलापूरचे सांस्कृतिक वैभव, पुरातत्त्व शास्त्रांमध्ये सोलापुरात चालणारे संशोधन, पत्रकारिता क्षेत्रातले नवे प्रवाह अशा अनेक बाबी या अभ्यास मंडळाने अभ्यासल्या.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Orisa students are fascinated by the culture of Solapur