मोठी बातमी : पंढरपूरची चैत्री यात्रा इतिहासात पहिल्यांदाच रद्द 

अभय जोशी 
Sunday, 29 March 2020

देशात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठया प्रमाणात वाढला आहे. हा व्हायरस तीव्र संसर्गजन्य स्वरूपाचा असलेने महाराष्ट्र राज्यामध्ये दिवसेंदिवस रूग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे तातडीने खबरदारीच्या प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे अत्यावश्‍यक असल्याने भाविकांच्या सुरक्षतेच्या दृष्टीने श्री विठ्ठल रूक्‍मिणी मंदिर 17 मार्चपासून 31 मार्चपर्यंत 
मंदिर भाविकांसाठी बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला होता.

पंढरपूर (सोलापूर) : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर श्री विठ्ठल- रुक्‍मिणी मंदिर समितीकडून मुख्यमंत्री सहायता निधीसाठी एक कोटी रुपयांचा निधी देण्याचा आणि पंढरपूर येथील 4 एप्रिल रोजी होणारी चैत्री यात्रा रद्द करण्याचा निर्णय आज मंदिर समितीने घेतला. श्री विठ्ठल-रुक्‍मिणी मंदिर समितीचे सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर व कार्यकारी अधिकारी विठ्ठल तथा सुनील जोशी यांनी याविषयी माहिती दिली. 
देशात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठया प्रमाणात वाढला आहे. हा व्हायरस तीव्र संसर्गजन्य स्वरूपाचा असलेने महाराष्ट्र राज्यामध्ये दिवसेंदिवस रूग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे तातडीने खबरदारीच्या प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे अत्यावश्‍यक असल्याने भाविकांच्या सुरक्षतेच्या दृष्टीने श्री विठ्ठल रूक्‍मिणी मंदिर 17 मार्चपासून 31 मार्चपर्यंत 
मंदिर भाविकांसाठी बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. सद्य परिस्थिती पाहता आता 14 एप्रिलपर्यंत मंदिर बंद ठेवण्यात यावे असाही निर्णय आज झाला. कोरोनाच्या संदर्भात राज्य शासनाकडून नागरिकांसाठी विविध उपाय योजना व सोईसुविधा उपलब्ध करून दिल्या जात आहेत. अशा परिस्थितीत मानवतावादी भूमिकेतून व सामाजिक उत्तरदायित्व म्हणून मंदिर समितीने प्रशासनास मेडिकल किट उपलब्ध करून देण्याचा निर्णय यापूर्वीच घेतला आहे. पंढरपूर शहर-परिसरातील भिकारी व निराधार नागरिकांसाठी अन्नाची पाकिटे पुरवली जात आहेत. राज्य शासनाला आर्थिक मदत करणे ही काळाजी गरज आहे. ही बाब विचारात घेवून श्री विठ्ठल रुक्‍मिणी मंदिरे समिती, पंढरपूरच्या वतीने मुख्यमंत्री सहायता निधी साठी एक कोटी रुपयांचा निधी देण्याचा निर्णय घेण्यात आला. 

चैत्री यात्रा रद्द 
4 एप्रिलला पंढरपूरची चैत्री यात्रा होती. या यात्रेला अंदाजे 3 ते 4 लाख भाविक महाराष्ट्र व इतर राज्यातून येतात. केंद्र शासनाने 14 मार्च पर्यंत संपूर्ण देशभरात लाकडाऊन केला आहे. आंतरजिल्हा प्रवास करण्यास राज्य शासनाने बंदी घातली आहे अशा पार्श्वभूमीवर एवढया मोठया प्रमाणावर पंढरपूरात भाविक आले तर कोरोना व्हायरसचा मोठा संसर्ग होऊ शकतो. ही बाब विचारात घेवून मंदिर समितीने चैत्री यात्रा रद्द करण्याचा निर्णय आज घेतला. मात्र या कालावधीत श्रींचे सर्व नित्योपचार परंपरेनुसार सुरू राहतील. प्रतिवर्षाप्रमाणे परंपरेनुसार येणाऱ्या सर्व दिंडया व सर्व पायी येणाऱ्या वारकरी भाविकांनी यात्रा रद्द झाली असल्याने पंढरपूरला येऊ नये असे आवाहन मंदिर समितीच्या वतीने करण्यात आले आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Pandharpur Chaitri Yatra canceled for the first time in history