हक्काची कमाई गेल्याने पदरी निराशा 

old age man.jpg
old age man.jpg

सोलापूर : गावातील भाजी मंडईत गाडा ओढणे अन्‌ दुकानाच्या जाळ्याला कुलूप लावून स्वतःचे पोट भरणाऱ्या मारुती माळवण-म्हेत्रे यांची दोन महिन्यांपासून काही कमाई झालेली नाही. मात्र एकाने लॉकडाउन उठेपर्यंत त्यांच्या जेवणाची सोय केली आहे. एवढाच काय तो आधार त्यांना मिळाला आहे. परंतु, नुसते पोट भरून चालत नाही. उदरनिर्वाहासाठी इतरही गोष्टी आवश्‍यक असतात. जवळ फारशी रक्कम नसल्याने त्यांची परिस्थिती हलाखीची झाली आहे. मेहनतीचे काम व त्यावरील हक्काची कमाई गेल्याने ते निराश असतात. 

शहरातील लक्ष्मी मार्केटचा परिसर लॉकडाउनपूर्वी गजबजलेला असायचा. तेथेच मारुतीरावांचा कायमचा मुक्काम असायचा. 1984 ला भाजी मंडईत आले. गावाकडे घरची माणसं ठेवून ते येथे एकटेच राहतात. तेव्हापासून सर्व भाजी मंडईंतील सर्व दुकानदारांचे ते सोबती झाले. दिवसभर भाज्यांची वाहतूक करणे, हॉटेलचे सामान नेऊन देण्याचे काम ते करतात. त्यांच्याकडे एक लोखंडी हातगाडा आहे. त्याच्या मदतीने हे काम करतात. वयाची सत्तरी ओलांडली तरी काटक प्रकृतीचे मारुतीराव हे काम करतात. तरुणपणात एक क्विंटलचे वजन ते सहज उचलून नेत असत. सायंकाळी सर्व व्यापारी त्यांच्या भरवशावर घरी जातात. सर्व दुकानांच्या लोखंडी जाळ्या बसवून त्यांना कुलपे घालण्याचे काम ते करतात. सकाळी बाजार सुरू झाल्यानंतर कुलपे उघडून देण्याचे कामही त्यांच्याकडे आहे. 

या कामासाठी त्यांना 10-20 रुपये मिळतात. हमालीचे काम व कुलपे लावण्याच्या कामातून त्यांना 200 ते 300 रुपये मिळतात. रात्रीच्या वेळी भाजी मंडईच्या ओट्यावर झोपून ते रात्र काढतात. जेवढी कमाई आली त्यातच जेवणाचा व कपड्याचा खर्च भागवतात. मात्र, लॉकडाउन सुरू झाल्यापासून भाजी मंडई बंद आहेत. सर्व व्यवहार ठप्प आहेत. त्यानंतर येथील विक्रेते शासनाने ठरवलेल्या जागेत भाजी व फळे विकत आहेत. यानंतर मारुतीरावांचे हाल सुरू झाले. 200 रुपयांच्या जागी 30 ते 40 रुपयांची कमाई देखील आज त्यांना मिळेना. त्याची ही परिस्थिती एका नागरिकाला कळाली. तेव्हा त्यांनी मारुतीरावांना बोलावून लॉकडाउन उठेपर्यंत माझ्याकडून जेवण घेऊन जायचे असे सांगितले. त्यामुळे उपासमारीतून ते वाचले आहेत; परंतु जवळ फारशी रक्कम नसल्याने त्यांची परिस्थिती हलाखीची झाली आहे. मेहनतीचे काम व त्यावरील हक्काची कमाई गेल्याने ते आताही महामारीच्या परिस्थितीला दोष देत आहेत. 
 

 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com