
सर्वोपचार रुग्णालयात दररोज दोन हजारांहून अधिक रुग्ण उपचारासाठी येतात. त्यात सोलापूर जिल्ह्यासह उस्मानाबाद, लातूर यासह कर्नाटकातूनही रुग्ण येतात. सर्वोपचार रुग्णालयात आता दर्जेदार उपचार मिळू लागले आहेत. मात्र, रुग्णालयातील सोयी- सुविधांकडे कोणाचेही लक्ष नसल्याचे चित्र आहे. ट्रामा आयसीयूमधील स्वच्छतागृहांची दुरवस्था झाली असून त्या ठिकाणी कोणतीच सुविधा दिसत नाही.
सोलापूर : अपघातात तथा अन्य प्रकरणात गंभीर जखमी झालेल्या रुग्णांना श्री छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयातील "बी' ब्लॉकमधील तिसऱ्या मजल्यावरील ट्रामा आयसीयूमध्ये उपचारासाठी दाखल केले जाते. त्यांच्या अवयवांची तपासणी करून त्यानुसार उपचार करण्यासाठी सीटी स्कॅन करणे भाग पडते. मात्र, मागील आठ दिवसांपासून या विभागातील सीटी स्कॅन मशिन बंद पडले आहे. त्यामुळे मृत्यूच्या दाढेत असलेल्या रुग्णांना एक्स-रे काढण्यासाठी तिसऱ्या मजल्यावरून मुख्य इमारतीत घेऊन यावे लागत आहे.
सर्वोपचार रुग्णालयात दररोज दोन हजारांहून अधिक रुग्ण उपचारासाठी येतात. त्यात सोलापूर जिल्ह्यासह उस्मानाबाद, लातूर यासह कर्नाटकातूनही रुग्ण येतात. सर्वोपचार रुग्णालयात आता दर्जेदार उपचार मिळू लागले आहेत. मात्र, रुग्णालयातील सोयी- सुविधांकडे कोणाचेही लक्ष नसल्याचे चित्र आहे. ट्रामा आयसीयूमधील स्वच्छतागृहांची दुरवस्था झाली असून त्या ठिकाणी कोणतीच सुविधा दिसत नाही. त्या विभागातील अत्यवस्थ रुग्णांना तिसऱ्या मजल्यावरून लिफ्टमधून खाली आणले जाते. त्यानंतर जुन्या "बी' ब्लॉकमधील रस्त्यावरून, पुढे खडतर रस्त्यावरून एक्स-रेसाठी आणले जात आहे. त्या वेळी त्यांना कृत्रिम ऑक्सिजन दिले जाते. अशा कठीण प्रसंगात रुग्ण दगावण्याची शक्यताही नातेवाइकांना वाटते. तरीही ट्रामा आयसीयूमधील सीटी स्कॅन मशिन सुरू करण्यात आलेली नाही.
दिल्लीवरून येतोय मशिनचा पार्ट
सर्वोपचार रुग्णालयातील ट्रामा आयसीयूमधील सीटी स्कॅन मशिन बंद पडली आहे. या मशिनचा पार्ट आपल्याकडे मिळत नसून तो दिल्लीवरून मागवावा लागतो. आता तो पार्ट मागविण्यात आला असून दिल्लीवरून येण्यास विलंब लागत आहे, अशी माहिती त्या ठिकाणचे डॉक्टर सांगत आहेत. या विभागात येणारे रुग्ण मृत्यूच्या अगदी जवळ असतानाही सीटी स्कॅन मशिन बंद पडल्यानंतर त्या ठिकाणी पर्यायी व्यवस्था का करण्यात आली नाही, असा प्रश्न रुग्णांचे नातेवाईक उपस्थित करू लागले आहेत.
वैद्यकीय अधीक्षकांनाच माहिती नाही
सर्वोपचार रुग्णालयातील "बी' ब्लॉकमधील ट्रामा आयसीयूमधील सीटी स्कॅन मशिन मागील काही दिवसांपासून बंद आहे. त्याची आपल्याला काहीच माहिती नसल्याचे सांगत रुग्णालयाचे नवे अधीक्षक डॉ. रामेश्वर डावखर यांनी त्या विषयावर बोलणे टाळले.
संपादन : श्रीनिवास दुध्याल