अरे व्वा..! "या' जिल्ह्यात मिळाली मंगल कार्यालयात लग्न समारंभास परवानगी 

सकाळ वृत्तसेवा 
गुरुवार, 25 जून 2020

जिल्ह्यातील खुले लॉन, विना वातानुकूलित मंगल कार्यालये, हॉल, सभागृह आणि घर व घराच्या परिसरात अटी- शर्तींच्या अधीन राहून लग्न समारंभास परवानगी देण्यात आली आहे. याबाबत जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी आज आदेश जारी केले आहेत. 

सोलापूर : जिल्ह्यातील खुले लॉन, विना वातानुकूलित मंगल कार्यालये, हॉल, सभागृह आणि घर व घराच्या परिसरात अटी- शर्तींच्या अधीन राहून लग्न समारंभास परवानगी देण्यात आली आहे. याबाबत जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी आज आदेश जारी केले आहेत. लग्न समारंभाच्या ठिकाणी एकावेळी मंगल कार्यालयामधील कर्मचारी, उपस्थित सर्व व्यक्ती, बॅंड /वादक, भटजी, डेकोरेटर व इतर यांच्यासह एकूण संख्या 50 पेक्षा जास्त असणार नाही अशी मुख्य अट लावण्यात आली आहे. 

हेही वाचा : ...तर गोपीचंद पडळकर यांना त्यांच्या घरात धडा शिकवू 

मास्क आणि सुरक्षित अंतराचे पालन करणे बंधनकारक आहे. लग्न समारंभाच्या प्रवेशापूर्वी हॅंडवॉश, सॅनिटायझरचा वापर करणे, थर्मल स्क्रिनिंगद्वारे प्रत्येक व्यक्तीची तपासणी करूनच प्रवेश देणे आवश्‍यक राहील. मंगल कार्यालयामध्ये एअर कंडिशनचा वापर करू नये, मंगल कार्यालयात सर्व बाजूने हवा खेळती राहील अशी व्यवस्था करावी. मानवी संपर्कात येणाऱ्या सर्व वस्तू / ठिकाणांचे वेळोवेळी नियमित निर्जंतुकीकरण करावे. लग्न समारंभ सकाळी 9 ते सायंकाळी 5 या कालावधीतच आयोजित करावा लागणार आहे. कोणतीही आजारी व्यक्ती लग्न समारंभास येता येणार नाही. लग्न समारंभाच्या ठिकाणी 55 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिक, मधुमेह, रक्तदाब आणि इतर आजार असलेल्या व्यक्ती, गरोदर माता व दहा वर्षांखालील मुलांचा प्रवेश टाळण्याची सूचना करण्यात आली आहे. 

हेही वाचा : उत्तम खेळाडू बनण्यासाठी काय करावे लागेल..! 

लग्न समारंभासाठी संबंधित तहसीलदार यांची पूर्वपरवानगी घेणे आवश्‍यक राहील. लग्न समारंभाच्या सात दिवस अगोदर पूर्वपरवानगी अर्ज व लग्न समारंभासाठी येणाऱ्या लोकांचे मोबाईल क्रमांक व पत्ते नमूद करून यादी जमा करणे आवश्‍यक राहील. कार्यक्रमाच्या ठिकाणी थुंकण्यास प्रतिबंध करण्यात यावा. मंगल कार्यालय अथवा विवाहस्थळ प्रतिबंधित क्षेत्रात येत असल्यास विवाह सोहळा आयोजित करता येणार नाही. या अटी व शर्तींचे उल्लंघन झाल्यास मंगल कार्यालयाचे परवाने रद्द करण्याची कारवाई करण्यात येईल, असा इशारा देखील देण्यात आलेला आहे. 

देखरेखीसाठी पथकांची नियुक्ती 
नगरपालिका हद्दीत नगरपालिका व पोलिस विभाग यांची संयुक्त पथके स्थापन केली जाणार आहेत. गाव पातळीवर ग्रामपंचायत व पोलिस विभागाची संयुक्त पथके स्थापन केली जाणार आहेत. पथकाबाबत संबंधित उपविभागीय अधिकारी यांची संनियंत्रणाची जबाबदारी असेल. या आदेशाचे उल्लंघन करणारी व्यक्ती किंवा संस्था भारतीय दंड संहितेच्या कलम 188 आणि आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 च्या कलम 51, 55 तसेच साथरोग प्रतिबंधात्मक कायदा 1897 नुसार कारवाईस पात्र असेल. 

अटी व नियमांचे पालन करून सोलापूर जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील मंगल कार्यालये सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे. सोलापूर महापालिका हद्दीतील मंगल कार्यालयांच्या बाबतीतही आदेश काढण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना करण्यात आल्या आहेत. लवकरच महापालिका हद्दीतीलही आदेश काढला जाईल. 
- दत्तात्रेय भरणे,
पालकमंत्री सोलापूर 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Permission granted for wedding ceremonies at mangal karyalaya in Solapur district