esakal | नापासांची पंचाईत ! निकालानंतरही मिळेना उत्तरपत्रिकेची फोटोकॉपी 
sakal

बोलून बातमी शोधा

ahilyadevi-holkar SOLAPUR UNIVERCITY
  • पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या निकालात तांत्रिक चुका 
  • 17 मार्चपासून अंतिम परीक्षा, तरीही निकालपत्र अन्‌ फोटोकॉपीचा पत्ता नाही 
  • गैरहजर विद्यार्थ्यांचा महाविद्यालयांकडून मिळेना अहवाल : निकाल राखला 
  • परीक्षा विभागाच्या वारंवारच्या चुका : कर्मचाऱ्यांच्या बदल्याचा प्रश्‍न पुन्हा ऐरणीवर 

नापासांची पंचाईत ! निकालानंतरही मिळेना उत्तरपत्रिकेची फोटोकॉपी 

sakal_logo
By
तात्या लांडगे

सोलापूर : पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाने बीए, बीकॉम, बीएस्सी अभ्यासक्रमांचा निकाल 25 दिवसांपूर्वीच जाहीर केला. यातील नापास विद्यार्थ्यांना अद्याप उत्तरपत्रिकेची फोटोकॉपी मिळाली नसल्याने त्यांना पुनर्मूल्यांकनासाठी अर्ज करता आलेला नाही. अपुरे मनुष्यबळ अन्‌ परीक्षा विभागातील तांत्रिक चुकांचा फटका विद्यार्थ्यांना सोसावा लागत आहे. काही विद्यार्थ्यांचा राखून ठेवलेला निकालही अद्याप जाहीर झालेला नाही. दरम्यान, आता अंतिम परीक्षा 17 मार्चपासून सुरू होणार आहे. 

हेही नक्‍की वाचा : असाही निर्णय ! प्रवासी नसल्यास जागेवरच थांबणार लालपरी 


जिल्ह्यापुरताचा विस्तार असलेल्या सोलापूर विद्यापीठाच्या स्थापनेपासून मागील 15 वर्षांत परीक्षा विभागाचा दर्जा सुधारलेला नाही. एकाच ठिकाणी खुर्चीला चिकटून बसलेले परीक्षा विभागातील कर्मचारी, अधिकारी व कर्मचाऱ्यांचे साटेलोटे अन्‌ नापास विद्यार्थ्यांना पास करण्याची रूढ झालेली पद्धत थांबलेली नाही. त्यातच निकालास विलंब तथा निकाल लागूनही फोटोकॉपीसाठी होणाऱ्या विलंबाचा फटका विद्यार्थ्यांना सोसावा लागत आहे. आता पदवी अभ्यासक्रमांचा निकाल 25 दिवसांपूर्वी लागला, तरीही विद्यार्थ्यांना निकालपत्रासाठी विद्यापीठ व महाविद्यालयांचे उंबरठे झिजवावे लागत आहेत. दरम्यान, काही विषयांत नापास झालेल्या विद्यार्थ्यांना पुनर्मूल्यांकनासाठी अर्ज करण्यास उत्तरपत्रिकेची फोटोकॉपीच मिळालेली नाही. त्यामुळे परीक्षा फार्म भरताना विद्यार्थ्यांना पाच दिवसांची सवलत देण्याचा निर्णय विद्यापीठाने घेतला असून अशा विद्यार्थ्यांना विलंब शुल्क आकारू नये, असे निर्देश परीक्षा विभागाने दिले आहेत. 


हेही नक्‍की वाचा : अवकाळीच्या मदतीपासून बळीराजाचा दूरच ! नऊशे कोटींचे वापटच नाही 

10 मार्चपर्यंत निकाल जाहीर होईल 
बीए, बीकॉम, बीएस्सीच्या विद्यार्थ्यांचा निकाल 20 दिवसांपूर्वी लागला. अभियांत्रिकीचा निकालही आता जाहीर केला जाणार असून विद्यार्थ्यांना फोटोकॉपी उपलब्ध करून दिली जाईल. 10 मार्चपर्यंत पुनर्मूल्यांकनाचा निकालही जाहीर केला जाईल. पुनर्मूल्यांकनास विलंब झाल्यास परीक्षा फॉर्म भरताना विद्यार्थ्यांना पाच दिवसांची सवलत दिली जाणार आहे. 
- श्रेणिक शहा, परीक्षा नियंत्रक, पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ 

हेही नक्‍की वाचा : गाड्यांच्या वेग वाढीला रेल्वे बोर्डाची मान्यता 


राखीव निकालाबाबत विद्यापीठाने घेतला निर्णय 
परीक्षेला गैरहजर राहिलेल्या अथवा परीक्षेला हजर असतानाही गैरहजेरी लागलेल्या विद्यार्थ्यांचा निकाल राखून ठेवला जातो. त्यावर उपाय म्हणून आता विद्यापीठाने ठोस पर्याय निवडला आहे. परीक्षा घेताना त्या वर्गावरील ज्युनिअर सुपरवायझरने दिलेला हजेरी रिपोर्ट सिनिअर सुपरवायझरने पडताळून थेट विद्यापीठालाच सादर करावयाचा आहे. परीक्षा विभागातील संगणक विभागाने त्याची नियमित नोंद करून निकालात तसे नमूद करावयाचे, असे नियोजन विद्यापीठाने केले आहे. त्यामुळे महाविद्यालयांच्या विलंबाने विद्यार्थ्यांचे होणारे नुकसान टळेल, असा विश्‍वास विद्यापीठाला आहे. 

go to top