पंढरपुरात मोबाईल चोरांची टोळी जेरबंद; अवघ्या काही मिनिटांतच चोरायचे 25-30 मोबाईल ! 

अभय जोशी 
Monday, 7 September 2020

मोबाईल चोरीच्या घटना वाढल्यामुळे पंढरपूरचे पोलिस सतर्क झाले होते. पोलिस निरीक्षक अरुण पवार यांनी मोबाईल चोरी करणाऱ्या चोरट्यांना जेरबंद करण्यासाठी खास पथकाची नेमणूक केली होती. या पथकातील पोलिस कर्मचाऱ्यांनी सातारा जिल्ह्यातील माण तालुक्‍यातील शाहिदा महादेव तुपे, भोजलिंग महादेव तुपे आणि कुर्डुवाडी येथील अहमद नजीर सय्यद या तिघांना शिताफीने पकडले. या टोळीकडून पोलिसांनी चार मोबाईल जप्त केले आहेत. 

पंढरपूर (सोलापूर) : स्कॉर्पिओ, स्विफ्ट डिझायर यांसारख्या गाड्यांमधून साथीदारांसह पंढरपूरला येऊन अवघ्या काही मिनिटांत पंचवीस - तीस मोबाईल चोरून गायब होणाऱ्या एका महिलेला तिच्या दोन साथीदारांसह पोलिसांनी पकडले. सातारा जिल्ह्यातून तब्बल शंभर किलोमीटरवरून येणाऱ्या या टोळीकडून शेकडो मोबाईल पोलिस तपासात हस्तगत होण्याची शक्‍यता आहे, अशी माहिती पोलिस निरीक्षक अरुण पवार यांनी दिली. 

हेही वाचा : "उजनी'तून भीमा नदीत 15 हजार क्‍युसेक विसर्ग; धरण परिसरात एकाच रात्रीत 100 मिलिमीटर पाऊस 

गेल्या काही महिन्यांपासून पंढरपुरात मोबाईल चोरीचे प्रमाण सातत्याने वाढत होते. प्रामुख्याने नवीपेठ भागातील भाजी मंडई परिसरातून मोठ्या प्रमाणावर मोबाईलची चोरी होत होती. विकी गुजर, राजाभाऊ उराडे यांच्यासह अनेकांचे मोबाईल नवीपेठ परिसरातून चोरीस गेले होते. याप्रकरणी त्यांनी पंढरपूर शहर पोलिस ठाण्यात तक्रारी दाखल केल्या होत्या. 

हेही वाचा : जीव भांड्यात ! कामती परिसरात बिबट्या नव्हे, तरस; वनविभागाचे स्पष्टीकरण 

दरम्यान, मोबाईल चोरीच्या घटना वाढल्यामुळे पोलिस सतर्क झाले होते. पोलिस निरीक्षक अरुण पवार यांनी मोबाईल चोरी करणाऱ्या चोरट्यांना जेरबंद करण्यासाठी खास पथकाची नेमणूक केली होती. या पथकातील पोलिस कर्मचाऱ्यांनी सातारा जिल्ह्यातील माण तालुक्‍यातील शाहिदा महादेव तुपे, भोजलिंग महादेव तुपे आणि कुर्डुवाडी येथील अहमद नजीर सय्यद या तिघांना शिताफीने पकडले. या टोळीकडून पोलिसांनी चार मोबाईल जप्त केले आहेत. 

सांगली जिल्ह्यातील अनेक तालुक्‍यांत शाहिदा हिने मोबाईल चोऱ्या केल्या होत्या. सांगली आणि सातारा जिल्ह्यात या टोळीच्या विरोधात पोलिसांनी गुन्हे दाखल केल्यानंतर या टोळीने सोलापूर जिल्ह्याला निशाणा केला होता. आधी स्कॉर्पिओ गाडीतून ही टोळी अनेक गावांत जात होती आणि अनेक मोबाईल चोरून पसार होत होती. स्कॉर्पिओ गाडीचा पोलिसांना संशय आल्यामुळे या टोळीने आता स्विफ्ट डिझायर गाडीचा वापर सुरू केला होता. माण तालुक्‍यातून सुमारे शंभर किलोमीटर लांब पंढरपुरात आणि परिसरातील गावात येऊन ही टोळी लोकांचे मोबाईल लंपास करत होती. अतिशय शिताफीने मोबाईल चोरणाऱ्या टोळीतील चोरटे बाजारपेठेत आणि गर्दीच्या भागात फिरून अवघ्या काही मिनिटांत पंचवीस-तीस मोबाईल चोरून गायब होत होते. आता या टोळीला पोलिसांनी पकडल्यामुळे शेकडो लोकांचे चोरीला गेलेले मोबाईल पोलिस तपासामध्ये सापडण्याची शक्‍यता पोलिस निरीक्षक अरुण पवार यांनी व्यक्त केली. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Police arrested mobile thieves in Pandharpur