दुख:द..! जनावरे नेणाऱ्या 'त्या' पिकअपचा पाठलाग ठरला अखेरचा; 'रामेश्वर'च्या मृत्यूने नऊ महिन्याचा चिमुकला पोरका

तात्या लांडगे
शनिवार, 23 मे 2020

पिकअप चालक अटकेत; अपघाताची चौकशी
लॉकडाउन काळात जिल्हाबंदी असल्याने मागील 15 दिवसांपासून विजयपूर मार्गावरील वडकबाळ येथे नाकाबंदी करत असलेला पोलीस शिपाई रामेश्वर गंगाधर परचंडे (वय- 30, रा. जोडभावी, सोलापूर) हे पिकअपच्या धडकेत शहीद झाले. जनावरे वाहून नेणाऱ्या पिकअपच्या धडकेत ते गंभीर जखमी झाले होते. त्यानंतर त्यांना उपचारासाठी सोलापुरातील अश्विनी हॉस्पिटल येथे दाखल करण्यात आले, मात्र उपचारादरम्यान त्यांचा दुर्दैवी अंत झाला. अपघातानंतर पिकअप चालक गौस नबीलाल कुरेशी (रा. बाशापेठ, सोलापूर) यास पोलिसांनी अटक केली असून अपघाताची चौकशी करण्यात येत आहे. रामेश्वर यांना नऊ महिन्याचा लहान मुलगा असून कुटुंबाची जबाबदारी त्यांच्यावर होती.
- अतूल झेंडे, अप्पर पोलीस अधिक्षक, सोलापूर 

सोलापूर : मंद्रूपजवळील वडकबाळ येथे नाकाबंदी ड्युटी करताना पहाटेच्या सुमारास जनावरे वाहून नेणाऱ्या पिकअपला हात केला. मात्र, तो न थांबल्याने रामेश्वर गंगाधर परचंडे यांनी त्या पिकअपचा पाठलाग सुरू केला. त्यावेळी झालेल्या अपघातात परचंडे गंभीर जखमी झाले आणि तो पाठलाग त्यांचा अखेरचा ठरला. या अपघातामुळे रामेश्वर यांचा नऊ वर्षाचा चिमुकला पोरका झाला.

लॉकडाऊनच्या काळात परजिल्ह्यातून विनापरवाना, विनाकारण कोणीही जिल्ह्यात एन्ट्री करू नये, यासाठी ठिकठिकाणी नाकाबंदी करण्यात आली आहे. विजयपूर मार्गावरील वडकबाळ येथे शुक्रवारी (ता. 22) रामेश्वर परचंडे, लक्ष्मण कोळेकर, स्वप्नील गिरी, दिनेश रास्ते हे नाकाबंदीच्या ठिकाणी ड्युटी करत होते. तेरामैलकडून भरधाव वेगाने जनावरे घेऊन येणाऱ्या पिकअपला हात केला, तरीही तो पिकअप न थांबता भरधाव वेगाने पुढे निघाला. पिकअपचा मागील भाग लाकडी फळ्यांनी झाकलेला होता, तर नंबरप्लेट खोडलेली असल्याने रामेश्वर यांनी त्या पिकअपचा पाठलाग सुरू केला. याच दरम्यान त्यांचा अपघात झाला आणि या अपघातात त्यांचा दुर्दैवी अंत झाला. शनिवारी (ता. 23) त्यांच्यावर रुपाभवानी मंदिराजवळील तुळजापूर रोड येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी ग्रामीण पोलीस दलाकडून त्यांना मानवंदना देण्यात आली.

...अन् अधिकारी होण्याचे स्वप्न राहिले अधुरे
महाविद्यालयात शिक्षण घेत असताना रामेश्वर हा हँडबॉलमध्ये उत्कृष्ट खेळाडू म्हणून नावाजलेला होता. विद्यार्थ्यांमध्ये त्याच्या खेळाचे गुणगान गायले जात होते. तो पोलीस भरती झाल्यानंतर आई-वडिलांना एकुलता एक असलेल्या रामेश्वर कुटुंबाच्या उदरनिर्वाहाची जबाबदारी पडली. त्यानंतर त्यांचा विवाह झाला आणि त्यांच्या कुटुंबात एका चिमुकल्याचे आगमन झाले. मात्र लाकडं का वडवाळ येथे नाकाबंदी च्या बंदोबस्ताला असताना झालेल्या अपघातात रामेश्वर शहीद झाले आणि त्यांचा तो चिमुकला पोरका झाला. रामेश्वर हे महाविद्यालयापासून जिद्दी असल्याने आणि त्यांचे सध्याचे वय 30 असल्याने त्यांना पोलीस अधिकारी व्हायचे होते, मात्र नियतीने ते स्वप्न पूर्ण होऊ दिले नाही.

पन्नास लाखांच्या मदतीचा पाठविणार प्रस्ताव
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बंदोबस्त करणाऱ्या पोलिसांच्या कुटुंबीयांच्या सुरक्षिततेसाठी त्यांना 50 लाख रुपयांच्या विम्याचे संरक्षण दिले जाईल, अशी घोषणा गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केली. सोलापूर ग्रामीण पोलीस दलातील रामेश्वर गंगाधर परचंडे हे वडकबाळ येथे नाकाबंदी ची ड्युटी करताना झालेल्या अपघातात शहीद झाले आहेत या पार्श्वभूमीवर त्यांच्या कुटुंबियांना 50 लाख रुपयांची मदत मिळावी, असा प्रस्ताव शासनाला पाठवणार असल्याची माहिती अधीक्षक मनोज पाटील यांनी 'सकाळ'शी बोलताना दिली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Policeman killed in road accident in Solapur