
प्रभागातील मतदारांमुळेच मला मिळाली सर्वोच्च संधी
माझ्या प्रभागातील असो वा अन्य प्रभागातील नागरिकांची समस्या सोडविण्याचा मी सातत्याने प्रयत्न केला. कोरोना झाल्यानंतरही नागरिकांचे प्रश्न सोडविण्यास प्राधान्य दिले. कुटुंबियांच्या साथीने मला महापालिकेतील सर्वोच्च पद भुषविता आल्याचा सर्वाधिक आनंद आहे.
- श्रीकांचना यन्नम, महापौर
सोलापूर : प्रभाग बदलला, लोकवस्ती वाढली, तरीही श्रीकांचना यन्नम या सलग चारवेळा नगरसेविका म्हणून विजयी झाल्या. प्रभागातील रस्ते, नागरिकांच्या पायाभूत सुविधांसाठी यन्नम यांना कुटुंबियांनीही मोलाची साथ दिली. त्यांनी सुरवातीला कॉंग्रेसकडून उमेवारी मागितली, परंतु कॉंग्रेसकडून त्यांना उमेवारी मिळाली नाही. त्यानंतर राजकीय वारसा नसतानाही त्यांनी भाजपकडून उमेदवारी मिळवली आणि त्यानंतर सुरु झाला यन्नम यांचा राजकीय प्रवास.
प्रभागातील मतदारांमुळेच मला मिळाली सर्वोच्च संधी
माझ्या प्रभागातील असो वा अन्य प्रभागातील नागरिकांची समस्या सोडविण्याचा मी सातत्याने प्रयत्न केला. कोरोना झाल्यानंतरही नागरिकांचे प्रश्न सोडविण्यास प्राधान्य दिले. कुटुंबियांच्या साथीने मला महापालिकेतील सर्वोच्च पद भुषविता आल्याचा सर्वाधिक आनंद आहे.
- श्रीकांचना यन्नम, महापौर
प्रजासत्ताक म्हणजे प्रजेचे राज्य होय. राजकीय क्षेत्रात महिलांना 50 टक्के आरक्षण असतानाही महिला लोकप्रतिनिधींच्या पतींद्वारेच कारभार हाकला जातो. मात्र, यन्नम यांना पडद्यामागून त्यांच्या पती रमेश यन्नम यांची साथ मिळाली. त्यामुळे त्या प्रत्येक पावलावर यशस्वी ठरत गेल्या. राजकीय कसब त्यांचे विकसीत झाले आणि कोणत्या ठिकाणी कसे राजकीय समिकरण जुळवायचे, हा गुण त्यांनी आत्मसात केला. पैसे देऊन मते विकत घेण्यापेक्षा त्यांनी कामाला मते देण्याचे आवाहन केले आणि मतदारांनी त्यांचे आवाहन स्वीकारले. शोभा बनशेट्टी यांनी अडीच वर्षाचा कार्यकाळ पूर्ण केल्यानंतर महापौर कोण, या चर्चेतून अनेकांची नावे पुढे आली. मात्र, पक्षनिष्ठा आणि पक्षवाढीसाठी त्यांचे योगदान, त्यांच्या कामात कुटुंबियांची साथ, या प्रमुख कारणांमुळे श्रीकांचना यन्नम यांना महापौरपदाची लॉटरी लागली. प्रभागातील अंतर्गत रस्ते, ड्रेनेज समस्या, स्ट्रीट लाईट, पिण्याच्या पाण्याची समस्या सोडविण्यास त्यांनी प्राधान्य दिले. दुसरीकडे त्यांनी प्रभागातील नागरिकांच्या प्रत्येक कामास व कार्यक्रमास आवर्जुन उपस्थिती लावली. त्यामुळे महिला नगरसेविका म्हणून त्यांचा प्रभागात आजही तितकाच नावलौकिक आहे.
पतीचा प्रामाणिकपणा अन् मदत हीच माझी प्रेरणा
1997 मध्ये माजी उपमहापौर शशिकला बत्तुल यांच्यासाठी रमेश यन्नम यांनी बुथवर काम केले. त्यांनीही त्यांच्या परिसरात प्रामाणिकपणे प्रचार केला आणि बत्तुल विजयी ठरल्या. त्यांच्या विजयात खारीचा वाटा उचलल्यानंतर रमेश यन्नम यांचा आत्मविश्वास वाढला आणि त्यांनी पक्षसंघटन आणि पक्षवाढीसाठी काम केले. तत्पूर्वी, 1997 मध्ये त्यांनी कॉंग्रेसचे तत्कालीन शहराध्यक्ष सुधीर खरटमल यांच्याकडे उमेदवारी मागितली. मात्र, उमेदवारी मिळाली नाही आणि त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. 2002 मध्ये भाजपकडून श्रीकांचना यन्नम यांना उमेदवारी मिळाली आणि त्यानंतर सलग चारवेळा यन्नम त्यांच्या प्रभागात विजयी झाल्या. रमेश यन्नम यांनी पत्नी महापौर झाल्यानंतर कधीही मोठेपणा दाखविला नाही, ना कोणत्या कार्यक्रमात पुढे- पुढे केले नाही. पत्नी लोकसेवा करीत असल्याने घरातील सर्व कामे यन्नम स्वत: करतात, हेही विशेषच.