सोलापूरच्या शिरपेचात मानाचा तुरा ! प्रा. काशीद यांना 'क्लॉथ डस्टर ' मिशनरीचे भारत सरकारचे पेटंट

शांतीलाल काशीद 
Sunday, 22 November 2020

प्रा.आनंदराव काशीद व त्यांचे सहकारी डॉ. बसगोंडा सोनगे यांनी यावर अडीच ते तीन वर्षे संशोधन करीत अतिशय कमी खर्चात या सुती तुकडे ओढून घेणाऱ्या यंत्राचा शोध लावला आहे. त्यांच्या या पेटंटची मागणी मा. भारत सरकारच्या पेटंट विभागाकडे केली असता सदर मशिनरीचे पेटंट मिळाल्याचे पत्र प्राप्त झाले.

मळेगाव (सोलापूर) : बार्शी तालुक्यातील पिंपरी (सा) गावचे सुपुत्र प्रा.आंनदराव काशीद यांना 'क्लॉथ डस्टर' या मिशनरीचे भारत सरकारचे पेटंट मिळाल्याने सोलापूरच्या शिरपेचात एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.

हे ही वाचा : कार्तिकी दशमी, एकादशी व द्वादशी असे तीन दिवस बंद राहणार विठ्ठल-रुक्मिणीचे मुखदर्शन !

प्रा आंनदराव काशीद सध्या ऑर्किड कॉलेज, सोलापूर येथे कार्यरत आहेत. वडील शिवाजी काशीद व आई सोजर काशीद दोघेही प्राथमिक शिक्षक असल्याने लहानपणापासूनच त्यांना शिक्षणाचे बाळकडू घरातच मिळाले. राज्याचे मिनी मॅन्चेस्टर म्हणून ओळख असलेल्या सोलापूरचे टॉवेल, टर्कीश टॉवेल, सोलापुरी चादरी यास राज्यभरात प्रचंड मागणी आहे. सोलापुरी चादरने देशात सोलापूरची एक वेगळीच ओळख निर्माण केली आहे. नवीन टॉवेल, नॅपकीन किंवा चादर तयार केल्यावर त्यावर सुताचे अगदी लहान तुकडे असतात. सध्या हे तुकडे झटकण्यासाठी बाल कामगार किंवा महिला कामगार काम करीत असल्याने त्यांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला आहे. 

लहान तुकडे व कण झटकल्यानंतर हवेत उडतात परिणामी श्वास घेताना हे शरीरात जाऊन टी. बी ( ट्युबर क्युलॅसिस ) होण्याचा धोका असतो. टॉवेल कारखान्यातील कामगारांना हे दररोजचे मरण झाले आहे. प्रा.आनंदराव काशीद व त्यांचे सहकारी डॉ. बसगोंडा सोनगे यांनी यावर अडीच ते तीन वर्षे संशोधन करीत अतिशय कमी खर्चात या सुती तुकडे ओढून घेणाऱ्या यंत्राचा शोध लावला आहे. त्यांच्या या पेटंटची मागणी मा. भारत सरकारच्या पेटंट विभागाकडे केली असता सदर मशिनरीचे पेटंट मिळाल्याचे पत्र प्राप्त झाले.

हे ही वाचा : ब्रेकिंग ! मोहोळ येथे भीषण अपघात; कंटेनर व टँकर जळून खाक

यासाठी आर्किड कॉलेज, सोलापूर व संस्थेने मदत व प्रोत्साहन दिले आहे. त्यांच्या या यशाबद्द्ल ऑर्किड कॉलेज, सोलापूर, वैराग, पिंपरी (सा) ग्रामस्थ तसेच मित्र परिवाराच्या वतीने अभिनंदन केले जात आहे.

प्रा. आनंदकुमार काशीद म्हणाले, 'क्लॉथ डस्टर' या मिशनरीचे भारत सरकारचे पेटंट मिळाल्याने एक वेगळीच ऊर्जा मिळाली आहे. हे पेटंट कमी खर्चात उपलब्ध होत असल्याने मोठी मागणी मिळत असून कामगारांचे आरोग्य उत्तम राहण्यास मदत होणार आहे. भविष्यात स्वयंचलित वाहने व विमान बनविण्यासाठी लागणारे कमी वजनाचे परंतु उच्च दर्जाचे धातू यासंबधीच्या पेटंटचे संशोधन सुरु आहे. 

संपादन - सुस्मिता वडतिले 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Prof. Anandrao Kashid from Barshi taluka has received a patent from the Government of India for a missionary called Cloth Duster