पुणे पदवीधरचे मतदार म्हणतात...उमेश पाटील हवेत उमेदवार, मॉकपोलमध्ये 60 टक्के पसंती 

प्रमोद बोडके
Friday, 6 November 2020

पुणे पदवीधर मतदारसंघातील राष्ट्रवादी कॉंग्रेसचा उमेदवार कोण असावा, मतदारांची सर्वाधिक पसंती कोणाला आहे, निवडून येण्याची क्षमता असलेला उमेदवार कोण? याबाबत राष्ट्रवादी कॉंग्रेसने चाचपणी करावी. या चाचणीत जो उमेदवार सिध्द ठरेल त्यालाच संधी मिळावली. आमच्या सर्वांसाठी पक्षाध्यक्ष शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा निर्णय अंतिम आहे. मी सर्वसामान्य कुटुंबातून आलो आहे. मला कोणताही राजकिय वारसा नाही, पक्ष संघटनेसाठी मी राज्यभर काम केलेले आहे. त्यामुळे या निवडणुकीत मला राष्ट्रवादी तर्फे संधी मिळेल असा विश्वास वाटतो. 
- उमेश पाटील, प्रदेश प्रवक्ते 

सोलापूर : विधान परिषदेच्या पुणे पदवीधर व शिक्षक मतदारसंघाची रणधुमाळी आता सुरुवात झाली आहे. या मतदार संघातून राष्ट्रवादी कॉंग्रेसचा आणि भाजपचा उमेदवार कोण असणार? याबद्दल कमालीची उत्सुकता आहे. पुणे पदवीधर मतदारसंघातील राष्ट्रवादी कॉंग्रेसचा उमेदवार कोण असावा? याबाबत देण्यात आलेल्या मॉक पोलमध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेश प्रवक्ते तथा सोलापूर जिल्हा परिषद सदस्य उमेश पाटील यांना 60.1 टक्के मतदारांनी पसंती दिली आहे. 

अरुण लाड यांना 30.4 टक्के तर प्रताप माने यांना 9.5 टक्के मतदारांनी राष्ट्रवादीचा उमेदवार म्हणून पसंती दिली आहे. या मतदारसंघातील पन्नास हजार पदवीधर मतदारांना त्यांच्या मोबाईल नंबर वर संपर्क करून पसंतीचा उमेदवार निवडण्यास सांगण्यात आले होते. यामध्ये 26 हजार मतदारांनी प्रतिसाद दिला आहे. त्या पैकी 60 टक्के मतदारांनी उमेदवार म्हणून आपली पसंती उमेश पाटील यांना दर्शवली आहे. प्रत्यक्ष व्हाईस कॉलच्या माध्यमातूनही मतदारांचा कौल जाणून घेण्यात आला आहे. 

राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष म्हणून व सध्या महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादीचे प्रवक्ते म्हणून उमेश पाटील यांनी तयार केलेली प्रतिमा युवक मतदारांना जास्त भावत आहे. उमेश पाटील स्वतः हे एम. एसस्सी कृषी पदवीधर आहेत. त्यांना शेती व ग्रामीण भागातील समस्यांची चांगली जाण आहे. प्रभावीपणे प्रश्‍न मांडून ते सोडवून घेण्याचे कौशल्यही त्यांच्याकडे आहे. त्यामुळे युवक मतदारांना उमेश पाटील हे आपलेसे वाटतात. गेल्या बारा वर्षात त्यांनी रोजगार मेळाव्याच्या माध्यमातून खासगी क्षेत्रात 60 ते 65 हजार युवकांना रोजगार उपलब्ध करून दिल्याने उमेश पाटील हे नाव सोलापूर जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रात परिचित झाले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Pune graduate voters say ... Umesh Patil is a candidate in the air, 60 percent preference in mock polls