कुरनूर धरण परिसरात 17 वर्षांत प्रथमच "शाही ससाणा'ची भर; दिवसेंदिवस खुलतेय "कुरनूर'चे निसर्गसौंदर्य 

Shahi Sasana.
Shahi Sasana.

अक्कलकोट (सोलापूर) : कुरनूर (ता. अक्कलकोट) येथील बोरी नदीवर बांधलेल्या कुरनूर धरण परिसरात गेल्या सतरा वर्षांत पहिल्यांदाच शाही ससाणा या नवीन पक्ष्याचे आगमन झाले आहे. त्यामुळे सध्या धरणात असलेले मुबलक पाणी, त्यात मध्यभागी असणारी दोन प्रशस्त बेटे तसेच गर्द झाडी व नैसर्गिक अधिवास असलेले शांत व सुंदर वातवरण यामुळे धरण व परिसराचे सौंदर्य आणखी खुलून दिसत आहे. 

चपळगावातील वन्यजीव छायाचित्रकार शिवानंद हिरेमठ, सचिन पाटील, रत्नाकर हिरेमठ व नीलकंठ पाटील यांनी कुरनूर धरण परिसरात आजपर्यंत विविध पक्ष्यांच्या नोंदी केलेल्या आहेत. वन्यजीव छायाचित्रकार सचिन पाटील यांनी पहिल्यांदा या कुरनूर धरण परिसरात शाही ससाणा पक्ष्याची नोंद घेतली असून तो उडत असतानाचे छायाचित्रण त्यांच्या कॅमेऱ्यात कैद केले आहे. शिवानंद हिरेमठ यांच्या 17 वर्षांच्या कुरनूर परिसरातील पक्षी निरीक्षणामध्ये पहिल्यांदाच हा पक्षी आढळल्याचे सांगितले आहे. 

गेल्या काही वर्षांपासून कुरनूर धरण परिसर देश-विदेशातील पक्ष्यांचे अधिवास बनत चालला आहे. धरण परिसरात अतिशय दुर्मिळ पक्षी येत आहेत. कुरनूर धरणाचा परिसर, झाडीझुडपी, धरणात बेटासारखा भाग, डोंगराळ परिसर तसेच बावकरवाडी व कुरनूर या दोन गावांच्या मध्यभागी प्राकृतिक योग्य वातावरण यामुळे देश-विदेशातील पक्ष्यांना ही जागा आकर्षित करीत आहे. 

शाही ससाण्याची वैशिष्ट्ये 
शाही ससाणा याला इंग्रजीत शाहीन फाल्कन हे नाव आहे. हा भारतीय उपखंडात आढळणारा रहिवासी पक्षी आहे. या पक्ष्याची वैशिष्ट्ये सांगताना शिवानंद हिरेमठ म्हणाले, त्याची काळी पाठ, फिकट तपकिरी रंगाची छाती, पांढरा गळा व तसेच छातीवर गडद रेषा ही शाही ससाण्याची वैशिष्ट्ये आहेत. नर आणि मादी एकसारखेच दिसतात. नर हा आकारामध्ये कावळ्याएवढा असतो तर मादी ही नरापेक्षा आकाराने मोठी असते. हा शाही ससाणा मुख्यतः खडकाळ आणि डोंगराळ भागात आढळतो. तो साधारणतः एकटा किंवा जोडीने दिसतो. यांची आयुष्यभर एकच जोडी असते. हा पक्षी हवेतल्या हवेत त्याच्या भक्ष्याला पकडतो. हवेत उडत असताना याचा वेग ताशी 240 किलोमीटरपर्यंत असू शकतो. हवेतून याच्या भक्ष्याकडे सूर मारताना याचा वेग ताशी 320 किलोमीटरपर्यंत असू शकतो. हा मुख्यतः लहान व मध्यम आकाराचे पक्षी जसे पोपट, कबुतर यांची शिकार करतो. शाही ससाण्याच्या वेगामुळे भक्ष्याची सुटण्याची शक्‍यता फार कमी असते. मादी शाही ससाणा वर्षातून तीन ते चार अंडी घालते. 

भारतात बऱ्याच वेळा यांची घरटी मोबाईल टॉवर, बिल्डिंग अशा मानवनिर्मित ठिकाणी दिसतात. धरणाच्या परिसरात शाही ससाणा दिसल्याने वन्यजीव प्रेमी आणि पक्षी अभ्यासक आनंद व्यक्त करताना दिसत आहेत. शाही ससाण्याचे शास्त्रीय नाव फाल्को पेरेग्रीनस पेरेग्रीनेटर असे असून तो अतिशय दुर्मिळ आहे. युरोप, आखात व अशियातही आढळतो. 

चपळगावचे पक्षी निरीक्षक शिवानंद हिरेमठ म्हणाले, कुरनूर धरण परिसरात आढळलेला शाही ससाणा हा कावळ्याच्या आकाराचा आहे. हा पक्षी भारतात अतिशय दुर्मिळ असून याचा वावर मोठ्या भूभागावर आहे. टोकदार पंख, शरीर अतिशय चपळ असते. जगातील सर्वांत वेगवान पक्ष्यात याची गणना होते. याचा वापर आखाती देशात माणसाळवून पक्ष्यांची शिकार साधण्यासाठी केला जातो. 

पक्षी निरीक्षक सचिन पाटील म्हणाले, कुरनूर धरण परिसर हा एकदा पाहिल्यास तो पुन्हा भेट द्यावा असा आहे. येथे देश-विदेशातील शेकडो आकर्षक पक्षी येत असतात. त्याचे पक्षीप्रेमी व नागरिक आनंद लुटतात. यासाठी पर्यटन विभागाकडून येथे पक्षी निरीक्षण केंद्र होऊन आवश्‍यक त्या सर्व सोयीसुविधा निर्माण कराव्यात. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com