शेतकरी-कामगारविरोधी कायदे रद्द न केल्यास आंदोलन आणखी तीव्र करू : माजी आमदार आडम; सिटूकडून "रास्तारोको' 

Mcp
Mcp

सोलापूर : शेतकऱ्यांचे आंदोलन दडपून टाकण्यासाठी केंद्र सरकार पोलिस बळाचा वापर करत आहे. शेतकऱ्यांवर लाठीहल्ला, अश्रुधूर, पाण्याचा मारा, अटकसत्र करून आंदोलन चिघळण्याचा प्रयत्न चालू आहे. परंतु, देशाच्या कृषिप्रधान राज्यातून शेतकऱ्यांचे जथ्थेच्या जथ्थे दिल्लीत दाखल होत आहेत. याचा अर्थ शेतकरी आता माघार घेणार नाही. या शेतकऱ्यांच्या आंदोलनाला सबंध देशभरातून कामगार व शेतकरी उत्स्फूर्त पाठिंबा देत आंदोलनात उतरलेले आहेत. शेतकरी-कामगार विरोधी कायदे रद्द न केल्यास आंदोलन आणखी तीव्र करू, असा इशारा माकपचे माजी आमदार नरसय्या आडम यांनी दिला. 

गुरुवारी (ता. 3) सकाळी संत तुकाराम चौक येथे झालेल्या रास्ता रोकोच्या वेळी माजी आमदार श्री. आडम (मास्तर) यांनी सरकारला हा इशारा दिला. अखिल भारतीय किसान सभा आणि अन्य शेतकरी संघटनेच्या वतीने दिल्ली येथे होत असलेल्या शेतकऱ्यांच्या दडपशाही विरोधात आणि शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ देशव्यापी आंदोलनाची हाक देण्यात आली. त्या अनुषंगाने सोलापुरात माजी आमदार श्री. आडम व सिटूचे राज्य महासचिव ऍड. एम. एच. शेख यांच्या नेतृत्वाखाली सकाळी गेंट्याल चौक येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. 

सेंटर ऑफ इंडियन ट्रेड युनियन्स, अखिल भारतीय जनवादी महिला संघटना, भारताचा लोकशाहीवादी युवा महासंघ, एसएफआय तसेच सिटू प्रणीत अन्य संघटित-असंघटित कामगार संघटनांचे प्रतिनिधी व कार्यकर्त्यांनी शेतकऱ्यांच्या आंदोलनास पाठिंबा देण्यासाठी रास्ता रोकोचा निर्धार केला. त्या अनुषंगाने सकाळी 10 पासून संत तुकाराम चौक, अशोक चौक, गेंट्याल चौक, वडार गल्ली, बापूजीनगर या परिसरात कार्यकर्ते जमले. यादरम्यान पोलिस प्रशासनाचा फौजफाटा तैनात झाला. कार्यकर्त्यांचा कानोसा घेण्याचा प्रयत्न पोलिसांमार्फत चालू होता. अचानक 11.20 वाजता श्री. आडम गेंट्याल चौक येथे गाडीतून उतरताच गुप्तपणे जमलेल्या सर्व कार्यकर्त्यांनी चारही रस्ते नाकाबंदी करून जोरदार घोषणाबाजी सुरू केली. 

या वेळी बॅनर, फलक, झेंडे घेऊन महिला, विद्यार्थी, युवक आणि कामगार उन्हात रस्त्यावर बसले. पोलिसांची प्रचंड दडपशाही चालू होती. तरीही कार्यकर्ते रस्त्यावरून उठले नाहीत. अखेर पोलिसांना बळाचा वापर करून ताब्यात घ्यावे लागले. या वेळी कार्यकर्ते आणि पोलिस यांच्यात चांगलीच झटापट झाली. 

या वेळी श्री. आडम म्हणाले, सरकारने शेतकऱ्यांच्या विरोधात युद्ध पुकारले असून भांडवलदारांना जगविण्यासाठी शेतकऱ्यांची फसवणूक मोदी सरकार करीत आहे. शेतकऱ्यांच्या शेती मालाला हमीभाव देऊ न शकणारे सरकार साठेबाजी आणि महागाईला प्रोत्साहन देत आहे. स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशी लागू करा, ही मागणी घेऊन शेतकरी वर्षानुवर्षे टाहो फोडत आहेत. पण सरकार कदापि ते मान्य करायला तयार नाही. 

या वेळी सिटूचे राज्य महासचिव ऍड. शेख यांनी शेतकऱ्यांच्या आंदोलनाला महाराष्ट्रातील संपूर्ण कामगार, कष्टकरी, शेतकरी आणि शेतमजुरांचा पाठिंबा असून शेतकऱ्यांचा आवाज दडपून टाकू शकत नाही. तसे झाल्यास ही लढाई अखंड चालू राहील, असा इशारा दिला. 

या वेळी नगरसेविका कामिनी आडम, माजी नगरसेविका नसीमा शेख, नलिनी कलबुर्गी, व्यंकटेश कोंगारी, युसूफ शेख, म .हनीफ सातखेड, सलीम मुल्ला, मुरलीधर सुंचू, विक्रम कलबुर्गी, अनिल वासम आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com