मराठा आरक्षण स्थगितीच्या निषेधार्थ "छावा'चे रास्ता रोको आंदोलन 

हुकूम मुलाणी 
Monday, 14 September 2020

मराठा समाजाच्या प्रत्येक मागणीच्या बाबतीत राज्यकर्ते उदासीन आहेत. त्यामुळे मराठा समाजाचा संयम संपला आहे. राज्य सरकारने मराठा आरक्षणाच्या बाबतीत न्यायालयात आपली बाजू भक्कमपणे मांडली असती तर मराठा समाजावर आज ही वेळ आली नसती. केवळ सरकारच्या नाकर्तेपणामुळे आरक्षण रद्द झाल्याचा सूर मराठा समाजाच्या तरुणांमध्ये निर्माण झाला आहे, असा रोष या वेळी आंदोलनकर्त्यांनी व्यक्त केला. 

मंगळवेढा (सोलापूर) : उच्च न्यायालयाने मराठा समाजाला शिक्षण व नोकरीचे आरक्षण रद्द केल्याने मराठा समाज पुन्हा रस्त्यावर उतरला आहे. आज (सोमवारी) मंगळवेढ्यात अखिल भारतीय छावा संघटनेच्या वतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. या वेळी पोलिस निरीक्षक ज्योतीराम गुंजवटे यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले. यावर आठ दिवसांत निर्णय न झाल्यास पुन्हा आंदोलन झेडण्याचा इशाराही देण्यात आला. 

"आरक्षणासाठी 58 मूकमोर्चे, दोन ठोक मोर्चा, 42 बांधवांचे बळी घेऊन कुठेतरी मागच्या सरकारने मराठा समाजाला आरक्षण दिले; परंतु आताच्या ठाकरे सरकारच्या हलगर्जीपणामुळे न्यायालयाने आरक्षणाला स्थगिती दिली आहे. हे राज्य सरकार आपली बाजू न्यायालयामध्ये भक्कमपणे मांडू न शकल्यामुळे मराठा आरक्षण रद्द झाले आहे. त्याचबरोबर सारथी संस्थेच्या बाबतीतसुद्धा या सरकारने असेच केले. मराठा समाजाच्या प्रत्येक मागणीच्या बाबतीत राज्यकर्ते उदासीन आहेत. त्यामुळे मराठा समाजाचा संयम संपला आहे. राज्य सरकारने मराठा आरक्षणाच्या बाबतीत न्यायालयात आपली बाजू भक्कमपणे मांडली असती तर मराठा समाजावर आज ही वेळ आली नसती. केवळ सरकारच्या नाकर्तेपणामुळे आरक्षण रद्द झाल्याचा सूर मराठा समाजाच्या तरुणांमध्ये निर्माण झाला आहे', असा रोष या वेळी आंदोलनकर्त्यांनी व्यक्त केला. 

या वेळी नगरसेवक राहुल सावंजी, जिल्हाध्यक्ष नागेश गायकवाड, जिल्हा संघटक जमीर इनामदार, मनोज चव्हाण, तालुकाध्यक्ष सूरज फुगारे, शहराध्यक्ष सागर वाघमारे, युवक शहराध्यक्ष वैभव ढेंगील, विद्यार्थी संघटनेचे तालुकाध्यक्ष अक्षय पवार, विद्यार्थी संघटनेचे शहराध्यक्ष सचिन वडतिले, वाहतूक आघाडीचे तालुकाध्यक्ष नागेश नरुटे, राजे ग्रुपचे सुदर्शन ताड, संभाजी घुले, अनिल मुदगुल, माऊली कोंडुभैरी, उमेश आवताडे, प्रज्वल शिंदे, विजय माळी, पोपट पडवळे, ध्रुवांकर हिरेमठ आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The Rasta Rokoo movement was organized by the Chhawa Sanghatna to protest against the suspension of Maratha reservation