
सोलापूर एनटीपीसी परिसरात आगामी काळात 23 मेगावॅट व 40 मेगावॅट सौरऊर्जा प्रकल्प उभारण्याची योजना आहे. या व्यतिरिक्त सोलापूरच्या एनटीपीसीतील उत्पादनातून होणाऱ्या प्रदूषणावर मात करण्यासाठी नव्या तंत्रज्ञानाद्वारे (एफजीडी) दोन नव्या चिमण्यांची उभारणी करण्यात येणार आहे. एका चिमणीची उभारणी मार्च 2021 पर्यंत पूर्ण होईल तर दुसरी पुढील दीड वर्षात पूर्ण होण्याची शक्यता आहे.
सोलापूर : वीज निर्मितीसाठी लागणाऱ्या कच्च्या मालाच्या वाहतुकीत कपात झाल्याने उत्पादन खर्च कमी झाला. बचत झाल्याने कमी दरात वीज पुरवठा करण्यात यश आला. त्यामुळे मागणीतही वाढ झाल्याची माहिती सोलापूर एनटीपीसीचे सरव्यवस्थापक नामदेव उप्पार यांनी दिली. वाढत्या मागणीमुळे सोलापुरातील दोन्ही युनिट सुरू झाल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. दरम्यान, 23 आणि 40 मेगावॅट अशा दोन सौरऊर्जा प्रकल्पांची उभारणी करण्याची योजना असल्याचेही त्यांनी सांगितले.
एनटीपीसीच्या प्रकल्पात सोलापूरपासून दीड हजार किलोमीटर दूर असलेल्या ओडीसा राज्यातून येथून कोळसा आणून वीज निर्मिती केली जात होती. गेल्या सहा महिन्यांपासून तेलंगणातील सिंगरेनी येथील कोळसा खाणीतून म्हणजे 600 किलोमीटर अंतरावरून कोळसा मिळू लागला आहे. त्यामुळे वाहतूक खर्चात मोठी कपात झाली. गेले कित्येक वर्षे युनिटमागे तीन रुपये 80 पैशांनी उत्पादित होत असलेल्या विजेचा उत्पादन खर्च एक रुपयाने कमी म्हणजे दोन रुपये 80 पैशांवर आला. वीज निर्मितीचा दर कमी झाल्याने एनटीपीसीकडून विजेच्या खरेदीची मागणी वाढली आहे. जुलैपासून उत्पादन खर्च कमी झाल्याने तब्बल 80 कोटी युनिटची विक्री झाली आहे. कोरोना कालावधीतही एनटीपीसीतून विद्युत निर्मिती होत होती. विजेला दिवाळीत आणखी मागणी वाढेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
सोलापूर एनटीपीसी परिसरात आगामी काळात 23 मेगावॅट व 40 मेगावॅट सौरऊर्जा प्रकल्प उभारण्याची योजना आहे. या व्यतिरिक्त सोलापूरच्या एनटीपीसीतून विज निर्मीती करण्यावेळी सल्फरडाय ऑक्साइडची मात्रा कमी करण्यासाठी एफजीडी (प्रणाली) नव्या तंत्रज्ञान प्रकल्पाची उभारणी करण्यात येत आहे. यासाठी दोन नव्या चिमण्यांची उभारणी करण्यात येणार आहे. त्यातील पहिले युनिट मार्च 2021 पर्यंत कार्यरत होईल तर दुसरे पुढील दीड वर्षात सुरू होण्याची शक्यता आहे. या दोन चिमण्यांमुळे पर्यावरणपूरक वातावरण निर्माण करण्यात येईल. हवेत उडणाऱ्या राख (ऍश) शून्य राहणाऱ्या प्रकल्पाचा हा प्रयोग राहील. सोलापूरच्या एनटीपीसी प्रकल्पातून महाराष्ट्र, मध्य प्रदेश, छत्तिसगड, गोवा, दिव-दमण, दादरा-नगर-हवेली आदी राज्य आणि केंद्र शासित प्रदेशांना वीज पुरवठा केला जात असल्याचे श्री. उप्पार यांनी सांगितले.
सामाजिक वनीकरण विभागाशी दरवर्षी 50 हजार वृक्षलागवड करण्यासंदर्भात केलेल्या कराराप्रमाणे सोलापूर जिल्ह्यात साडेतीन लाखांहून अधिक रोपांची लागवड करुन हरीत सोलापूरसाठी सतत प्रयत्न सुरु आहेत. कोरोनाच्या कालावधीत कोविड केअर सेंटर व प्राथमिक आरोग्य केंद्रास तसेच पोलिसांसाठी थर्मल स्कॅनर, वैद्यकीय साहित्याचे मास्क, सॅनिटायझर, हॅंडग्लोजचे वाटप करण्यात आले. जिल्हा प्रशासनास पाच लाखांचा निधी दिल्याचे श्री. उप्पार यांनी सांगितले. सोलापूरला पाणी पुरवठ्याचा उजनी सोलापूर समांतर जलवाहिनीकरीता एनटीपीसी व महापालिकेत झालेल्या 250 कोटींच्या सामंज्यस करारापैकी 5 कोटी रुपये एनटीपीसीने आदा केले. कामाच्या पुर्ततेप्रमाणे उर्वरीत रक्कमही आदा केली जाईल, असेही त्यांनी सांगितले.
या पत्रकार परिषदेस सरव्यवस्थापक के. वेंकटय्या, अनिल कुमार, अनिल श्रीवास्तव, दीपक रंजन देहूरी, जनसंपर्क अधिकारी शरद शिंदे उपस्थित होते.
विशेष...
संपादन : अरविंद मोटे