अन्य जिल्ह्यातून सोलापुरात आलेल्यांना नोंदणी बंधनकारक 

प्रमोद बोडके
Sunday, 22 March 2020

जिल्ह्यातील 82 जण होम क्वारंटाईनमध्ये 
सोलापूर जिल्ह्यात घरामध्ये अलगीकरण केलेल्या (होम क्वारंटाईन ) नागरिकांची संख्या 138 होती. त्यापैकी 56 लोकांचा क्वारंटाईन कालावधी पूर्ण झाल्याने त्यांना मुक्त करण्यात आले असून उर्वरित 82 नागरिक अद्याप ही होम क्वारंटाईन आहेत. छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयातील आयसोलेशन कक्षात आतापर्यंत एकूण 16 लोकांना भरती करण्यात आले होते. 12 जणांचा तपासणी अहवाल निगेटिव्ह आल्याने त्यांना घरी सोडण्यात आले. उर्वरित चार पैकी दोघे कोरोना बाधित लक्षणांच्या निकषांत बसत नाहीत. तसेच त्यांनी परदेशात प्रवास केलेला नाही किंवा परदेशी नागरिकांच्या संपर्कात आलेले नसल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे. उर्वरित दोघांचे अहवाल अद्याप अप्राप्त असून हे अहवाल उद्यापर्यंत (सोमवार) मिळतील अशी अपेक्षा जिल्हाधिकारी शंभरकर यांनी व्यक्त केली. 

सोलापूर : पुणे, मुंबईसह इतर जिल्ह्यातून सोलापूर जिल्ह्यात आलेल्या व येणाऱ्या व्यक्तींची नोंदणी बंधनकारक करण्यात आली आहे. गाव पातळीवर पोलिस पाटील यांच्याकडे, नगरपरिषद/नगरपालिका/नगरपंचायत हद्दीसाठी मुख्याधिकारी यांच्या कार्यालयात आणि सोलापूर महापालिका क्षेत्रासाठी झोनल ऑफिसर यांच्याकडे नोंदणी करण्याचा आदेश जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी बजावला आहे. 
हेही वाचा - रस्त्यावर जल्लोष; सोलापूरकरांना पडला "कोरोना'चा विसर 
इतर जिल्ह्यातून आलेल्या व्यक्तींनी 14 दिवस घरातच राहावे, गावात किंवा इतर गावात फिरू नये. बाहेर गावाहून आलेल्या व्यक्तींना सर्दी, ताप व श्‍वसनाचा त्रास उद्‌भवल्यास त्यांनी जवळच्या सरकारी दवाखान्यात तपासणी करण्याचीही सूचना करण्यात आली आहे. कर्नाटक राज्यातून सोलापूर जिल्ह्यात येणाऱ्या वाहनांची तपासणी करण्यासाठी जिल्ह्यात नांदणी-टाकळी (ता. दक्षिण सोलापूर), मरवडे (ता. मंगळवेढा), दुधनी (ता. अक्कलकोट) व वागदरी (ता. अक्कलकोट) येथे तपासणी नाके सुरू करण्यात आले आहेत. या तपासणी केंद्रांवर आत्तापर्यंत 251 वाहनांमधील सुमारे 900 नागरिकांची तपासणी करण्यात आली आहे. 
या चार तपासणी नाक्‍यांशिवाय उद्यापासून (सोमवार) भीमानगर-टेंभुर्णी, सराटी-अकलूज व नातेपुते येथे पुणे व सातारा येथून येणाऱ्या वाहनांची, प्रवाशांची तपासणी करण्यासाठी नवीन तपासणी नाके उभारण्यात येत आहेत. या आदेशाचा भंग करणाऱ्या रुग्णांवर व त्याच्या नातेवाइकांवर आपत्ती व्यवस्थापन व साथ रोग नियंत्रण कायद्यान्वये कारवाई करण्यात येणार असल्याचेही जिल्हाधिकारी शंभरकर यांनी सांगितले. 
हेही वाचा - विद्यापीठांना टाळे! घरबसल्या शैक्षणिक आराखडा तयार करण्याचे आदेश 
जिल्ह्यात आज सहा गुन्हे दाखल 
आजच्या जनतेच्या संचार बंदीत खबरदारीची उपाययोजना म्हणून सोलापूर शहरात दोन उपायुक्त, चार सहायक पोलिस आयुक्त, 18 पोलिसनिरीक्षक, 51 पोलिस उपनिरीक्षक आणि 757 पोलिस शिपाई तैनात करण्यात आले होते. पोलिस आयुक्तालयाच्याहद्दीत 14 मार्चपासून आजपर्यंत 176 गुन्हे नोंद झाले आहेत. ग्रामीण पोलिस विभागाच्या हद्दीत 95 गुन्हे दाखल झाले आहेत. ग्रामीण पोलिसांच्या हद्दीत आज सहा गुन्हे नोंदवण्यात आले आहेत. त्यापैकी पांगरी पोलिस स्टेशनमध्ये चार तर सांगोला आणि अकलूज येथे प्रत्येकी एक गुन्हा नोंदवण्यात आला आहे. ग्रामीण भागात बंदोबस्तासाठी 115 अधिकारी तर 1 हजार 800 कर्मचारी नियुक्त करण्यात आले होते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Registration is mandatory for those who come from other districts to Solapur