विद्यापीठांना टाळे ! घरबसल्या शैक्षणिक आराखडा तयार करण्याचे आदेश

तात्या लांडगे
रविवार, 22 मार्च 2020

  • कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कुलगुरू डॉ. फडणवीस यांनी घेतला निर्णय 
  • विद्यापीठ परिसरात विद्यार्थी, पालकांसह अनावश्‍यक कर्मचाऱ्यांना बंदी 
  • प्राध्यापकांनी घरबसल्या आगामी शैक्षणिक वर्षाचा आराखडा तयार करण्याच्या सूचना 
  • प्राध्यापक देणार विद्यार्थ्यांना ऑनलाइन धडे : विद्यार्थ्यांनी प्राध्यापकांशी संपर्क साधावा 
  • आपत्कालीन परिस्थितीत बोलावलेल्या अधिकारी, कर्मचाऱ्यांनी विद्यापीठात येणे बंधनकारक 
  • मार्चएण्डपर्यंत विद्यापीठाचे सर्व शैक्षणिक व प्रशासकीय विभाग बंद राहणार 

सोलापूर : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ 31 मार्चपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस यांनी घेतला. या काळात विद्यापीठाचे सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी मुख्यालय न सोडता घरी बसूनच आवश्‍यक ती प्रशासकीय कामे करावीत, असेही कुलगुरुंनी स्पष्ट केले आहे. 

हेही नक्‍की वाचा : जनता कर्फ्यू ! घरगुती विजेच्या वापरात मोठी वाढ 

विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. विकास घुटे यांनी रविवारी (ता. 22) परिपत्रक काढून यासंदर्भात अधिकारी व कर्मचाऱ्यांना सूचना दिल्या. कोरोना या विषाणूच्या प्रादुर्भावामुळे 31 मार्चपर्यंत विद्यापीठ परिसरही बंद ठेवला जाणार आहे. मार्चएण्डपर्यंत विद्यापीठाचे सर्व शैक्षणिक व प्रशासकीय विभाग बंद राहणार आहे. शासनाच्या निर्देशानुसार हा निर्णय घेतल्याचेही डॉ. घुटे म्हणाले. वैद्यकीय विभाग, तातडीची सेवा देणारे विभाग, सुरक्षा विभागांसह अन्य विभागांना ज्यांची सेवा अत्यावश्‍यक वाटते, त्यांनी निर्णय घ्यावा, असेही शासनाने स्पष्ट केले आहे. आपत्कालीन परिस्थितीत ज्यांना बोलावण्यात येईल, त्यांनी विद्यापीठात उपस्थित राहणे बंधनकारक असेल. विद्यापीठाकडून वेळोवेळी दिल्या जणाऱ्या सूचनांचे पालन करणे अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी बंधनकारक राहील, असेही त्यांनी स्पष्ट केले. 

हेही नक्‍की वाचा : तब्बल 650 कोटींचा फटका ! 31 मार्चपर्यंत रेल्वे अन्‌ लालपरीची सेवा बंद 

शिक्षकांनी घरबसल्या तयार करावा शैक्षणिक आराखडा 
विद्यापीठ व संलग्नित महाविद्यालयातील अध्यापनाचे कार्य 31 मार्चपर्यंत बंद राहणार आहे. त्यामुळे विद्यार्थी व शिक्षक घरीच आहेत. मनुष्यबळ विकास मंत्रालयाच्या ('एमएचआरडी') निर्देशानुसार शिक्षकांनी घरी राहूनच पुढील शैक्षणिक वर्षाचा आराखडा तयार करावा, अशा सूचना पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस यांनी प्राध्यापकांना दिल्या आहेत. तसेच ऑनलाइन पद्धतीने विद्यार्थ्यांना शिक्षण देण्याचा प्रयत्नही करावा, असे स्पष्ट केले आहे. विद्यार्थ्यांनीही प्राध्यापकांशी संपर्क करावा, असेही त्यांनी सांगितले. 

हेही नक्‍की वाचा : रेल्वे लॉक डाउन ! 31 मार्चपर्यंत एकही रेल्वे धावणार नाही


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Universities locked Order to create a educational plan at home