लॉकडाऊन कालावधीत पकडलेली वाहने सोडून द्या; कोणी केली मागणी वाचा

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 15 मे 2020

कोरोना व्हायरसचा संसर्ग रोखण्यासाठी सरकारने जाहीर केलेल्या लॉकडाऊन कालावधीत पोलिसांनी अनेक वाहने जप्त केली आहेत. या वाहनधारकांना नोटीसद्वारे फक्त समज द्यावी. त्यांच्याकडून कोणतीही दंडाची रक्कम न घेता ही वाहने सोडावीत, अशी मागणी सोलापूर शहर राष्ट्रवादीच्या वतीने पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्याकडे करण्यात आली आहे.

सोलापूर : कोरोना व्हायरसचा संसर्ग रोखण्यासाठी सरकारने जाहीर केलेल्या लॉकडाऊन कालावधीत पोलिसांनी अनेक वाहने जप्त केली आहेत. या वाहनधारकांना नोटीसद्वारे फक्त समज द्यावी. त्यांच्याकडून कोणतीही दंडाची रक्कम न घेता ही वाहने सोडावीत, अशी मागणी सोलापूर शहर राष्ट्रवादीच्या वतीने पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्याकडे करण्यात आली आहे.
पालकमंत्री भरणे आज सोलापूरच्या दौऱ्यावर आले होते. यावेळी शहराध्यक्ष भारत जाधव,  शहर कार्याध्यक्ष संतोष पवार यांच्यासह राष्ट्रवादीच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी पालकमंत्री भरणे यांची सोलापुरातील शासकीय विश्रामगृहात भेट घेतली. लॉकडाउन कालावधीत उद्योग व व्यवसाय बंद असल्याने सर्वसामान्यांच्या दैनंदिन जीवनात अनेक अडचणी निर्माण झाल्या आहेत. आर्थिक समस्यांना त्यांना तोंड द्यावे लागत आहे. अशातच जप्त केलेले वाहन ताब्यात मिळविण्यासाठी त्यांना दंडाची रक्कम भरावी लागण्याची शक्यता आहे. ही रक्कम भरण्यासाठी त्यांच्याकडे पैसे उपलब्ध नाहीत. पोलिसांनी अहोरात्र मेहनत घेऊन लॉकडाऊन कालावधीत चांगले काम केले आहे. त्यांच्याही कामाची कदर व्हावी यासाठी वाहनधारकांना फक्त रीतसर नोटीस देऊन समज द्यावी व ही वाहने सोडून द्यावीत अशी मागणी पालकमंत्री यांच्याकडे करण्यात आली आहे. 

मंत्रिमंडळ स्तरापर्यंत पोहोचवावा...
राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये, प्रमुख शहरांमध्ये पोलिसांनी लॉकडाऊन कालावधीत वाहने जप्त केली आहेत. ही वाहने सोडून देण्यासाठी राज्य स्तरावरूनच निर्णय अपेक्षित आहे. सोलापूरचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी हा विषय मंत्रिमंडळ स्तरापर्यंत पोहोचवावा अशी विनंती त्यांना करण्यात आली आहे.
- संतोष पवार, कार्याध्यक्ष, सोलापूर शहर राष्ट्रवादी काँग्रेस


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Release vehicle caught during the lockdown period