माळरानामध्ये येणाऱ्या इगलवर्गीय पक्ष्यांवर व्हावे संशोधन : पक्षी संशोधक ड़ॉ. शिवाजी चव्हाण 

प्रकाश सनपूरकर
Tuesday, 27 October 2020

पक्षी संशोधक व नांदेड येथील संत रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील स्कूल ऑफ लाइफ सायन्स (प्राणीशास्त्र) विभागाचे प्रमुख डॉ. शिवाजी चव्हाण यांनी सोलापूर आसपासच्या माळराने व जलाशय या ठिकाणी भ्रमंती करून पक्षांचे सर्वेक्षण केले. या सर्वेक्षणात ज्येष्ठ पक्षी अभ्यासक डॉ. अरविंद कुंभार, वन्यजीव छायाचित्रकार शिवानंद हिरेमठ व ऋतुराज कुंभार यांनी सहभाग नोंदवला. 

सोलापूरः सोलापूर परिसरातील ग्रासलॅंड व इगलवर्गीय पक्ष्यांची मोठी संख्या या दोन्ही बाबीच्या संदर्भात संशोधन व अभ्यासाला चालना मिळण्याची गरज आहे. तसेच माळरानांची ही वैशिष्ट्ये जपण्यासाठी मोठे प्रयत्न व्हावेत अशी अपेक्षा पक्षी संशोधक डॉ. शिवाजी चव्हाण यांनी व्यक्त केली आहे. 

हेही वाचाः जो कारखाना लवकर तोड देईल त्यालाच ऊस देणार ! शेतकरीवर्ग झाला सतर्क 

पक्षी संशोधक व नांदेड येथील संत रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील स्कूल ऑफ लाइफ सायन्स (प्राणीशास्त्र) विभागाचे प्रमुख डॉ. शिवाजी चव्हाण यांनी सोलापूर आसपासच्या माळराने व जलाशय या ठिकाणी भ्रमंती करून पक्षांचे सर्वेक्षण केले. या सर्वेक्षणात ज्येष्ठ पक्षी अभ्यासक डॉ. अरविंद कुंभार, वन्यजीव छायाचित्रकार शिवानंद हिरेमठ व ऋतुराज कुंभार यांनी सहभाग नोंदवला. 

हेही वाचाः कोरोनामुक्तीच्या उंबरठ्यावरील प्रभाग 

ते पुढे म्हणाले की, सोलापूरचे माळरान हे इगलवर्गीय पक्ष्यांच्या दृष्टीने महत्वाचे आहे. महाराष्ट्रातील गौताळा अभयारण्याच्या तुलनेत सोलापूर माळरानांमध्ये आढळणारे अन्नसाखळीमधील अत्यंत कमी संख्येने असलेले इगलवर्गीय पक्षी अधिक प्रमाणात येतात. विशेष म्हणजे त्या पैकी अनेक पक्षी कझाकीस्तान सारख्या दुरच्या भागातून स्थलांतरीत होतात. योग्य अधिवास शोधूनच हे स्थलांतरीत पक्षी येत असतात. सोलापूर परिसरतील जैवविविधता ही त्या दृष्टीने महत्वाची आहे. ती जपण्यासाठी मानवी हस्तक्षेप त्यामध्ये जेवढा कमी होईल तेवढे उत्तम आहे. तसेच छायाचित्रणासोबत आता सोलापुरच्या पक्षी निरिक्षणाला अभ्यास व संशोधनाची जोड दिली पाहिजे. कारण इगलवर्गीय पक्षी जे की अन्न साखळीत अत्यंत कमी असतात त्यांचा अभ्यास करण्यासाठी सोलापूरचे ग्रासलॅंड अत्यंत उपयुक्त मानले पाहिजे. 
दोन दिवसांच्या सर्वेक्षणात मोठ्या प्रमाणात याठिकाणी पावसाळी स्थलांतरित शिकारी पक्ष्यांबरोबर स्थानिक ससाणे, घारी, खाटिक आदी पक्षी सध्या संख्येत गवताळ प्रदेशात कीटक मटकावताना नजरेस पडतात. माळरानाचे वैभव असलेले भटतितर, धाविक, माळटिटवी, दयाळ, गप्पीदास, कोतवाल, विविध प्रकारचे चंडोल, लावा, तितर, होला, सातभाई, मुनिया, वेडाराघू इत्यादी पक्षी बहुसंख्येने सध्या गवतावरील कीटकखाद्य टिपताना सक्रिय असल्याचे दृश्‍य पाहायला मिळते. दमदार पावसामुळे माळरानावरील वगळी व ताली पाण्याने भरल्यामुळे या छोट-छोट्या पाणवठ्यावर रंगीत करकोचे, चमचे चोच, पांढऱ्या मानेचा करकोचा, काळा व पांढरा कुदळे, हळदीकुंकू बदक, पाण कावळे, बगळे आदी पाणपक्षीही गर्दी करून वावरताना दिसतात. उत्तरेकडून पावसाळ्याच्या प्रारंभी हमखास येणारे तीन प्रकारचे चातक व युरोपियन नीलकंठ इत्यादी स्थलांतरित पक्षी सध्या सोलापूर भोवती गर्दी करून वावरत आहेत. 

अभ्यास व संशोधन वाढावे 
सोलापूर शहराभोवती असलेल्या विस्तीर्ण माळरान व हिप्परगा जलाशय हे जैवविविधतेसाठी महत्वाचे स्थान आहेत. ही जैवविविधता टिकवण्यासाठी सर्वांनी पाऊल उचलले पाहिजे. दिवसेंनदिवस ऱ्हास होत चाललेल्या पक्षी व वन्यप्राण्यांची संख्या टिकून राहायला पाहिजे. 
- डॉ. शिवाजी चव्हाण, पक्षी संशोधक, संत रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड. 

निसर्ग घटकांची काळजी घेण्याची गरज 
यंदा भरपूर पाऊस पडल्यामुळे जिल्हातील माळराने व पाणवठ्यावर पक्ष्यांच्या वापरासाठी अतिशय पोषक वातावरण निर्माण झाले आहे. हिवाळ्यात अनेक स्थलांतरित पाहुणे पक्षी दाखल झाले आहेत. पक्षी निरीक्षण व निसर्ग भ्रमंती करताना निसर्गातील घटकांना हानी पोहचवू नये, या दृष्टीने शास्त्रोक्त पद्धतीने वावरले पाहिजे. 
- डॉ. अरविंद कुंभार, जेष्ठ पक्षी अभ्यासक  
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Research should be done on eagle birds coming to Malrana: Bird researcher Dr. Shivaji Chavan