
सोलापूर ः वीर जवान देशाच्या सीमेवर शौर्याच्या जोरावर शत्रूला नामोहरण करून आपले रक्षण करतात. वीर जवानांनी देशसेवेसाठी आपले योगदान आणि बलिदान दिले आहे. त्यांच्या कुटुंबियांना शासनस्तरावर सर्वतोपरी मदत करण्यात येत असल्याचे प्रतिपादन निवासी उपजिल्हाधिकारी तथा प्रभारी जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी अजित देशमुख यांनी केले.
सोलापूर ः वीर जवान देशाच्या सीमेवर शौर्याच्या जोरावर शत्रूला नामोहरण करून आपले रक्षण करतात. वीर जवानांनी देशसेवेसाठी आपले योगदान आणि बलिदान दिले आहे. त्यांच्या कुटुंबियांना शासनस्तरावर सर्वतोपरी मदत करण्यात येत असल्याचे प्रतिपादन निवासी उपजिल्हाधिकारी तथा प्रभारी जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी अजित देशमुख यांनी केले.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बहुउद्देशीय सभागृहात शौर्य दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात श्री. देशमुख बोलत होते. यावेळी सहायक पोलिस आयुक्त महावीर सकळे, तहसीलदार श्रीकांत पाटील यांच्यासह वीर माता-पिता, वीर पत्नी आणि त्यांचे नातेवाईक उपस्थित होते.
2016 मध्ये जम्मू-काश्मिरमधील पुलवामा येथे केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या तुकडीवर आतंकवादी हमला झाला होता. या भ्याड हल्ल्याला प्रत्युत्तर आणि शत्रूला धडा शिकविण्यासाठी भारतीय पॅरा कमांडोंनी 28 आणि 29 सप्टेंबर 2016 मध्ये पाकिस्तान हद्दीत घुसून एअर स्ट्राईक करीत आतंकवाद्यांचे अड्डे उद्धवस्त केले होते. आतंकवादी हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांचा सन्मान म्हणून 29 सप्टेंबरला शौर्य दिन साजरा केला जात आहे. शहिदांना बिगुल धून वाजवून श्रद्धांजली वाहण्यात आली.
श्री. देशमुख म्हणाले, ""वीर जवानांच्या पत्नींनी पुढची पिढी घडविण्यासाठी काम करावे. शिक्षणानुसार त्यांना नोकरीसाठी मार्गदर्शन करण्यात येणार आहे. वीर माता-पिता, पत्नी या आमच्यासाठी मौल्यवान आहेत. सध्या कोरोना काळात प्रत्येकांनी सोशल डिस्टन्सिंग ठेवणे, मास्कचा वापर, हात साबणाने स्वच्छ धुणे हे काटेकोरपणे करा. माझे कुटुंब-माझी जबाबदारी या शासनाच्या मोहिमेंतर्गत आरोग्य पथक घरी येईल, त्यांना आरोग्याची खरी माहिती द्या. आजार त्वरित समजला तर उपचाराने कोरोनावर मात करता येते.'' यावेळी सर्वांच्या अडचणी जाणून घेऊन त्यावर तोडगा काढणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
यावेळी वीर पिता मुन्नागीर गोसावी, वीरपत्नी अर्चना सुनील काळे, पपिता पात्रे, वर्षा लटके, इंदू गवळी, मालनबाई जगताप, अलका कांबळे, साजिया शेख, सुनिता शिंदे या वीर जवानांच्या कुटुंबांचा यावेळी मान्यवरांच्या हस्ते सन्मान केला. तसेच सेना मेडल कॅप्टन रावसाहेब साळुंखे, सुभेदार मेजर आर. के. उतारे, कॅप्टन दत्ता केदार यांचाही मान्यवरांच्या हस्ते सन्मान केला. यावेळी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयातील वरिष्ठ लिपीक अनिल मेंगशेट्टी, कल्याण संघटक मार्तंड दाभाडे, संजीव काशीद, लिपीक दिनेश नागणे, गुरुनाथ कुलकर्णी, समीर आरकाटे, वसतीगृह अधीक्षक सतीश रासकर, आशादेवी किवडे, एम. यु. मुल्ला, राजेसाहेब शेख, मारूती शेवडे उपस्थित होते.