
एका ग्रामपंचायतीच्या निकालाला साधारण एक तासाचा अवधी लागणार आहे. 36 टेबलसाठी 108 कर्मचारी, २० संगणक ऑपरेटर व अन्य राखीव असे १५० कर्मचारी नियुक्त केले आहेत.
मोहोळ (सोलापूर) : मोहोळ तालुक्यातील निवडणुका झालेल्या 63 ग्रामपंचायतीच्या मत मोजणीची तयारी पूर्ण झाली असून, महसूल प्रशासनाचे 150 कर्मचारी नियुक्त केले आहेत. दरम्यान मत मोजणीनंतर कोणतीही अप्रिय घटना घडू नये, यासाठी 200 पोलिस कर्मचारी व अधिकार्यांचा बंदोबस्त तैनात केल्याची माहिती पोलिस निरीक्षक अशोक सायकर व तहसीलदार जीवन बनसोडे यांनी दिली.
सोलापूरच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
यासंदर्भात निवडणूक नायब तहसीलदार राजशेखर लिंबारे यांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी होणाऱ्या मत मोजणीसाठीची व्यवस्था शासकीय धान्य गोदामात केली आहे. त्या ठिकाणी एकूण 36 टेबल मांडण्यात आले आहेत. एका ग्रामपंचायतीच्या निकालाला साधारण एक तासाचा अवधी लागणार आहे. 36 टेबलसाठी 108 कर्मचारी, २० संगणक ऑपरेटर व अन्य राखीव असे १५० कर्मचारी नियुक्त केले आहेत. मतमोजणी सकाळी साडेआठ वाजता सुरू होणार आहे. दुपारी दोन वाजेपर्यंत सर्व निकाल हाती येतील, असे तहसीलदार लिंबारे यांनी सांगितले. मत मोजणीला जाताना मोबाईल व अन्य इलेक्ट्रॉनिक वस्तू नेता येणार नाहीत.
हे ही वाचा : शिष्यवृत्तीसाठी कागदपत्रे अडविणा-या महाविद्यालयांवर होणार कारवाई
मोठा पोलीस बंदोबस्त तैनात
मतमोजणीच्या पार्श्वभूमीवर पोलिस निरीक्षक, सहाय्यक पोलिस निरीक्षक व पोलिस उपनिरीक्षक या दर्जाचे दहा अधिकारी नियुक्त केले आहेत. तर १०० पोलिस कर्मचारी 75 होमगार्ड तैनात केले आहेत. राज्य राखीव पोलिस दलाच्या तुकड्याही तैनात केल्या आहेत. ग्रामपंचायतीची मतमोजणी होताच गोंधळ होऊ नये, यासाठी राजकीय दृष्ट्या संवेदनशील असणाऱ्या पोखरापूर, नजीक पिंपरी, शेज बाभुळगाव, अंकोली, सय्यद वरवडे, टाकळी सिकंदर, पाटकुल, पेनुर, खंडाळी, शेटफळ, आष्टी व नरखेड या गावात जादा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. तर प्रत्येक गावात दोन पोलिस कर्मचारी व होमगार्ड हे नियुक्त केले आहेत.
ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
वाहनांच्या सायलन्सरच्या पुगळया काढणे, फटाके फोडणे, मिरवणुका काढणे, यावर बंदी घालण्यात आली आहे, असा प्रकार आढळल्यास त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचे पोलिस निरीक्षक सायकर यांनी सांगितले. गाव कामगार पोलिस पाटलांना गावातच थांबून संशयित राजकीय व्यक्ती दिसल्यास ताबडतोब पोलिस ठाण्याशी संपर्क करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत, तर प्रत्येक एक तासाचा अहवाल प्रशासनाला सादर करावयाचा आहे.
हे ही वाचा : कर्मचाऱ्यांचे पोस्टल मतदान स्वतंत्र मोजू नये; शिक्षक समितीची मागणी, तहसीलदारांना निवेदन
अनेक उत्साही कार्यकर्ते उड्डाण पुलावरून पाहणी करतात. त्यातून दुर्घटना घडण्याची शक्यता गृहीत धरून उड्डाण पुलावरही बंदोबस्त तैनात केला आहे. अनेक ठिकाणी बैरीगेट लावण्यात आले आहेत. पाकणी येथील महामार्ग वाहतूक केंद्राची मदत घेण्यात आली आहे. एका नागरिकाची विविध ठिकाणी किमान सहा वेळा तपासणी होणार आहे. गावात गोंधळ घालणाऱ्या विरोधात मुंबई पोलिस अधिनियमाप्रमाणे गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत, त्यासाठी खास पथकाची नियुक्ती केली आहे.
प्रत्येक उमेदवारावर प्रतिबंधक कारवाईच्या पार्श्वभूमीवर नोटिसा देण्यात आल्या आहेत. दुचाकी व चारचाकी वाहनाच्या माध्यमातून फिरती गस्त सुरू राहणार आहे. मत मोजणीसाठी आलेल्या वाहनांच्या पार्किंगची व्यवस्था नागनाथ विद्यालय व बाजार समितीच्या आवारात करण्यात आली आहे. नागरिकांनी सहकार्य करण्याचे आवाहन पोलिस व महसूल प्रशासनाने केले आहे.