
पंढरपूर तालुक्यातील पुळूज येथे भीमा नदी पात्रातून अवैधरित्या वाळू उपसा करत असताना जेसीबी, दोन टिपर, एक टेम्पो आणि पाच ब्रास वाळू असा तब्बल चाळीस लाख 25 हजाराचा माल पोलिसांनी जप्त केला. या प्रकरणी आठ जणांच्या विरोधात पंढरपूर तालुका पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
पंढरपूर (सोलापूर) : तालुक्यातील पुळूज येथे भीमा नदी पात्रातून अवैधरित्या वाळू उपसा करत असताना जेसीबी, दोन टिपर, एक टेम्पो आणि पाच ब्रास वाळू असा तब्बल चाळीस लाख 25 हजाराचा माल पोलिसांनी जप्त केला. या प्रकरणी आठ जणांच्या विरोधात पंढरपूर तालुका पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
या प्रकरणाची पोलिसांकडून समजलेली माहिती अशी, आज तालुक्यातील पुळूज येथे भीमा नदीपात्रातून वाळू उपसा करण्यात येत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यावरुन आज पंढरपूर तालुका पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्ष श्री. खरात, पोलिस हेडकॉन्स्टेबल श्री. नलवडे, श्री. सूर्यवंशी यांनी पुळूज येथे जाऊन पहाणी केली असता दोन टिपरमध्ये (एमएच 10/एडब्लू 7841 आणि एमएच 11/बीए 5346) मध्ये एका जेसीबी मशीनच्या सहाय्याने वाळू भरण्यात येत असल्याचे पोलिसांना दिसले. बेकायदेशीररित्या वाळू उपसा करणारे दोन टिपर, जेसीबी मशीन आणि वाळू असा सुमारे चाळीस लाख 25 हजार रुपयांचा माल पोलिसांनी जप्त केली आणि संबंधितांकडे चौकशी करुन संशयित आरोपींच्या विरोधात गुन्हा दाखल केला.
या प्रकरणी सुधीर उर्फ छाटू सागर माने, जीवन दत्तात्रय भोसले, नवनाथ सुरेश भोसले, नितीन धोडीराम भोसले, सचिन तुकाराम भोई, कल्याण भोसले (सर्व रा. सरकोली, ता. पंढरपूर) आणि सूरज अर्जन म्हमाणे (रा. शंकरगाव) यांच्या विरुध्द पंढरपूर तालुका पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. सहायक पोलिस निरीक्षक श्री. खरात तपास करीत आहेत. उपविभागीय पोलिस अधिकारी विक्रम कदम, पोलिस निरीक्षक किरण अवचर यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.
संपादन : वैभव गाढवे