...अन्‌ "या' मूर्तिकाराने घेतला पर्यावरणपूरक गणेशमूर्तीचा ध्यास; विविध राज्यांतून होतेय मागणी 

प्रकाश सनपूरकर 
Friday, 14 August 2020

काही वर्षांपूर्वी शहरातील बोळकोटे नगरातील मूर्तिकार अंबादास भंडारी यांनी पीओपी गणेश मूर्ती कामास सुरवात केली. मूर्तीचे प्रकार पाहण्यासाठी ते सिद्धेश्‍वर तलावावर विसर्जन मिरवणुकीत जात असत. तेव्हा मूर्ती विसर्जित केल्यानंतर या पीओपीच्या मूर्ती लवकर विरघळत नसल्याचे दिसून आले. या छोट्याशा घटनेनंतर त्यांनी सात वर्षांपूर्वी त्यांनी शाडूच्या गणेशमूर्ती बनवण्याचा निर्णय घेतला. त्या वेळी मातीची गणेश मूर्ती ही संकल्पना लोकांमध्ये रुजलेली नव्हती. मातीची मूर्ती तयार केल्यानंतर त्या वेळी प्रतिसाद अत्यल्प होता. तरीही त्यांनी शाडू मातीच्या मूर्तीचे काम सोडले नाही.

सोलापूर : पीओपीची गणेशमूर्ती विसर्जनानंतर देखील विरघळत नाही. यामुळे जलप्रदूषण वाढत आहे. यामुळे पाण्यातील जलचर प्राण्यांचे जीवन धोक्‍यात येत आहे, हे पाहून गणेश मूर्तिकार अंबादास भंडारी यांनी सात वर्षांपूर्वी शाडू मातीच्या मूर्ती तयार करण्यास सुरवात केली. दर्जेदार माती, तंत्रज्ञान व आकर्षक रंगकामाच्या माध्यमातून त्यांनी बनवलेल्या शाडू मातीच्या मूर्ती आता परराज्यात विक्रीस जात आहेत. 

हेही वाचा : गुरुजींच्या विनंती बदल्या लांबल्या; राज्यातील केवळ "या' जिल्ह्यांनीच केल्या बदल्या 

काही वर्षांपूर्वी शहरातील बोळकोटे नगरातील मूर्तिकार अंबादास भंडारी यांनी पीओपी गणेश मूर्ती कामास सुरवात केली. मूर्तीचे प्रकार पाहण्यासाठी ते सिद्धेश्‍वर तलावावर विसर्जन मिरवणुकीत जात असत. तेव्हा मूर्ती विसर्जित केल्यानंतर या पीओपीच्या मूर्ती लवकर विरघळत नसल्याचे दिसून आले. या छोट्याशा घटनेनंतर त्यांनी सात वर्षांपूर्वी त्यांनी शाडूच्या गणेशमूर्ती बनवण्याचा निर्णय घेतला. त्या वेळी मातीची गणेश मूर्ती ही संकल्पना लोकांमध्ये रुजलेली नव्हती. मातीची मूर्ती तयार केल्यानंतर त्या वेळी प्रतिसाद अत्यल्प होता. तरीही त्यांनी शाडू मातीच्या मूर्तीचे काम सोडले नाही. लोकांना या मूर्ती पाण्यात पूर्ण विरघळतात, हे सांगून त्यांनी निर्मिती व विक्री चालू ठेवली. 

हेही वाचा : सकाळ इम्पॅक्‍ट : धर्मवीर संभाजी तलाव सुशोभीकरणासाठी वर्क ऑर्डर निघाली, पावसाळ्यानंतर प्रारंभ 

या मातीच्या मूर्ती वाळण्यास पंचवीस दिवसांपेक्षा अधिक कालावधी लागतो. तसेच पीओपीच्या तुलनेत मूर्तींची निर्मिती देखील कमी प्रमाणात होते. वर्षभर कारखाना सुरू ठेवून कामगारांना वेतन देण्याचे ठरवले. पण मातीच्या मूर्तीशिवाय पीओपी मूर्तीची विक्री व कमाई त्यांनी कायमची बाजूला ठेवली. अनेक राज्यांतील मातीचे नमुने पाहून त्यांनी माती प्रक्रिया शिकून घेतली. त्यांच्यासमोर खरे आव्हान होते पीओपीच्या मूर्तीच्या बरोबरीची मूर्ती करण्याचे. मातीची खात्री झाल्यानंतर त्यांनी पीओपी मूर्ती कामाच्या तुलनेत अधिक चांगली यंत्रसामग्री आणली. रंग वापरण्याच्या तांत्रिक बाबी शिकून रंगकाम आकर्षक केले. मातीच्या योग्य प्रक्रियेमुळे मूर्तीला तडे जाणे बंद झाले होते. 

उत्तम मूर्ती तयार होऊ लागल्यावर पुणे, मुंबईसह बंगळूर, हैदराबाद व इतर राज्यांत मूर्तींना मागणी येऊ लागली. शाडू मातीची मूर्ती व पीओपी मूर्तीतील आकर्षकतेचा फरक त्यांनी संपवून पीओपीच्या तोडीस तोड मूर्ती तयार केल्या. नंतर पर्यावरणपूरक म्हणून मातीच्या मूर्तीला प्रतिसाद वाढला. या मूर्तीची उंची देखील तीन फुटांपेक्षा कमीच असते. विसर्जन केल्यानंतर ही मूर्ती पूर्णपणे विरघळते. पीओपीच्या तुलनेत या मूर्ती निर्मितीचा वेग कमी असला तरी आकर्षकतेमध्ये मातीच्या मूर्ती आता अधिक उत्तम बनू लागल्या आहेत. वर्षभर कारखाना चालू असल्याने गणेश मंडळे काही महिने आधीच बुकिंग करतात. मूर्ती बनवण्यासाठी अधिक परिश्रम व वेळ लक्षात घेऊन अनेक मंडळे पर्यावरणपूरक म्हणून हीच मूर्ती दरवर्षी घेत असतात. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sculptor Bhandari took the initiative to make an eco friendly Ganesh idol