
लस देताना लाभार्थींची पूर्ण प्राथमिक तपासणी करूनच त्याला लस दिली जात आहे. या कामासाठी आठ वैद्यकीय अधिकारी व आठ समुदाय आरोग्य अधिकारी नियुक्त केले आहेत. या वेळी रुग्णालयाच्या वतीने खासगी वैद्यकीय व्यावसायिक, औषध विक्रेते, आशा वर्कर्स, आरोग्य कर्मचारी यांनी लसीकरण करून घ्यावे, असे आवाहन करण्यात आले.
मोहोळ (सोलापूर) : मोहोळ येथील ग्रामीण रुग्णालयात कोविड - 19 प्रतिबंधक लस देण्याचा आरंभ जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रदीप ढेले यांच्या हस्ते सोमवारी (ता. 25) करण्यात आला. दरम्यान, मोहोळ येथील रुग्णालयातील वातावरण व स्वच्छता पाहून भारावलेले जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. ढेले यांनी स्वतः या रुग्णालयातच लसीकरण करवून घेतले.
यासंदर्भात मिळालेल्या माहितीनुसार, मोहोळ येथील ग्रामीण रुग्णालयाला रविवारी (ता. 24) 790 डोस उपलब्ध झाले आहेत. पहिल्या टप्प्यात एकूण 1435 कर्मचाऱ्यांना लस देण्यात येणार आहे. लस देण्यासाठी एकूण चार पथके नियुक्त केली आहेत. प्रत्येक पथकात पाच सदस्यांचा समावेश करण्यात आला आहे. सोमवारी दिवसभरात एकूण 98 जणांना लसीकरण करण्यात आले. त्यात डॉ. सुहास कादे, डॉ. समीर पटेल, डॉ. किरण बंडगर, डॉ. करिष्मा शेख, डॉ. नितीन सलगर, डॉ. नागणे या डॉक्टरांसह 28 आशा वर्कर्स व 23 इतर कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.
लस देताना लाभार्थींची पूर्ण प्राथमिक तपासणी करूनच त्याला लस दिली जात आहे. या कामासाठी आठ वैद्यकीय अधिकारी व आठ समुदाय आरोग्य अधिकारी नियुक्त केले आहेत. या वेळी रुग्णालयाच्या वतीने खासगी वैद्यकीय व्यावसायिक, औषध विक्रेते, आशा वर्कर्स, आरोग्य कर्मचारी यांनी लसीकरण करून घ्यावे, असे आवाहन करण्यात आले. दरम्यान, लसीकरणानंतर काही गुंतागुंत वाढल्यास महात्मा फुले जनआरोग्य योजनेअंतर्गत मोहोळ - पंढरपूर मार्गावरील डॉ. सुनील लवटे यांच्या रुग्णालयातील 25 टक्के बेड आरक्षित करण्यात आले आहेत. लस घेतल्यानंतर लाभार्थींना प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले. या सर्व यंत्रणेवर तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. अरुण पात्रुडकर, ग्रामीण रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. पी. पी. गायकवाड यांचे नियंत्रण असणार आहे.
संपादन : श्रीनिवास दुध्याल