श्री विठ्ठल दर्शन सुलभ करण्यासाठी पर्यटन विभागाचा मदतीचा हात 

भारत नागणे
Friday, 13 March 2020

मंदिरावर उभारणार 82 फुटांचा भागवत ध्वज 
संत आणि वारकरी परंपरेचा पाया घालणाऱ्या भागवत धर्माची उंच पतका विठ्ठल मंदिरावर वर्षानुवर्षे फडकत आहे. हा ध्वज जीर्ण झाले आहे. त्या ठिकाणी आता 82 फूट उंचीचा स्टीलचा नवा ध्वज उभारण्यात येणार आहे. पूर्वीच्या ध्वजापेक्षा नवा ध्वज उंच आहे. मुंबई येथील पार्थ श्रॉफ या भाविकाने हा ध्वज मंदिर समितीला अर्पण केला आहे. मराठी नवीन वर्षारंभ म्हणजे गुडीपाडव्याला या नव्या भागवत ध्वजाचे अनावरण केले जाणार आहे. मंदिरातील बाजाराव पडसाळीमध्ये हा ध्वज उभारण्यात येणार आहे. या नवीन ध्वजासाठी सुमारे 17 लाख रुपये खर्च अपेक्षित असल्याचेही मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी विठ्ठल जोशी यांनी सांगितले.

पंढरपूर (जि. सोलापूर) : श्री विठ्ठल-रुक्‍मिणीची पदस्पर्श दर्शन रांग अधिक सुलभ करण्यासाठी राज्याच्या पर्यटन विभागाने मदतीचा हात पुढे केला आहे. स्कॉयवाक आणि दर्शन मंडप उभारण्यासाठी 40 कोटीची नवीन प्रस्ताप मंदिर समितीने जिल्हाधिकाऱ्यांमार्फत पर्यटन विभागाला तातडीने पाठवण्याची सुचना विधान परिषदेच्या उपसभापती निलम गोऱ्हे यांनी दिल्याची माहिती मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी सुनिल जोशी यांनी आज 'सकाळ'शी बोलताना दिली. 

हेही वाचा - नाव एकाचे तर पैसे दुसऱ्याच्या खात्यावर 

उपसभापती श्रीमती गोऱ्हे यांच्या उपस्थितीत विधानभवनात गुरुवारी (ता.12) पुणे विभागातील तीर्थक्षेत्रांच्या प्रलंबित प्रश्नांवरती आणि नवीन विकास कामांच्या संदर्भात बैठक पार पडली. या बैठकीमध्ये मंदिर समितीच्या दर्शन रांगेविषयी सकारात्मक चर्चा झाली. यात्रा काळात विठ्ठल दर्शनासाठी लाखो भाविक पंढरपुरात येतात. गोपाळपूर रोडवरील दहा पत्राशेड भरुन पुढे गोपाळपूरपर्यंत दर्शन रांग जाते. मंदिर समितीला दरवर्षी दर्शन रांग तयार करण्यासाठी लाखो रुपये खर्च करावे लागतात. शिवाय भाविकांनाही त्रास सहन करावा लागतो. दर्शनरांग सुलभ व्हावी, यासाठी मंदिर समितीने यापूर्वीच मंदिरापासून ते सारडा भवनपर्यंत स्कॉयवॉक तयार केला. सारडा भवन ते पत्रशेडपर्यंतचे स्कायवॉकचे काम अपूर्ण आहे. त्यामुळे दर्शन रांगेत नेहमीच गर्दी आणि गोंधळ होते. 
यावर कायम स्वरुपी तोडगा काढण्यासाठी मंदिर समितीने पत्रशेडच्या जागेवर दर्शन मंडप उभारण्याचा प्रस्ताव यापूर्वीच तयार केला आहे. परंतु निधी अभावी हे काम रखडले आहे. उपसभापतींच्या उपस्थितीत झालेल्या या बैठकीत यावर चर्चा करण्यात आली. यावेळी श्रीमती गोऱ्हे यांनी स्कायवॉक आणि दर्शन मंडपासाठी सुमारे 40 कोटी निधी पर्यटन खात्याकडून मिळवण्यासाठी पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांच्याकडे पाठपुरावा केला जाईल. यासाठी मंदिर समितीने तसा प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत पर्यटन विभागाला सादर करण्याच्या सूचना ही त्यांनी दिल्या आहेत. यावेळी मंदिर व परिसरातील सीसीटीव्ही, सौर उर्जा, उंच मनोरे या बाबतही बैठकीत चर्चा झाली. त्यांच्या सुचनेनुसार लवकरच तसा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांमार्फत पर्यटन विभागाला सादर केला जाईल, असेही श्री. जोशी यांनी सांगितले. बैठकीला सांस्कृतिक कार्य उपसचिव विलास थोरात, पुरातत्व विभागाचे संचालक डॉ. तेजेस गर्गे, संजीव जाधव, पर्यटन सहसंचालक धनंजय सावळकर, मंदिर समितीचे व्यवस्थापक बालाजी पुदलवाड आदी उपस्थित होते. 

कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर भाविकांच्या हातावर सेनिटायझरचे थेंब 
कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर विठ्ठल रुक्‍मिणी मंदिर समितीने दक्षता घेतली आहे. गेल्या आठ दिवसांपासून मंदिरात प्रत्येक तासाला स्वच्छता केला जात आहे. त्याच बरोबर बाहेर गावाहून येणाऱ्या भाविकांसाठी मंदिर समितीने सेनिटायझर उपलब्ध करुन दिले आहे. आजपासून मंदिरात विठ्ठल दर्शनासाठी येणाऱ्या प्रत्येक भाविकाच्या हातावर सेनिटायझरचे दोन थेंब टाकण्याचे काम सुरु केले आहे. मंदिराच्या तिन्ही द्वारांवर समितीने कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली आहे. याच बरोबर मंदिरात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनाही आज मास्कचे वाटप करण्यात आले. मंदिर समितीने 21 हजार रुपयांचे सुमारे 50 लिटर सेनिटायझर पुणे येथून खरेदी केली आहे. गरजेनुसार आणखी घेण्यात येणार आहे. मंदिरात दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांनी मास्क घालून आणि सेनिटायझरने हात निर्जंतुकीकरण करुन मंदिरात यावे, असे आवाहन मंदिर समितीच्या वतीने करण्यात आले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Send Rs 40 crore proposal for setting up Shree Vitthal Darshan Pavilion