शिवसेना म्हणते कॉंग्रेसवर नाही भरोसा ! एमआयएम, "वंचित'ने मागितल्या "या' समित्या 

तात्या लांडगे 
Wednesday, 7 October 2020

परिवहन सभापतीच्या निवडीवेळी कॉंग्रेसने त्यांचे दोन सदस्य जाणीवपूर्वक गैरहजर ठेवून शिवसेनेला तोंडघशी पाडले, असा आरोप विरोधी पक्षनेते महेश कोठे यांनी केला आहे. त्यामुळे आता विषय समित्यांच्या निवडीत कॉंग्रेसने पुढाकार घ्यावा, त्यांच्यासोबत शिवसेना असेल, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे. दरम्यान, 20 ऑक्‍टोबरला समित्यांच्या निवडी होण्यापूर्वीच एमआयएमचे काही नगरसेवक राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे. 

सोलापूर : परिवहन सभापतीच्या निवडीवेळी कॉंग्रेसने त्यांचे दोन सदस्य जाणीवपूर्वक गैरहजर ठेवून शिवसेनेला तोंडघशी पाडले, असा आरोप विरोधी पक्षनेते महेश कोठे यांनी केला आहे. त्यामुळे आता विषय समित्यांच्या निवडीत कॉंग्रेसने पुढाकार घ्यावा, त्यांच्यासोबत शिवसेना असेल, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे. दरम्यान, 20 ऑक्‍टोबरला समित्यांच्या निवडी होण्यापूर्वीच एमआयएमचे काही नगरसेवक राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे. तर शिवसेनेने कॉंग्रेसवर भरोसा नसल्याचे स्पष्ट केल्याने अशा नाराजांना आपलेसे करण्याचा प्रयत्न भाजपकडून करण्यात येत असल्याची चर्चा सुरू झाली आहे. 

महाराष्ट्रात शिवसेना, कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेसची महाविकास आघाडीची सत्ता आहे. या पार्श्‍वभूमीवर सोलापूर महापालिकेत एमआयएम व वंचित बहुजन आघाडीला सोबत घेऊन शिवसेना, कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेसने भाजपला एकही विषय समिती मिळू न देण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत. आमदार प्रणिती शिंदे या 8 ऑक्‍टोबरला सोलापुरात येणार आहेत. तर कॉंग्रेसचे शहराध्यक्ष प्रकाश वाले हे आजारी असून विरोधी पक्षनेते महेश कोठे होम क्‍वारंटाईन आहेत. दुसरीकडे, वंचित बहुजन आघाडीचे आनंद चंदनशिवे हेही 8 ऑक्‍टोबरपर्यंत क्‍वारंटाईन आहेत. त्यामुळे विषय समित्यांच्या निवडीबद्दल पुढील आठवड्यात बैठक अपेक्षित आहे. दरम्यान, परिवहनचे माजी सभापती तुकाराम मस्के, स्थायी समितीच्या निवडीवेळी गणेश वानकर यांना कॉंग्रेसने मदत केली. मात्र, आता परिवहन सभापती निवडीवेळी महेश कोठे यांनी कॉंग्रेसला गृहीत धरून अर्ज भरला. परिवहन समिती सभापती निवडीवेळी कोठे यांनी कॉंग्रेसला विश्‍वासात घेतले असते, तर सभापती निश्‍चितपणे शिवसेनेचा होण्यास अडचण नव्हती, असे कॉंग्रेसचे गटनेते चेतन नरोटे म्हणाले. वाईट झाले तर कॉंग्रेसमुळे आणि चांगले झाले तर माझ्यामुळे, ही भूमिका कोठे यांनी सोडावी, असा टोलाही नरोटे यांनी लगावला. राज्यातील सत्तेच्या धर्तीवर विषय समित्यांच्या निवडीत सर्वजण मनाने एकत्र आल्यास भाजपला एकही समिती मिळणार नाही, असा विश्‍वासही नरोटे यांनी "सकाळ'शी बोलताना व्यक्‍त केला. 

महापालिकेतील पक्षीय बलाबल 

  • भाजप : 50 
  • शिवसेना : 21 
  • एमआयएम : 9 
  • राष्ट्रवादी कॉंग्रेस : 4 
  • कॉंग्रेस : 14 
  • वंचित बहुजन आघाडी : 3 
  • माकप : 1 

"वंचित'ला हवी कामगार कल्याण समिती 
भाजपला विषय समित्यांच्या निवडीत एकही समिती मिळू नये, यादृष्टीने आता कॉंग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी कॉंग्रेस, एमआयएम, वंचित बहुजन आघाडीने मोट बांधायला सुरवात केली आहे. एमआयएमने महिला व बालकल्याण समिती आणि स्थापत्य समितीची मागणी केली आहे. तर आता वंचित बहुजन आघाडीने कामगार कल्याण समितीची मागणी केली आहे. घटक पक्षांना दोन समित्या दिल्यानंतर उर्वरित पाच समित्यांपैकी कॉंग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसला कोणत्या समित्या दिल्या जाणार, याची उत्सुकता आहे. त्याबद्दल पुढील आठवड्यात सर्व गटनेत्यांची बैठक होणार आहे. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Shiv Sena says it does not trust Congress over Solapur Municipal Corporation's subject committee election