"कृष्णा-भीमा'च्या नावावर जनतेची दिशाभूल कराल तर तीव्र लढा उभारू : श्रीकांत देशमुखांचा इशारा 

Krishna-Bhima
Krishna-Bhima

सांगोला (सोलापूर) : दुष्काळी भागासाठी वरदायिनी ठरणाऱ्या कृष्णा-भीमा स्थिरीकरण योजनेचे दुष्काळी भागातील काम जाणीवपूर्वक थांबवून कृष्णेचे अतिरिक्त पाणी बारामतीकरांच्या घशात घालण्याचा खटाटोप महाविकास आघाडीतील जलसंपदामंत्री जाणीवपूर्वक करीत आहेत. कृष्णा-भीमा स्थिरीकरणाच्या नावाखाली नीरा-भीमा स्थिरीकरण योजना राबविण्याचा प्रयत्न करीत आहेत. दुष्काळी भागातील जनतेच्या हक्काच्या पाण्यावर डोळा ठेवाल तर तुमचा हा कुटील डाव आम्ही साध्य होऊ देणार नाही, असा इशारा भाजपचे जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख यांनी दिला आहे. 

कृष्णा-भीमा स्थिरीकरण योजनेअंतर्गत कृष्णा खोऱ्यातून कर्नाटक आणि आंध्र प्रदेश राज्यात दरवर्षी पुराचे वाहून जाणारे तब्बल 115 टीएमसी अतिरिक्त पाणी भीमा खोऱ्यात सोडून विविध सिंचन योजनांद्वारे ते सहा जिल्हे आणि 31 तालुक्‍यांना मिळणार आहे. सोलापूर जिल्ह्यातील सर्व म्हणजे 11 तालुक्‍यांना कृष्णा-भीमा स्थिरीकरण योजनेचा लाभ होणार आहे. मात्र दुष्काळी भागातील जनतेला मिळणारे हे पाणी जाणीवपूर्वक येथील कामांना स्थगिती देऊन ते सहा जिल्ह्यांपैकी केवळ पुणे जिल्हा आणि बारामती, इंदापूर व दौंड तालुक्‍यातील कामे सुरू करून बारामतीकरांच्या घशात घालण्यासाठी जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी हालचाली सुरू केल्या आहेत. याचाच एक भाग म्हणून राज्य शासनाने बारामती तालुक्‍यातील उद्धट तावशीजवळ नीरा नदीवर मोठा बोगदा तयार करून सात टीएमसी पाणी उजनी धरणात सोडण्याच्या प्रकल्पास गती दिली आहे. राज्य शासन याच कामाला कृष्णा-भीमा स्थिरीकरण असे गोंडस नाव देत आहे. परंतु प्रत्यक्षात ही दुष्काळी भागातील जनतेची दिशाभूल असून कृष्णा-भीमा स्थिरीकरणाच्या नावाखाली नीरा-भीमा स्थिरीकरणाचे काम राज्य शासनाने हाती घेतले आहे. यामुळे माढा लोकसभा मतदारसंघ आणि सोलापूर जिल्ह्यातील दुष्काळी जनतेचे मोठे नुकसान होणार आहे. सोलापूर जिल्ह्यातील तमाम दुष्काळी बांधवांना सोबत घेऊन राज्याचे माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली खासदार रणजितसिंह नाईक- निंबाळकर यांना सोबत घेऊन तीव्र जनआंदोलन उभा करू, असे श्री. देशमुख यांनी सांगितले. 

आंदोलनात रक्त सांडले तरी मागे हटणार नाही 
श्री. देशमुख म्हणाले, दुष्काळी भागाला हक्काचे पाणी मिळवून देण्यासाठी जर राज्य शासनाच्या विरुद्ध आंदोलन करावे लागले आणि आंदोलनात रक्त सांडावे लागले तरीही आम्ही मागे हटणार नाही. पाण्यासाठी रक्ताचे पाट वाहिले तरी बेहत्तर परंतु दुष्काळी भागाला हक्काचे पाणी मिळवून दिल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com