सर, परीक्षा जवळ आली आहे, कसेही करा पण मुलांचा अभ्यास पूर्ण करून द्या ! 

प्रकाश सनपूरकर
Saturday, 23 January 2021

शहरामध्ये कोचिंग क्‍लासेसमधून इयत्ता नववी व दहावी अभ्यासक्रमाचे अध्यापन सुरू झाले आहे. विद्यार्थ्यांचा मागे पडलेला अभ्यासक्रम पूर्ण करण्याचे मोठे आव्हान या कोचिंग क्‍लासेस चालकासमोर निर्माण झाले आहे. मागील आठ ते दहा महिन्यापासून कोरोनामुळे शैक्षणिक अध्यापनाचे काम विस्कळित झाले आहे

सोलापूरः सर, परीक्षा जवळ आली आहे. कसेही करा पण मुलांच्या अभ्यास घेऊन परीक्षेची तयारी करून द्या, अशी विनवणी विद्यार्थ्याचे पालक किोंचंग क्‍लासच्या शिक्षकांना करु लागले आहेत. 
शहरामध्ये कोचिंग क्‍लासेसमधून इयत्ता नववी व दहावी अभ्यासक्रमाचे अध्यापन सुरू झाले आहे. विद्यार्थ्यांचा मागे पडलेला अभ्यासक्रम पूर्ण करण्याचे मोठे आव्हान या कोचिंग क्‍लासेस चालकासमोर निर्माण झाले आहे. मागील आठ ते दहा महिन्यापासून कोरोनामुळे शैक्षणिक अध्यापनाचे काम विस्कळित झाले आहे. ऑनलाईन पध्दतीने कसाबसा शिकवण्याचा प्रयत्न झाला. मात्र त्यामध्ये विद्यार्थ्यांना तंत्र शिकून अभ्यासाचे घटक अगदी कमी प्रमाणात अभ्यासता आले. त्याचा परिणाम कोचिंग क्‍लासेस सुरु झाल्यानंतर दिसतो आहे. परीक्षेला केवळ दोन ते तीन महिन्याचा कालावधी शिल्लक राहिला आहे. कोचिंग क्‍लासेसमध्ये जे विद्यार्थी आले आहेत त्यांच्याशी चर्चा केल्यानंतर अनेक अध्ययन समस्या समोर आल्या आहेत. एकतर विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षणाच्या माऱ्यात नेमके काय करायचे हे समजले नाही. 
मागील तीन दिवसापासून नववी व दहावी कोचिंग क्‍लासेसला परवानगी मिळाली. सर्वच क्‍लास चालकांनी विद्यार्थ्यांची गर्दी होऊ नये म्हणून बॅंचेस संख्या वाढवली आहे. तसेच मास्क, सॅनिटायझर, सोशल डिस्टन्स सोबत थर्मल स्क्रिनींगची सोय केली आहे. 
नववी व दहावीच्या अभ्यासक्रमात लॉकडाउनमुळे कपात केली आहे. तरीही अकरावी व बारावीच्या अभ्यासक्रमात जोडलेले काही अध्यापन घटक असल्याने ते शिकवावे लागत आहेत. पालक आवर्जून क्‍लास चालकांची भेट घेऊन त्यांना परिक्षेची तयारी पूर्ण करून द्या अशी अपेक्षा व्यक्त करत आहेत. 

अपुऱ्या वेळेने आव्हानात्मक स्थिती 
उशीरा निर्णय झाल्याने विद्यार्थी, पालक व कोचिंग करणाऱ्या शिक्षकांसमोर खऱ्या अर्थाने आव्हान निर्माण झाले आहे. त्यातून विद्यार्थ्यांना पुन्हा अभ्यासांची शिस्त लावून अभ्यासक्रम कव्हर करावा लागणार आहे. 
- दत्ता पाटील, जिल्हाध्यक्ष, पीटीए, सोलापूर 

कोरोना नियमांचे पालन 
कोरोना नियमांचे पालन करुन कोचिंग क्‍लासेस सुरु झाले आहेत. पण मुलांचा अभ्यास विस्कळित झाला असून त्याची घडी बसवण्यासाठी अधिक वेळ देऊन अभ्यास करुन घेण्यास पर्याय राहिला नाही. 
- प्रा. विशाल जव्हेरी, सेक्रेटरी, पीटीए, सोलापूर 

पूर्ण अभ्यासक्रम शिकवावा लागणार 
मुलांचा अभ्यास परीक्षेच्या आधी पूर्ण करण्याचा आटोकाट प्रयत्न सुरू आहे. अभ्यासक्रमाचे कपात झालेले काही घटक पुढील वर्षाच्या संदर्भाने शिकवावे लागणार आहेत, 
- सुनील कामतकर, सदस्य पीटीए सोलापूर  

 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sir, the exam is near, do it anyway but complete the children's study!