"सर... मॅडम, हा "कोरोना' आपल्या शाळेतून कधी जाणार हो ! 

रमेश दास
गुरुवार, 19 मार्च 2020

जनजागृतीबाबत विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिके 
विद्यार्थ्यांना "कोरोना'चा संसर्ग होऊ नये म्हणून प्रत्येक शाळेमधील मुख्याध्यापक, शिक्षक-शिक्षिका यांनी सूचना दिलेल्या आहेत. हात साबणाने वारंवार धुण्याचे प्रात्यक्षिक करून दाखवले आहे. शिंकताना, खोकताना स्वच्छ रुमालाचा वापर तसेच लग्न, विविध समारंभ, यात्रा, जत्रा अशा गर्दीच्या ठिकाणी जाऊ नये याबाबतही सूचना देण्यात आल्या आहेत. 
- सिद्धेश्‍वर निंबर्गी, प्रभारी गटशिक्षणाधिकारी, मोहोळ 

वाळूज (ता. मोहोळ, जि. सोलापूर) : दररोज शाळांमधून घुमणारे चिमुकल्यांचे आवाज, कविता, बडबडगीते, गाणी, पाढे गाणारे गोड आवाज, अध्यापनाच्या तासांना शिक्षक-शिक्षिकांबरोबर होणारे संवाद आणि मधल्या सुटीत विविध खेळ खेळताना त्यांच्या आवाजाने दणाणून जाणाऱ्या शाळांच्या इमारती गेल्या दोन-तीन दिवसांपासून "कोरोना'च्या भीतीपोटी ओस पडल्या आहेत. "सर... मॅडम...कधी हा "कोरोना' आपल्या शाळेतून जाणार हो! आम्हाला घरी करमत नाही' अशा आर्त सुरात विद्यार्थी शिक्षकांना फोनवरून विचारत आहेत. 
"कोरोना'ला रोखण्यासाठी ग्रामीण भागातील प्राथमिक शाळांतील विद्यार्थीही सरसावले असून प्रशासनाने 18 ते 31 मार्चपर्यंत विद्यार्थ्यांना सुटी जाहीर केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत बुधवार (ता. 18)पासून मोहोळ तालुक्‍यातील सर्व प्रकारच्या 340 शाळांमधील 53 हजार 461 विद्यार्थ्यांपैकी एकही विद्यार्थी शाळेकडे फिरकला नसल्याचे चित्र आहे. 
कोरोना विषाणू हा एकमेकांच्या संपर्कात आल्यामुळे पसरतो म्हणून प्रशासनाने सर्व प्रकारच्या शाळांना 31 मार्चपर्यंत सुटी जाहीर केली आहे. याबाबत सोलापूर जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी संजय राठोड तसेच मोहोळचे गटविकासाधिकारी अजिंक्‍य येळे, गटशिक्षणाधिकारी सिद्धेश्‍वर निंबर्गी यांनी विद्यार्थ्यांना आवाहन केले होते. त्यास प्रतिसाद म्हणून शिक्षकांनी विद्यार्थ्यांना व पालकांना कोरोना विषाणूपासून बचाव करण्यासाठीच्या विविध सूचना, घ्यावयाची काळजी याबाबत मार्गदर्शन करून 31 मार्चपर्यंत सुटी जाहीर केली. सध्या मोहोळ तालुक्‍यातील सर्व प्राथमिक, माध्यमिक, इंग्रजी माध्यमाच्या व आश्रमशाळांमध्ये विद्यार्थ्यांचा शुकशुकाट आहे. 

ठळक 
मोहोळ तालुक्‍यात इयत्ता पहिली ते सातवीच्या जिल्हा परिषदेच्या 248 शाळांमध्ये 20 हजार 589 विद्यार्थी तर उर्वरित माध्यमिक, आश्रमशाळा व इंग्रजी माध्यमांच्या 92 शाळांमध्ये 32 हजार 870 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sir madam this corona is about to leave your school