esakal | 'सुकन्या'मुळे फुलले पालकांच्या चेहऱ्यांवर हास्य; 'असा' घ्या योजनेचा लाभ 
sakal

बोलून बातमी शोधा

1sukanya_samriddhi_yojana - Copy.jpg


सुकन्या योजनेतील ठळक बाबी... 

 • मुलीच्या जन्मानंतर 10 वर्षांपर्यंत उघडता येईल पालकांना खाते 
 • एका पालकास दोन मुलींचेच उघडता येईल खाते; जुळ्यांना मिळेल संधी 
 • आर्थिक वर्षात किमान एक हजार ते जास्तीत जास्त दिड लाखांपर्यंत रक्‍कम भरता येईल 
 • मुलींच्या शिक्षण व विवाहासाठी 21 वर्षांनंतर काढता येईल रक्‍कम 
 • सर्वाधिक व्याज देणारी योजना; 7.6 टक्‍के सध्याचा आहे व्याजदर 
 • टपाल कार्यालयात खाते उघडल्यानंतर देशात कुठेही भरता- काढता येईल रक्‍कम 

'सुकन्या'मुळे फुलले पालकांच्या चेहऱ्यांवर हास्य; 'असा' घ्या योजनेचा लाभ 

sakal_logo
By
तात्या लांडगे

सोलापूर : हातावरील पोट असलेल्या पालकांना मुलींचे ओझे वाटणार नाही, मुलींच्या शिक्षणाचा व विवाहाच्या खर्चाचा बोजा त्यांच्या डोक्‍यावर पडू नये या हेतूने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुकन्या योजना सुरु केली. सोलापूर व पंढरपूर विभागातील 61 हजार 272 पालकांनी तर देशातील सुमारे एक कोटी 72 लाख पालकांनी त्यांच्या मुलींचे नावे या योजनेअंतर्गत खाती उघडली आहेत. सामाजिक दृष्टीकोण, विचारधारा बदलली असून सरकारच्या माध्यमातून मुलींना शिक्षण, राजकारण, नोकरीत स्वतंत्र आरक्षण, सोयी- सुविधा उपलब्ध झाल्याने पालकांच्या चेहऱ्यावर हास्य दिसू लागले आहे.

सामाजिक संस्थांचा पुढाकार, गर्भलिंग निदान प्रतिबंधक कायदा, मुलींना शिक्षण, राजकारणात 50 टक्‍के संधी, नोकरीत विविध प्रकारच्या सुविधा, मुलींना मोफत शिक्षण, उपस्थिती भत्ता, मोफत पाठ्यपुस्तके, गणवेश अशा विविध योजनांमुळे राज्यातील मुलींचा टक्‍का वाढू लागला आहे. राज्यात विविध कारणास्तव गर्भपात होतात, परंतु मुलगी असल्याने गर्भपात करणाऱ्यांची संख्या घटल्याचे सार्वजनिक आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले. दोन मुली तथा एकाच मुलीवर कुटूंब नियोजनाची शस्त्रक्रिया करणाऱ्यांचे प्रमाणही अधिक आहे. राज्यभरात सुमारे तीन लाखांहून अधिक पालकांनी एक व दोन मुलींवर कुटूंब नियोजन केल्याचेही सांगण्यात आले.

मुलींच्या भविष्याची मिटली चिंता 
केंद्र सरकारने सुरु केलेल्या सुकन्या योजनेमुळे पालकांच्या व त्यांच्या मुलींच्या चेहऱ्यावर हास्य पहायला मिळत आहे. पालकांनी मुलीच्या जन्मानंतर दहा वर्षांपर्यंत सुकन्या योजनेत खाते उघडून वर्षात किमान एक हजार रुपये भरु शकता. त्यातून भविष्यातील मुलींच्या शिक्षण आणि विवाहाचा खर्च भागविणे सोयीस्कर होईल. 
- एस. एस. पाठक, प्रवर अधीक्षक, सोलापूर टपाल विभाग 


सामाजिक विचारधारा बदलल्याने मुलींचा जन्मदर 
मुलींनी विविध क्षेत्रात आपले कर्तृत्व सिध्द करीत समाजाची विचारधारा बदलली. दुसरीकडे केंद्र सरकारची सुकन्या योजना व राज्य सरकारच्या शिक्षण व नोकरीतील योजनांमुळे पालकांना मुलींचाच आधार वाटू लागला आहे. मागील काही वर्षांत मुलींच्या गर्भपाताचे व गर्भलिंगनिदान चाचणीचे प्रमाण खूपच कमी झाले आहे. 
- डॉ. प्रदिप ढेले, जिल्हा शल्यचिकित्सक, सोलापूर 


सुकन्या योजनेतील ठळक बाबी... 

 • मुलीच्या जन्मानंतर 10 वर्षांपर्यंत उघडता येईल पालकांना खाते 
 • एका पालकास दोन मुलींचेच उघडता येईल खाते; जुळ्यांना मिळेल संधी 
 • आर्थिक वर्षात किमान एक हजार ते जास्तीत जास्त दिड लाखांपर्यंत रक्‍कम भरता येईल 
 • मुलींच्या शिक्षण व विवाहासाठी 21 वर्षांनंतर काढता येईल रक्‍कम 
 • सर्वाधिक व्याज देणारी योजना; 7.6 टक्‍के सध्याचा आहे व्याजदर 
 • टपाल कार्यालयात खाते उघडल्यानंतर देशात कुठेही भरता- काढता येईल रक्‍कम