"बार्टी'ची अशीही सामाजिक बांधिलकी; समतादूत लावताहेत मंगल परिणय सोहळे 

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 7 July 2020

ग्रामीण भागातील लोक अजूनही अंधश्रद्धेच्या गर्तेत आहेत. लग्न समारंभ करताना केल्या जाणाऱ्या धार्मिक कार्यक्रमांत मोठ्या प्रमाणात पैसा खर्च केला जातो. आधीच उद्‌भवलेल्या कोरोनाच्या संकटात लग्नकार्यासाठी होणारा अवाजवी खर्च वाचविण्यासाठी दक्षिण सोलापूर तालुक्‍यातील समतादूत चंद्रशेखर गायगवळी हे लग्न समारंभ असलेल्या कुटुंबास जाऊन भेटतात व त्यांचे प्रबोधन करून कमीत कमी खर्चात लग्न समारंभ करण्यास सुचवतात.

 कुसूर (सोलापूर) : डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी)कडून सामाजिक बांधिलकी जपत समतादूत कोरोनाच्या काळात मंगल परिणय सोहळे लावून परिवर्तन करीत आहेत. बार्टी ही समाजात विधायक उपक्रम राबविणारी संस्था असून, या संस्थेच्या माध्यमातून समाजातील कलाकार, विद्यार्थी, गृहिणी, कामगार अशा अनेक घटकांसाठी कामे केली जातात. 

हेही वाचा : या शहरात कॉंग्रेसचा आहे लॉकडाउनला विरोध 

सध्या महाराष्ट्रात कोरोनाच्या संकटामुळे अनेक समस्या निर्माण झाले असून, प्राप्त परिस्थितीवर मात करून व शासनाच्या आदेशांचे पालन करून मोजक्‍या लोकांच्या उपस्थितीत लग्न समारंभे पार पडत आहेत. परंतु ग्रामीण भागातील लोक मात्र अजूनही अंधश्रद्धेच्या गर्तेत आहेत. लग्न समारंभ करताना केल्या जाणाऱ्या धार्मिक कार्यक्रमांत मोठ्या प्रमाणात पैसा खर्च केला जातो. लग्न कार्यासाठी लागणारा पैसा व्याजाने काढून धार्मिक कार्यक्रम लावले जातात व पुन्हा कर्जबाजारी व्हावे लागते. 
आधीच उद्‌भवलेल्या कोरोनाच्या संकटात लग्नकार्यासाठी होणारा अवाजवी खर्च वाचविण्यासाठी दक्षिण सोलापूर तालुक्‍यातील समतादूत चंद्रशेखर गायगवळी हे लग्न समारंभ असलेल्या कुटुंबास जाऊन भेटतात व त्यांचे प्रबोधन करून कमीत कमी खर्चात लग्न समारंभ करण्यास सुचवतात. लग्नाचे विधी पार पाडण्यासाठी भंतेजींची गरज असते; परंतु कोरोनामुळे शहरी भागातील भंतेजींना बोलावणे अवघड झाल्याने खुद्द चंद्रशेखर गायगवळी हेच लग्नाचे विधी त्रिशरण पंचशीलाचे सामूहिक वंदना घेऊन नव वधूवरांस शुभेच्छा देत आहेत. समाजात गरज असेल तिथे धावून जाणे अशी समतादूतांची ओळख असून, आयुष्याच्या वेलांटी वळणावर संसाराची समृद्ध स्वप्ने पाहणाऱ्या नव वधूवरांना लग्नाच्या रेशीमगाठीत गुंफण्याचे कार्य बार्टीच्या वतीने समतादूत करत आहेत, हे एक मोलाचे कार्य असल्याची जनभावना उपस्थित जनतेतून समोर येत आहे. 

हेही वाचा : 80 वर्षाच्या शेतकरी आजोबाची पत्नीसह दुबार पेरणी, डोळ्यात टचकन पाणी आणणारा व्हिडीओ 

बार्टीच्या या सामाजिक बांधिलकीच्या उपक्रमांत महासंचालक कैलास कणसे व स्वत:च्या कल्पक बुद्धीतून अभिनव उपक्रम राबविणाऱ्या मुख्य प्रकल्प संचालिका प्रज्ञा वाघमारे यांचा मोठा सहयोग असून, सोलापूर जिल्ह्याच्या प्रकल्प अधिकारी प्रणिता कांबळे यांच्या सहकार्याने व शारीरिक अंतर राखून, शासनाने दिलेले दिशानिर्देश पाळून, मास्क व सॅनिटायझरचा वापर करून हे लग्न सोहळे पार पाडत आहेत. उपेक्षितांच्या, वंचितांच्या चेहऱ्यावर हास्य फुलविणारी बार्टी आज सामान्य जनतेत जाऊन प्रबोधनाच्या मार्गाने परिवर्तन घडवून आणत आहे. 

याबाबत समतादूत चंद्रशेखर गायगवळी म्हणतात, बार्टी आणि प्रबोधन हे एक समीकरण झाले आहे. प्रबोधन ही संतांची, महापुरुषांची परंपरा असून त्या मार्गाने परिवर्तन घडवण्याची किमया आज बार्टीद्वारे सिद्ध करता आले. अनेक कुटुंबांना समुपदेशन करून कमीत कमी खर्चात विवाह सोहळा पार पाडण्यासाठी प्रयत्न करतो आहे. त्यास चांगला प्रतिसादही मिळत आहे. उद्याचा विवाह सोहळा यशस्वी करण्यासाठी काय बोलावं, कसं बोलावं याचे नियोजन रात्रभर डोक्‍यात चालू असतं. लग्न पार पडल्यानंतर मिळणारा प्रतिसाद पाहून आणखी ऊर्जा मिळते. एक वेगळे समाधानही यानिमित्ताने अनुभवता येत आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Social commitment is being nurtured by Barty