आमदार पडळकर यांच्या विरोधात सोलापूर शहर राष्ट्रवादीचे आंदोलन 

प्रमोद बोडके
गुरुवार, 25 जून 2020

शरद पवार यांचे कर्तृत्व व नेतृत्व किती मोठे आहे हे काल-परवा राजकारणात आलेल्या संधिसाधू गोपीचंद पडळकर यांना काय माहिती. शरद पवार यांबद्दल बोलण्याची त्यांची लायकीही नाही. पवारांनी महाराष्ट्रात विकासासोबतच सामाजिक समतोल ही साधला आहे. मंडल आयोग व महिला आरक्षणाच्या माध्यमातून पवार यांनी त्यांचे कर्तृत्व सिद्ध केले आहे हे संपूर्ण जगाने पाहिले आहे. प्रसिद्धीला हपापलेल्या पडळकर यांनी ऊठसूट कोणावरही आरोप करू नयेत. दुसऱ्यावरआरोप करण्यापूर्वी त्यांनी स्वतःची लायकी तपासून घ्यावी अन्यथा यापुढील काळात पडळकर यांच्या तोंडाला काळे फासले जाईल, महाराष्ट्रात फिरणे त्यांना मुश्‍कील होईल. 
- संतोष पवार, कार्याध्यक्ष, सोलापूर शहर राष्ट्रवादी कॉंग्रेस 

सोलापूर : भाजपचे विधान परिषद सदस्य गोपीचंद पडळकर यांनी देशाचे राष्ट्रीय नेते शरद पवार यांच्या विरोधात केलेल्या बेताल वक्‍तव्याचा सोलापप्र शहर राष्ट्रवादी कॉंग्रेसच्यावतीने निषेध करण्यात आला आहे. आज सकाळी सोलापुरातील चार हुतात्मा पुतळा येथे सोलापूर शहर जिल्हा राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षातर्फे आमदार गोपीचंद पडळकर यांचा फोटो लावून निषेधाच्या घोषणाबाजी करून आंदोलन करण्यात आले. 

शहराध्यक्ष भारत जाधव यांच्या अध्यक्षतेखाली व कार्याध्यक्ष संतोष पवार यांच्या मार्गदर्शनाखाली शहरातील ज्येष्ठ नेते मनोहर सपाटे, महिला शहराध्यक्ष सुनीता रोटे, युवक शहराध्यक्ष जुबेर बागवान, श्रीनिवास कोंडी, कय्यूम बुरहान, फारुक मटके, राजू कुरेशी, निशांत साळवे, रूपेश भोसले, लता ढेरे, मनीषा नलावडे, प्राजक्ता बागल, वसीम बुरहान, संजय सरवदे, आमीर शेख, सुहास कदम, महम्मद इंडीकर यांच्यासह सर्व प्रमुख पदाधिकारी यांच्या प्रमुख उपस्थितीत आंदोलन करण्यात आले. 

यावेळी गोपीचंद पडळकर यांनी केलेल्या वक्तव्याचा निषेध करताना त्यांच्या विरोधात घोषणा देऊन संपूर्ण राष्ट्रवादी पक्ष शरदचंद्रजी पवार यांच्या सोबत असल्याचे प्रमुख पक्ष पदाधिकारी यांनी सांगितले. आमदार पडळकर यांनी लवकरात लवकर शरद पवार यांची व राज्याची माफी मागावी अन्यथा त्यांना राज्यभर फिरू दिले जाणार नाही असा गर्भित इशारा देण्यात आला.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Solapur city NCP agitation against MLA Padalkar