सोलापूर जिल्ह्यात महापुरामुळे 30 हजार शेतीपंपाची वीज झाली बाधित 

संतोष सिरसट
Sunday, 25 October 2020

कर्मचाऱ्यांचे केले कौतुक 
औराद येथील उपकेंद्रातूनच संजवाड गावाला वीजपुरवठा होतो. परंतु, उपकेंद्रातून निघणाऱ्या वाहिनीच्या मार्गातील अनेक विजेचे खांब पडल्याने व त्या भागात गाळ साचल्याने संजवाडला पर्यायी मार्गाने शुक्रवारी वीजपुरवठा सुरु करण्यात यश आले. शेती वगळता जिल्ह्यातील सर्व गावांचा वीजपुरवठा सुरु केला. त्याबद्दल कर्मचाऱ्यांचे कौतुक आहे. 
अंकुश नाळे, प्रादेशिक संचालक (प्रभारी). 

सोलापूर ः प्राथमिक अंदाजानुसार जिल्ह्यात महावितरणचे दोन हजार विजेचे खांब पडल्याचा अंदाज होता. मात्र, जसे पाणी कमी होत आहे. तसे त्या-त्या भागातील नुकसानीचे आकडे पुढे येत आहेत. अर्थात यातही अजून वाढ होण्याचीच शक्‍यता आहे. शनिवारपर्यंत (ता. 24) जमीनदोस्त झालेल्या विजेच्या खांबाची संख्या सात हजार 742 इतकी झाली आहे. यापैकी 870 खांब आतापर्यंत उभे करण्यात महावितरणला यश आले आहे. अद्याप 6872 खांब उभे करावे लागणार आहेत. महापुरामुळे जवळपास 29 हजार 473 शेतीपंपाची वीज बाधित झाली आहे. 

परतीच्या पावसाने क्षती पोचलेल्या वीज यंत्रणेची प्रभारी प्रादेशिक संचालक अंकुश नाळे यांनी पाहणी केली. वीजपुरवठा तातडीने पूर्ववत करण्याच्या सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. दरम्यान, सांजवाडचा (ता. दक्षिण सोलापूर) वीजपुरवठा पर्यायी मार्गाने पूर्ववत झाल्याने जिल्ह्यातील सर्व गावे सुरु झाल्याची माहिती श्री. नाळे यांनी दिली. 14 ऑक्‍टोबरला आलेल्या पूरस्थितीमुळे बाधित झालेल्या वीज यंत्रणेचा ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत, महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक असीमकुमार गुप्ता, संचालक (संचालन) सतीश चव्हाण, प्रादेशिक संचालक अंकुश नाळे यांनी वेळोवेळी परिस्थितीचा आढावा घेऊन लागणारे खांब, ऑईल व इतर साहित्याची व्यवस्था केली आहे. त्यांच्या निर्देशानुसारच मुख्य अभियंता सुनील पावडे यांनी परिस्थितीवर नियंत्रण ठेवून, मनुष्यबळाची व साहित्याची व्यवस्था चोख ठेवली आहे. त्यामुळे वीजपुरवठा सुरळीत करण्याची कामे ठिकठिकाणी युद्धपातळीवर सुरु आहेत. 

भीमा, सीना या नद्यांच्या काठावर असलेल्या वीज यंत्रणेला सर्वाधिक फटका बसला आहे. हजारो रोहित्र, विजेचे खांब जमीन दोस्त झाले असून, यंत्रणेला पूर्ववत करण्यासाठी महावितरणचे कर्मचारी जीवाचे रान करीत आहेत. या कामाची पाहणी करण्यासाठी महावितरण पुणेचे प्रभारी प्रादेशिक संचालक नाळे यांनी 22 व 23 ऑक्‍टोबरला जिल्ह्यात आले होते. औराद येथील उपकेंद्रालाही त्यांनी भेट दिली. यावेळी त्यांच्या समवेत बारामतीचे अधीक्षक अभियंता चंद्रशेखर पाटील, सोलापूरचे अधीक्षक अभियंता ज्ञानदेव पडळकर उपस्थित होते. 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: In Solapur district, 30,000 agricultural pumps electricity were disrupted due to floods