कोरोनासह ‘या’ समस्येलाही सामोर जाण्यासाठी सोलापूरचे प्रशासन सज्ज

अशोक मुरुमकर
Friday, 17 April 2020

जिल्ह्यात दरवर्षी काही गावांमध्ये उन्हाळ्यात पाणी टंचाई निर्माण होते. त्यामुळे काही ठिकाणी टँकर सुरु करावा लागतो. तर काही ठिकाणी विहीर किंवा बोअर प्रशासन अधिग्रहण करते. सोलापूर जिल्ह्यात ११ तालुके आहेत. त्यामध्ये ११४४ गावे आहेत. जिल्ह्या् सहा उपविभाग असून जिल्ह्याच्या संकेतस्थळावरील आकडेवारीनुसार ४३ लाख १७ हजार ७५६ लोकसंख्या आहे. १४८९५ एसक्यु केएम क्षेत्रपळ असून १३ नगरपालिका आहेत. सोलापूर जिल्ह्यात प्रत्येकवर्षी पाऊसही कमी अधिक प्रमाणात पडतो.

सोलापूर : जगभर धुमाकूळ घातलेल्या कोरोना व्हायरसने सोलापूर जिल्ह्यातही अखेर प्रवेश केला आहे. रविवारी १२ एप्रिलला याची जिल्हाधिकाऱ्यांनी माहिती दिली. तेव्हापासून सोलापूर शहरासह जिल्ह्यातील नागरिक आणखीन सजग झाले. जिल्हा प्रशासनानेही त्याचा धसका घेतला असून त्याला सामोरे जाण्यासाठी सरकारच्या सूचनेनुसार योग्य खबरदारी घेतली आहे. कोरोनाच्या लढाईबरोबर दुसऱ्याही येणाऱ्या अडचणीचा सामना करण्यासाठी प्रशासन सज्ज झाले आहे. 

हेही वाचा : समुपदेशन करणाऱ्या परिचारिका व तिच्या पतीची दुचाकी जाळल्या
जिल्ह्याची स्थिती

जिल्ह्यात दरवर्षी काही गावांमध्ये उन्हाळ्यात पाणी टंचाई निर्माण होते. त्यामुळे काही ठिकाणी टँकर सुरु करावा लागतो. तर काही ठिकाणी विहीर किंवा बोअर प्रशासन अधिग्रहण करते. सोलापूर जिल्ह्यात ११ तालुके आहेत. त्यामध्ये ११४४ गावे आहेत. जिल्ह्या् सहा उपविभाग असून जिल्ह्याच्या संकेतस्थळावरील आकडेवारीनुसार ४३ लाख १७ हजार ७५६ लोकसंख्या आहे. १४८९५ एसक्यु केएम क्षेत्रपळ असून १३ नगरपालिका आहेत. सोलापूर जिल्ह्यात प्रत्येकवर्षी पाऊसही कमी अधिक प्रमाणात पडतो. एखाद्यावर्षी जास्त तर एखाद्यावर्षी कमी पाऊस पडतो. त्यामुळे अनेक गावात नेहमी पाणी टंचाई निर्माण होते. गेल्यावर्षी जिल्ह्यात अनेक गावांमध्ये ऑगस्टपर्यंत पाण्याचे टँकर सुरु होते. यावर्षी सुद्धा काही गावांमध्ये पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे. एकीकडे कोरोनाचा धुमाकूळ आणि दुसरीकडे पाणी टंचाई, असा दुहेरी सामना सुरु आहे. काही गावात तर कोरोनाच्या भितीने पाणी टंचाईबद्दल नागरिक बोलत नसल्याचे समोर आले आहे. दोन दिवसापूर्वी नाव न छापण्याच्या अटीवर करमाळा तालुक्यातील एक तरुण पाणी टंचाईबद्दल सांगत होता. तो म्हणाला, गावात कधी पाणी येतय तर कधी येत नाही. एखाद्या दिवशी पाणी आलं तर गर्दी होते. अशीच स्थिती अनेक गावात आहे.

कोठे काय आहे स्थिती...
‘सकाळ’चे बातमीदार विजयकुमार कन्हेरे म्हणाले, माढा तालुक्यात चार गावांमध्ये पाणी टंचाई निर्माण आहे. येथे टँकर सुरु करावी, अशी मागणी पंचायत समितीकडे केली असल्याचे नागरिक सांगत आहेत. सोलंकरवाडी, पडसाळी, बैरागवाडी या शिवाय आणखी एक गाव आहे. मोडनिंब भागातील ही गावे असून त्यांनी पाणी पुरवठा विभागाकडे टँकरची मागणी केली आहे. त्यावर पाणी पुरवठा विभाग मार्ग काढत आहे. मात्र, नागरिकांची मागणी टँकरचीच आहे.
अक्कलकोटचे ‘सकाळ’चे बातमीदार म्हणाले, तालुक्यात यावर्षी गंभीर स्वरुपात पाणी टंचाई निर्माण झालेली नाही. तालुक्यात १३५ गावे आहेत. गेल्यावर्षी शेवटच्या महिन्यात पाऊस पडला. त्यामुळे पाण्याचा प्रश्‍न ऐवढा गंभीर नाही. भीमा नदीतही आता पाणी येणार आहे. त्याचा बराचसा परिणाम होणार आहे. मात्र, लोकांच्या हाताला सध्या काहीच काम नाही.
मंगळवेढ्याचे ‘सकाळ’चे बातमीदार हुकुम मुलाणी म्हणाले, मंगळवेढा तालुक्यात ७९ गावे आहेत. तालुक्यातील ३९ गावाचा पाणी पुरवठा हा भोसे प्रादेशिक पाणी पुरवठ्यावर अवलंबुन आहे. त्यातील १५ गावात स्वत: चा स्त्रोत आहे. २४ गावाला पाणी पुरवठा करणारा विद्युतपंप जळाला होता. मात्र, औरंगाबाद येथून माणूस आणून दुरुस्त केली. त्यामुळे पाणी प्रश्‍न मिटेल. सध्या तालुक्यात कोणत्याही गावात पाणी प्रश्‍न नाही. काही ठिकाणी चार दिवसातून पाणी येत आहे. भाळवणी येथे नवीन सोलरपंप बसवला आहे. तो पंप बंद पडला आहे. त्यावरच येथील पाणी पुरवठा अंवलंबून आहे. तिथे चार दिवसाला पाणी येत आहे. काही ठिकाणी शेजारच्या शेतातून पाणी आणले जात आहे.
बार्शी तालुक्यात कोणत्याही गावात गंभीर स्वरुपात पाणी टंचाई नसल्याचे पत्रकार प्रशांत काळे यांनी सांगितले.
करमाळा तालुक्यातही पोथरे, वडगाव उत्तर, वडगाव दक्षिण, पुनवर, रायगाव, हिवरवाडी येथे पाणी टंचाई आहे, असे बातमीदार अण्णा काळे यांनी सांगितले.

हेही वाचा : संपर्कात आलेल्या 50 जणांची तपासणी सुरु
पाणी प्रश्‍न सोडवण्यासाठी प्रशासन सज्ज 

सोलापूर जिल्ह्यातील कोणत्याही गावात सध्या गंभीर स्वरुपात पाणी टंचाई नाही. मात्र, त्यासाठी सुद्धा प्रशासन सज्ज आहे. अद्याप पाणी पुरवठ्याबाबत आमच्याकडे तक्रार आलेली नाही, असे जिल्हाधिकारी मिलींद शंभरकर यांनी ‘सकाळ’शी बोलताना सांगितले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Solapur district ready to faces water scarcity