सोलापुरात अन्न प्रशासनाने केला चार लाख 35 हजाराचा माल जप्त 

सकाळ वृत्तसेवा
Monday, 26 October 2020

अन्यथा कायदेशीर कारवाई 
उत्पादक, पुरवठादार, किरकोळ व घाऊक इत्यादी अन्न आस्थापनांनी अन्न सुरक्षा व मानदे कायद्यानुसार परवाना घेणे बंधनकारक आहे. जे व्यापारी विनापरवाना व्यवसाय करीत असल्याचे तपासणीमध्ये आढळून आल्यास त्यांच्याविरुध्द कायदेशीर कारवाई घेण्यात येईल, असा इशारा अन्न व औषध प्रशासनाने दिला आहे. 

सोलापूर ः अन्न प्रशासनाने आज सोलापूर शहरातील परचंडे ग्रो इंडस्ट्रिज येथे छापा टाकून चार लाख 35 हजार 496 रुपयांचा माल जप्त करण्यात आला आहे. विनापरवाना चालणाऱ्या या आस्थापनेवर अन्न व औषध प्रशासनाने ही कारवाई केली आहे. 
सोलापूर शहरात सणासुदीच्या मोहिमेअंतर्गत आज सहाय्यक आयुक्त (अन्न), प्रदिपकुमार राऊत, व अन्न सुरक्षा अधिकारी नसरिन मुजावर यांनी आनंद परचंडे यांच्या मालकिच्या रविवार पेठेतील मे. परचंडे ग्रो इंडस्ट्रिज येथे तपासणीकामी भेट दिली. त्यावेळी या पेढीकडे अन्न सुरक्षा व मानदे कायद्यांतर्गत परवाना न घेता विनापरवाना उत्पादन व्यवसाय करीत असल्याचे निदर्शनास आले. या पेढीमध्ये चनादाळ व चना बेसनाचे उत्पादन सुरु असल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर या पेढीची तपासणी करुन उत्पादन करुन विक्रिसाठी साठविलेल्या चना डाळ, चना बेसन व मयुर गोल्ड राईस या अन्न पदार्थाचे नमुने विश्‍लेषणासाठी घेतले. उर्वरित पाच हजार 996 किलो चनादाळ ज्याची किंमत तीन लाख 71 हजार 752 रुपये व 996 किलो मयुर गोल्ड राईस ज्याची किंमत 63 हजार 744 रुपये असा एकूण एकत्रित चार लाख 35 हजार 496 रुपये किमतीचा साठा विनापरवाना व्यवसाय व विना लेबल वर्णनाच्या पाकिटातून साठा केल्याच्या संशयावरुन जप्त करण्यात आला आहे. जप्त केलेल्या मयुर गोल्ड राईसचा वापर भेसळीकरीता होत असल्याचे संशयवरुन जप्त केले. 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: In Solapur, the food administration confiscated goods worth Rs 4 lakh 35 thousand