सोलापूर महापालिकेचा प्रदूषण नियंत्रणासाठी 'हा' ऍक्‍शन प्लॅन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सोलापूर महापालिकेचा प्रदूषण नियंत्रणासाठी 'हा' ऍक्‍शन प्लॅन

उपाययोजनांबाबत महापालिकेस पत्र 
शहरातील हवा प्रदूषणाचे प्रमाण 80 मिलिग्रॅमपर्यंत असून 150पर्यंत ते धोक्‍याचे असते. त्यानुसार रस्ता दुभाजकावरील कचरा नियमित उचलावा, बांधकाम करताना अथवा पाडकाम करताना तेथील मटेरियल इतरत्र उचलावे, ड्रेनेज स्वच्छता करताना निघालेला कचरा तत्काळ उचलावा, रस्त्याची कामे करताना धूळ उडू नये म्हणून नियमित पाणी मारावे, अशा उपाययोजना करण्यासंबंधीचे पत्र महापालिकेस दिले आहे. 
- प्रशांत भोसले, उपविभागीय अधिकारी, प्रदूषण नियंत्रण मंडळ, सोलापूर

सोलापूर महापालिकेचा प्रदूषण नियंत्रणासाठी 'हा' ऍक्‍शन प्लॅन

सोलापूर : शहरातील हवा प्रदूषणात दिवसेंदिवस वाढ होऊन श्वसनाचे विकार वाढू लागले आहेत. नागरिकांच्या तक्रारीनुसार केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने महापालिकेला धारेवर धरले. त्यानुसार महापालिकेने आता हवा प्रदूषण नियंत्रणाचा कृती आराखडा (ऍक्‍शन प्लॅन) तयार केला असून रस्ता दुभाजकावरील माती कमी करीत कामाला सुरवात करण्यात आली आहे. 

हेही वाचा - राज्यातील 19 महापालिकांमध्ये उभारणार हा प्रकल्प 

पर्यावरण तथा नागरिकांचे आरोग्य निरोगी राहण्यासाठी हवा व जलप्रदूषण नियंत्रणात असणे अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. मात्र, महापालिका परिसरात अनेक जुन्या इमारतींचे पाडकाम अथवा नव्याने बांधकाम सुरू असतानाही त्याठिकाणचे मटेरियल कुठे टाकले जाते, याबाबत महापालिका प्रशासन अनभिज्ञच असल्याचे दिसून येते. वास्तविक पाहता त्याबाबत प्रदूषण नियंत्रण मंडळाने नियमावली ठरवून दिली असतानाही त्याची अंमलबजावणीच होत नाही. शहरातील हवा धोक्‍याच्या पातळीकडे वाटचाल करीत असताना प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या पत्रानुसार महापालिकेला जाग आली आहे. मागील पाच-सहा वर्षांत प्रदूषण नियंत्रण मंडळाने नागरिकांच्या तक्रारीनुसार महापालिकेला वारंवार पत्र देऊनही काहीच उपाययोजना केल्या नाहीत. रस्त्याच्या दुभाजकावर मातीचे ढीग, रस्त्याच्या दुतर्फा माती, रस्त्याची कामे सुरु असताना धुळ उडणार नाही याची खबरदारी घेतलीच नाही. ड्रेनेज सफाईतील कचरा रस्त्यावरच पडलेला दिसतोय, असेही प्रदूषण नियंत्रण मंडळाने महापालिकेला पत्राद्वारे कळविले. त्यानुसार महापालिकेच्या पर्यावरण विभागाने आता प्रत्यक्ष कामाला प्रारंभ केल्याचे दिसून येते. 

हेही वाचा - उपमुख्यमंत्री अन्‌ चंद्रकांतदादा शुक्रवारी सोलापुरात 

कृती आराखडा तयार 
केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या निर्देशानुसार महापालिकेने हवा प्रदूषण नियंत्रणाचा कृती आराखडा तयार केला आहे. त्यानुसार रस्ता दुभाजकावरील माती कमी करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. आरटीओ, महापालिकेसह अन्य विभागांचीही जबाबादारी त्यामध्ये असून संबंधितांना पत्रव्यवहार करण्यात आला आहे. आगामी पाच वर्षांत शहरातील हवा प्रदूषण नियंत्रणात आणण्यासाठी ठोस नियोजन केले आहे. 
- अजितसिंह पवार, उपायुक्‍त, सोलापूर महापालिका 

हेही वाचा - 'फास्ट टॅग'नंतरही सुटेना वाहतूक कोंडी 

ठळक बाबी... 

  • केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या कारवाईच्या पत्रानंतर महापालिकेने तयार केला कृती आराखडा 
  • आगामी पाच वर्षांत हवा प्रदूषण नियंत्रणात आणण्याचे नियोजन : पाच ठिकाणे केली निश्‍चित 
  • रंगभवन, महापालिका, ओरोनोका पूल, जुळे सोलापूर पाण्याची टाकी, नवे नियोजन भवन या ठिकाणाहून हवा प्रदूषणाचे मोजमाप 
  • कन्स्ट्रक्‍शन ऍण्ड डी-मॉल्यूशन वेस्टचा प्रस्ताव नगरविकास विभागाला सादर 
  • बांधकामावेळी पडणाऱ्या वेस्टेजपासून तयार होणार पेव्हर ब्लॉक : शहराबाहेर होणार वेस्ट मटेरियलचा साठा