esakal | 'फास्ट टॅग'नंतरही सुटेना वाहतूक कोंडी 
sakal

बोलून बातमी शोधा

fastag
  • 43 टक्‍के वाहनधारकांकडे नाही अद्याप फास्ट टॅग 
  • टोल कर्मचारी अन्‌ वाहनचालकांमध्ये वाढले वाद 
  • तांत्रिक अडचणींमुळे रिड होईना टॅग : हजारो लिटर इंधन वाया 
  • वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी अतिरिक्‍त कर्मचारी : पोलिस बंदोबस्त हटविला 

'फास्ट टॅग'नंतरही सुटेना वाहतूक कोंडी 

sakal_logo
By
तात्या लांडगे

सोलापूर : प्रत्येक वाहनास टोल नाक्‍यांवरुन कोणत्याही अडथळ्याविना न थांबता सहजपणे जाता यावे, इंधन बचत व्हावी या हेतूने वाहनांना फास्ट टॅग बंधनकारक करण्यात आले. आतापर्यंत 67 टक्‍के वाहनांधारकांनी टॅग घेतले. मात्र, टॅग रिड होण्यातील तांत्रिक अडचणी, टॅगमध्ये पुरेसा बॅलन्स नाही, दुप्पट टोल देण्यास वाहनचालकांचा नकार आणि त्यातून होणारा वाद व वाहतूक कोंडीमुळे टोल कर्मचाऱ्यांचा मनस्ताप वाढला आहे. 


हेही वाचा : उपमुख्यमंत्री अन्‌ चंद्रकांतदादा शुक्रवारी सोलापूर दौऱ्यावर 


वाहतूक सुरळीत होण्यासाठी अतिरिक्‍त कर्मचारी नियुक्‍त करुनही टोलवर वाहनांच्या रांगा लागत असून दररोज वाहनचालक व टोल कर्मचाऱ्यांमध्ये वादाचे प्रसंग घडत असून काही कर्मचाऱ्यांना धमक्‍याही दिल्या जात आहेत. दरम्यान, वाहनधारक व टोल कर्मचाऱ्यांमध्ये वाद होऊ नयेत, वाहतूक सुरळीत व्हावी या हेतूने टोलवर पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. मात्र, आता तो काढून घेण्यात आल्याने वाहतूक कोंडी अन्‌ कर्मचाऱ्यांमधील वाद वाढतच असल्याचे चित्र आहे. ज्या वाहनचालकांकडे फास्ट टॅग नाही, अशांसाठी एक स्वतंत्र लेन सुरु ठेवली आहे. परंतु, टॅग रिड होत नाही, टॅग ब्लॅक लिस्टमध्ये पडला आहे, फास्ट टॅग असूनही टोल का देऊ, वाहन पुढे घेतच नाही, पैसे न देताच जातो, असे म्हणून वाहनचालक वाद घालत असल्याचे टोल व्यवस्थापकांकडून सांगण्यात आले. तर तांत्रिक अडचणींमुळे टॅग रिड होत नसल्याने वाहन मागे-पुढे घ्यावे लागते आणि कर्मचाऱ्यांशी वाद घालण्यात वाहनांच्या रांगा लागतात. त्यामुळे दररोज हजारो लिटर इंधन वाया जात असल्याचेही तज्ज्ञांकडून सांगण्यात आले. 


हेही वाचा : अभिनेता भरत जाधव, विजय कदम येणार सोलापुरला 

ठळक बाबी... 

  • फास्ट टॅगमध्ये बॅलन्स नसतानाही वाहनचालकांचा कर्मचाऱ्यांशी वाद : वाहतूक कोंडी 
  • वाहतूक कोंडी टाळण्यासाठी अतिरिक्‍त कर्मचाऱ्यांची नियुक्‍ती : कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द वाद वाढूनही टोल नाक्‍यांवर नाही पोलिस बंदोबस्त 
  • फास्ट टॅग रिड होण्यासाठी तांत्रिक अडचणी : वाहनांचे अतिरिक्‍त इंधन खर्ची 
  • प्रत्येक टोलवर फास्ट टॅग नसलेल्यांसाठी एक स्वतंत्र लेन : पाच काउंटरद्वारे टॅग विक्री 
  • आरटीओकडून मिळत नाही वाहनचालकांना सविस्तर माहिती : दुप्पट रक्‍कम द्यायला नकार 


हेही वाचा : राज्यातील शिक्षकांच्या उन्हाळी सुट्ट्यांना यंदा 'खो'..हे आहे कारण ? 

1 फेब्रुवारीपासून ज्या वाहनांकडे फास्ट टॅग नाही, त्यांना दुप्पट टोल
केंद्र सरकारच्या निर्देशानुसार सर्वच वाहनांसाठी फास्ट टॅग बंधनकारक आहे. सोलापूर जिल्ह्यातील 60 टक्‍के वाहनधारकांनी फास्ट टॅग घेतले असून 67 टक्‍के कलेक्‍शन त्यातून होत आहे. अवजड वाहनांच्या तुलनेत चारचाकी वाहनांकडे फास्ट टॅग कमी आहे. अंदाजित फेब्रुवारीपासून ज्या वाहनांकडे फास्ट टॅग नाही, त्यांना दुप्पट टोल भरावा लागेल. वाहतूक सुरळीत राहण्यासाठी प्रत्येक टोल नाक्‍यांवर अतिरिक्‍त कर्मचारी नियुक्‍त केले आहेत. 
- संजय कदम, संचालक, राष्ट्रीय रस्ते विकास महामंडळ